मराठी भाषेत गझल करणार्या कविवर्य सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची गझल गायकी ऐकण्यासाठी उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले़ होते़. सुधाकर कदमांनी सा लावलाच पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका़.
बुधवार १४ जुलैची संध्याकाळ होती़. साहित्य परिषदेच्या सभागृहाबाहेर तुरळक पावसाने नुकतीच हजेरी लावली होती. अशा या धुंद वातावरणात सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचा स्वर यांची जुगलबंदीच सुरू झाली होती़. या जुगलबंदीत सुरेश भटांचे शब्दच अखेर विजयी झाले हे मात्र मुद्दाम सांगावेसे वाटते याची देही याची डोळा हे जाणवले़.
पुणे शहर ही गझलची राजधानी मानणार्या सुरेश भटांची ‘जो भेटला मला तो वांधा करुन गेला’ या गझलेने कार्यक्रमास सुरुवात झाली़.
शब्दातला ठसका, डौल आणण्याचा प्रयत्न करत सुधाकरराव गझलची एकेक ओळ उलगडून ऐकवित होते़, रसिकांच्या टाळ्या मिळवीत होते़. गझलेला प्रत्येक मुखडा शब्दाच्या आधाराने स्वरात दाखविण्याचा कदमांचा तो प्रयत्न होता़,
‘चाहूल ही तुझी की ही हूल चांदण्यांची । जो चंद्र पाहिला मी तोही दुरुन गेला.’
यातील ‘चाहूल’ शब्दाचा ‘चांदण्यांशी’ लावलेला संबंध आपल्या शैलीत सुरेल संगमाने कदम डोळ्यासमोर तो प्रसंग उभा करतात़.
गझल भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते; तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यापर्यंत पोचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे़.
‘कुठल्या तरी व्यथेच्या बहरात हिंडलो मी नव्हती फुले कुठेही’
ही रमण रणदिवे यांची वेदना ते जितक्या तन्मयतेने सादर करतात़ त्याच एकाग्रपणे -
‘दिशा गातात गीते श्रावणाची कुणाला याद तान्हेल्या तृणाची’
ही भटांची गझलही तिच्या प्रवृत्तीप्रमाणे हळुवार प्रत्येक शब्दाला फुंकर घालत गाणे हेच तर कदम यांचे वैशिष्ट्य़
‘आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही
आम्ही घरोघरी अन् आम्हाला नाव नाही’
यवतमाळच्या शंकर बढे यांची खंत कदम व्यथीत स्वरांनी सादर करतात़.
गझल गाण्यातील महत्वाच्या गोष्टी म्हणजे शब्दातील खटके, आणि शेवटची रचना़ या रचनेसाठी अगोदर गझलवर प्रेम करून मराठी भाषेच्या ज्ञानभांडारात गझलकाराने शिरायला हवे़.
गझल गायकाने मराठी गझल समजून त्यातील अर्थ गाण्यातून पोचवायला हवा़. त्याचा आवाज दर्दभरा हवा, गोड तितकाच तीक्ष्ण व धारदाऱ. लोकांची हृदयं हेलावून सोडणरा हवा़. त्याचे शब्द म्हणजे धनुष्यातील निघालेला बाण की ज्यांनी सुटायचे ते थेट रसिकांच्या मनातच प्रवेश करायचा़.
सुधाकर कदम यांचा आवाज गोड आहे़ पण स्वरांत दर्द नव्हता़. प्रेम, विरह, दुःख, जाणिवा, स्वप्ने यांची जिथे आशा निराशा सांगितली जाते तिथे मने भेदून जाणारा आवाज आवश्यक होता़ कदमांकडे तो नाही़
संगीत या दृष्टीने त्यांचा कार्यक्रम फारसा आकर्षक ठरत नसला तरी गझल गाण्याच्या धाडसी प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल़ आणि मराठीच्या श्रेष्ठ कवीची सुरेश भटांची पाठीवर शाबासकीची थाप पडावी यातच सारे आले.
‘साय मी खातो
मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा
झिजवू कशाला’
असे भट म्हणत असले तरी
‘रात्र वैर्याची पहारा
सक्त माझा
जागणारे शब्द
मी निजवू कशाला’
या ओळींची कदमांनी आठवण ठेवून जनसामान्यांपर्यंत मराठी गझल पोचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़.
‘मैफलीत तू माझ्या
पाहतेस का खाली
हाय लाजणार्याने
जागणे बरे नव्हे.’
असे भट म्हणत असले तरी अशा मराठी काव्याचा हा प्रकार अनेक मैफलींनी सर्वत्र पसरायला हवा़.
मूळ संस्कृत भाषेत तयार झालेला हा प्रकार पुढे उर्दूत श्रेष्ठ ठरला़ आणि आज पुन्हा मराठी गझलला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे़.
गझल म्हणजे बंदीश कशी हवी हे सांगताना सुरेश भट म्हणतात, ‘गझल म्हणजे फर्ग्यूसनमध्ये बेल बॉटम पॅंट आणि अंगात कुडता घालून जाणारी तरुणी नव्हे़ तर गझल म्हणजे ३०-३२ वर्षाची पुरंघ्री़ खांद्यावर व्यवस्थित पदर घेऊन चालणारी डौलदार स्त्री.
मराठी मातीचा सुगंध देणारी गझल निर्माण होत आहे़ पुण्याचा रमण रणदिवे आणि यवतमाळचे शंकर बढे हे दोन कवी गझलची परंपरा पुढे नेणारे आहेत़ अशी ग्वाहीही भटांनी कार्यक्रमात बोलतांना दिली़.
गझल भावगीत किंवा पॉप म्युझिकसारखी गायली जाणे म्हणजे तुकारामाचा अभंग इना मीना डीका प्रमाणे म्हणण्यासारखे आहे.(भटांचे मत बरंका) म्हणूनच ती कशी गावी यासाठी सुधाकर कदमांचा ‘अशी गावी मराठी गझल’ कार्यक्रम पुण्यात केला गेला़
‘मेल्यावरी जगाचे
आभार मानले मी
जाऊ दिला मला हे
उपकार मानले मी’
सुरेश भट असे जरी म्हणत असले तरी आम्ही मात्र ते ऐकविल्याबद्दल निश्चित त्यांना धन्यवाद देऊ.
अशी बहारदार सायंकाळ केवळ सुरेश भट आणि सुधाकर कदम यांनीच सजविली नाही तर त्यात साथीदारांचाही मोठा वाटा आहे़.
ग्वाल्हेरचे उस्ताद दाऊतखानांचे शिष्य शेखर सरोदे यांनी असा तबला वाजविला की, ज्याला अनेक वेळा टाळ्या मिळाल्या़. लतीफ अहमद खान यांची सारंगी तर स्वराला साजेलशी बैठक अगोदरच तयार करत होती़ सारंगीची साथ होती म्हणून तर तिची याद होती़.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा