२७ सप्टेंबर, २००९

पाच गझला : खलील मोमीन


खलील मोमीन
९८७०२९४५०७

१.हाव

हाव ठेवते सदा पुढ्यात मागणी नवी;
वस्त्र नेसली तरी दिसे तसीच नागवी.

आव छान आणते,पटेल तेच बोलते;
आस पेरते उरी,स्वरात शब्द लाघवी.

कष्ट टाळण्यास ती उपाय हाच सांगते-
घ्यायचे लुटून ते,म्हणून त्यास वाजवी.

बेरकी अदा तिची पुढे पुढेच धावते;
थांबताच ओढते,तिची त-हाच पाशवी.

मत्सरात लोळते,मदास तेल चोळते;
माजवीत नाचते जिण्यात घोर यादवी.

द्यायचे किती तिला,तिची न भूक भागते;
जी दिली तिला शिवी,म्हणेल ती पुन्हा हवी.

झाड भिंत पाडते तशीच हाव घातकी;
खोड तोडले तरी फुटे फिरून पालवी.

२.अजून

भावले न तिजला हे शब्दाचे घर अजून;
अक्षरास म्हणते ती व्यर्थाची बर अजून.

धन्यतेस बसला तू तृप्तीने जोजवित;
मी न दिला कसलाही श्रद्धेला वर अजून.

वृत्त,छंद,यमकांची छत्री का रे करात;
काय सांग पडली का ऊर्मीची सर अजून?

ना मुळीच भिजले रे गाण्याने अंतरंग;
वेदनेस भिडला ना खर्जाचा स्वर अजून.

बावरून म्हणते ती अंगाला चाचपीत;
रे तुला न चढला त्या ध्यासाचा ज्वर अजून.

तापलास म्हणतोना वाफेचा होत मेघ;
रिक्त सांग दिसते का माझे अंबर अजून?

प्रेम फार हलके ते वा-यानेही उडेल-
त्यात घाल विरहाच्या दु:खाची भर अजून.

३.द्रोह

पाहुनी त्या सभ्यतेचे फेडताना वस्त्र नारी;
संस्कृतीने मान्य केली येथली माता कुमारी.

त्याग गेला,भोग आला, ती व्यथाही देश प्याला;
कायद्याच्या या फटांनी सुन्न ही घटना बिचारी

देशसेवेआड चालू केवढी खाबूगिरी ही;
हाच भ्रष्टाचार राष्ट्रा मारतो टोला जिव्हारी.

सत्यही लाचार झाले, क्षीण झाली न्याय-नीती;
चोर झाला थोर नेता; फेकला गेला विचारी.

संप-मोर्च्यांनी मळाला, देश दंग्यानी गळाला;
भामटे झाल्यामुळे हे दूत शांतीचे पुजारी.

हात कोणी,पाय धरुनी देश ऐसा जाम केला;
लोकसंख्येचा तयाला डोस देताना विषारी.

४.वारा

पदरास यौवनाच्या झटतोच फार वारा;
होऊन गंध येतो स्वप्नास हार वारा.

चाहूल घेत असते मन सारखे कुणाची;
जातो खट्याळ तेव्हा ढकलून दार वारा.

लाजून चूर होते ती दार लोटताना;
खिडकीतुनी उतरतो हलकेच गार वारा.

ऐशी शहारते ती...विरतात शब्द ओठी;
तेव्हा तिच्या उराची होतो सतार वारा.

वेड्यासमान पळतो बघते जिथे जिथे ती;
त्या नेत्रपल्लवीचे साहून वार वारा.

झुलतात त्या दिशाही...म्हणतात मस्त आला-
मृदगंध सोबतीला घेऊन यार वारा.

धरती-नभाप्रमाणे उत्साह-प्रेम देतो;
संकेत सर्जनाचा होऊन सार वारा.

५.गौण

हारल्याची ही कशाला व्यर्थ आता कारणे;
ध्येय रागावून मागे ठेवते धिक्कारणे.

बाळगावे स्वप्न, त्याला जोड कष्टाची हवी;
त्याविना प्रत्यक्ष नाही शक्य ते साकारणे.

चूक होते माणसाची फक्त अज्ञानामुळे;
तो मनाचा थोर ज्याला मान्य ती स्वीकारणे.

जीवनाचा अर्थ जो तो शोधतो आहे इथे;
मात्र नास्तिकास सोपे गूढ ते नाकारणे.

लागती तारा जुळाया या विणेच्या त्यामुळे-
सूर होतो ताल,ठरते सार्थ ते झंकारणे.

हार आहे गौण,जिद्दीला पुन्हा जोपासता-
चालते धैर्यास ध्येयाचे उरी सत्कारणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: