Related Posts Plugin for WordPress, Blogger...

२७ सप्टेंबर, २००९

तीन गझला : वंदना पाटील


१. लाचार

जरी अर्ध्यात मी तेव्हा उठाया लागलो होतो;
तुझ्या बेचैन हाकांनी वळाया लागलो होतो.

कसा ना राहिला माझा गडे माझ्यावरी ताबा;
उगी ह्या मृगजळामागे पळाया लागलो होतो.

कुणाला शोधतो आहे मनाच्या गूढ अंधारी;
खुळे आभास छातीसी धराया लागलो होतो.

अरे हंगाम शोधाया निघाली पाखरे कोठे?
मला कळले न केव्हा मी वठाया लागलो होतो.

जरी आमंत्रणे देती तुझे ते लाघवी डोळे;
कशाला उंब-यापाशी अडाया लागलो होतो.

कसा लाचार मी झालो कळेना एवढा येथे;
जगाच्या हासण्यासाठी हसाया लागलो होतो.

२. व्यवहार

भरला सभोवताली बाजार माणसांचा;
वाटे नको नकोसा शेजार माणसांचा.

गर्दीच श्वापदांची झाली सभोवताली;
शोधून सापडेना आधार माणसांचा.

गेली रसातळाला केव्हाच लोकशाही;
तेजीत चाललेला व्यापार माणसांचा.

मोठेपणा असा की शृंगारती मढ्यांना;
करतो कुणी कशाला सत्कार माणसांचा.

बोलून गोड येथे होतात घाव पाठी;
हा कोणता कळेना व्यवहार माणसांचा.

३.चाफा

माणसांनी माणसांना टाळतांना पाहिले;
या इथे मी भावनांना जाळतांना पाहिले.

स्वागतासाठी इथे माझ्या कधी ते बोलले;
मागचा संदर्भ सारा गाळतांना पाहिले.

वाटते झाली विषारी येथली सारी हवा;
मोग-याचे झाड दारी वाळतांना पाहिले.

काळजापाशी असे तू ठेवले आहे मला;
डायरीचे पान जेव्हा चाळतांना पाहिले.

बोललो मृत्यूस मी आलास थोडा थांबना;
मी तुला केसात चाफा माळतांना पाहिले.

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP