Related Posts Plugin for WordPress, Blogger...

२७ सप्टेंबर, २००९

पाच गझला : डॉ.श्रीकृष्ण राऊत

डॉ.श्रीकृष्ण राऊत
९४२२१७६२६३


१.चेहरा

अभिप्राय जाणत्यांचा नाही खरा कुठेही;
प्रोत्साहनात होतो जो बोचरा कुठेही.

येथे परस्परांची या पाठ खाजवाया;
बेट्या नवोदितांना वेठी धरा कुठेही.

वाह्यात कारट्याला शिक्षा करा गुरूजी;
बापास लेक म्हणतो जा!जा!मरा कुठेही.

घोडे किती उपाशी पागेत खंगलेले;
पण गाढवास मिळतो खा तोबरा कुठेही.

गाई तुला शहाण्या दिसतील लंगड्या त्या;
कळपात कोणत्याही जा वासरा कुठेही.

मैत्री असो कि प्रीती,नाती असो घरोबा;
पाहून मतलबाचा घे चेहरा कुठेही.

२.मला सांगा

तहानेल्या किती रांगा,मला सांगा;
कुणी ही चोरली गंगा, मला सांगा.

पणाला लावली अब्रू सभेने ह्या;
कधी येणार श्रीरंगा, मला सांगा.

कळेना त्या सफारीला कथा तुमची;
तुम्हावाणीच मी नंगा, मला सांगा.

दुपारी सावली नाही शिरावरती;
कुणी ह्या छाटल्या डांगा, मला सांगा.

इथे जर पेटले नाही कुठे काही;
झळा का झोंबती अंगा, मला सांगा.

कुठेही बांधला नाही कुणी सेतू;
कशासाठी सुरू दंगा, मला सांगा.

३.खंत

ओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल;
हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझल.

त्या खळीच्या भोव-याने जीव माझा घेतला;
बोलताना मोकळे ती हासली गाली गझल.

तू लिही नशिबात माझ्या संकटांची शृंखला;
फक्त त्यांच्या सोबतीने तू लिही भाली गझल.

हिंडतो का जागजागी तू अनाथासारखा;
ऐक दु:खा हाक मारी ही तुझी वाली गझल.

जन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे;
एक प्याला अंगुराचा, एक ही साली गझल.

पोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी;
एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल.

४.मी गेल्यावर

तू नात्याची पूस आसवे मी गेल्यावर;
जळू नको माझ्या चितेसवे मी गेल्यावर.

माझी साधी ओळख तेव्हा विसरलीस तू;
आज एवढे काय आठवे मी गेल्यावर !

जीवनभर मी ह्या दु:खाला रक्त पाजले;
त्यास विचारा काय तुज हवे मी गेल्यावर.

खडा पहारा ओठांवर दातांचा असता;
जिभेस का ते गुपित बोलवे मी गेल्यावर.

जाळ आपल्या पत्रांना त्या जुन्यापुराण्या;
लिहू लाग तू मजकूर नवे मी गेल्यावर.

अपरात्रीला कधी पापणी भिजवेल उशी;
डोळ्यात चमकतील काजवे मी गेल्यावर.

जरी न आला मला तोडता कधी पिंजरा;
जाळे घेउन उडतील थवे मी गेल्यावर.

५.भाव

लावा खुशाल बोली विक्रीस गाव आहे;
चौकात मांडलेला अमुचा लिलाव आहे.

आनंदराव देती लोकास दु:ख भारी;
त्यांच्या मनात डाकू, ओठात साव आहे.

लावून फास सुटला तो जीव एकदाचा;
जे राहिलेत मागे त्यांना तणाव आहे.

देतोस थोरली तू की धाकटीस नेऊ;
हा कर्ज फेडण्याचा साधा उपाव आहे.

जे जे जिवंत त्यांना कवडी मिळे न फुटकी;
मुडद्यास पण म्हणे की मिळणार भाव आहे

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP