‘हरचंद सुरीली नगमोंसे
जजबात जगाये जाते है,
उस वक्त की तलखी याद करो,
जब साज मिलाये जाते है।’
निःसंशय सुरेल गीतांनी आपल्या भावना उल्हासित, प्रफुल्लित होतात़. परंतु त्या एकमेवाद्वितीय क्षणाची उत्कटता लक्षात घ्या की जेव्हा वाद्ये स्वरात मिळविली जातात़. निःसंशय तो क्षण शब्दातीत, वर्णनातीत आहे़. तितकाच शब्दातीत, वर्णनातीत तोहि क्षण आहे की जेव्हा गायक तन्मय होऊन गात असतो. आणि स्वरवेडा श्रोता आपले प्राण कानात आणून ऐकत असताना आत्मविस्मृतीत जातो़. एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती, किमया, करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे़. माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले. त्याचे गमक वरील शेरमध्ये आहे़.
कुणाशी नाते जुळते ते उगीचच नाही़. खटपट, प्रयत्न करुन जुळविण्याची ही बाब नाही़. आपल्या काही ऋणानुबंधाच्या गाठी पडलेल्या असतात़. त्या केव्हा पडलेल्या असतात याची आपल्याला कल्पनाही नसते़. परंतु केव्हातरी अनाहुतपणे ती आपल्याला सापडते. आणि त्या गाठीचे रहस्य उलगडत जाते़. त्यावेळी जो आनंद होतो त्या सुखद संवेदनांचं वर्णन करता येत नाही़. माझा आणि सुधाकर कदम यांचा संबंध आला त्याचं रहस्य या ऋणानुबंधाच्या गाठीत आहे़. मला एकवेळा गुरुवर्य पुरुषोत्तमराव कासलीकर म्हणाले होते, “बाबुरावजी, स्वरराजांच्या स्वराला मधाची उपमा दिल्याने मधाची महती वाढते, स्वरराजांची नाही!" आज एका निमित्ताने सुधाकर कदम विषयी लिहीत आहे, तेव्हा मला नेमकं वरील विधान आठवलं. वाटते की माझ्या लिहीण्याने सुधाकरची शान वाढत नाही; वाढलीच तर माझी वाढेल़. मी एक स्वरवेडा माणूस आहे़; तो कानी पडला की माझं मन तिकडे धाव घेते़. त्यावेळी माझी जात कोणती पुसू नका. आठवते़ सुधाकर स्वराचा ठेवा आहे़. स्वराचा वाहता निर्झर आहे़. त्या ठेव्याजवळ बेभान होऊन धाव घेणे हा मधुकराचा स्वभावधर्मच आहे़. नाही तरी ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ आपल्याला हाच संकेत देतो की नाही?
या साडेतीन दशकात अतूट, अजोड सहवासातून मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकलं आहे़. नाट्यपदे ऐकली आहेत़. त्यांची गझल गायकी ऐकली आहे़. पदेही ऐकली आहे़. हे सर्व ऐकून माझे मन प्रसन्न झाले आहे़. याचे कारण हे की या वेगवेगळ्या गायकीमधून जात असतांना त्यांनी आपला स्वर सोडला नाही़. तालाचे तर भान ठेवलेच पण गायकी ही श्रोत्यांना प्रसन्न करणारी असावी याचेही अवधान ठेवले. यातच त्यांच्या गायकीचे गम्य आहे़. सुधाकर जेव्हा गझल गायकी कडे वळले; त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टीकाही झाली असेल, पण ते बरोबर नाही़. साचेबंद ख्याल गायकी आणि राग दारीच्या पूर्वापार चालत असलेल्या मजबूत बंदिशी मधून ते घरसले असे म्हणता येईल का? महाराष्ट्रीय श्रोता नाट्यपदवेडा आहे़. ख्याल ऐकल्यानंतर आपल्या आवडत्या नाट्यगीताची तो फरमाईश करतोच़. परंतु त्या नाट्यपदाला कोणता रागाधार आहे. वगैरे चौकशा करुन त्या पदाचा उपमर्द करतो का? नाही ना?
दिले नादॉं तुझे हुवा क्या है ।
आखिर इस दर्द की दवा क्या है ॥
ही मिर्झा गालिबची गझल कोणत्या एका रागाच्या ख्याल गायकी अंगाने गायची. हा जगावेगळा अट्टाहास वरील गझलचा आशय, अर्थ, भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे; यात गझल गायकाचे कौशल्य आहे़. आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा आधक अवधान बाळगले आहे़. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून, विलंबित ख्याल गायक, ज्याला अक्षरमंत्राचा साक्षात्कार झाला आहे, तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल़. या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे़.
स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले़. त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्योत्तम श्री पुरुषोत्तम कासलीकरांकडे असे़. अशावेळी मला आवर्जून बोलाविल्या जायचे़ .स्वरराज आले की कासलिकरांच्या घराला सम्मेलनाचे रुप यायचे़. या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे पेश असत़. छोटा गंधर्व त्यांचेशी विशेष सलगीने, आपुलकीने वागत असतांना मी त्यांना पाहिले आहे़. अनेकदा हार्मोनियमच्या साथीला सुधाकर कदम यांना बरोबर घेऊन जायचे़.माहुरचे आद्य दैवत श्री रेणुकादेवी़. रेणुकेचे नवरात्र हे माहुरच्या खास आकर्षणाचा काऴ. त्यातल्या त्यात ललिता पंचमीचे महत्व तर अनन्य साधारण़. आपली संगीत सेवा रेणुकेच्या चरणी अर्पण करण्यास दूरजवळचे अनेक कलाकार येत़. त्यात सुधाकर कदम हे प्रामुख्याने असत़. त्या दिवशीच्या संचलनाची जिम्मेदारी आम्ही त्यांचेवर टाकत असू़. ही जबाबदारी ते रात्री नऊपासून सकाळी सुर्योदयापर्यंत निरलसपणे पार पाडत़. संगीत महफिलीचे संचलन करणे ही स्वयं एक कलाच आहे़. त्याला संगीताचा आत्मा ओळखणारा जाणकारच हवा़. येर्या गबाळ्याचे ते काम नाही़. संगीताप्रमाणे गोड वाणी, प्रसन्न मुद्रा, उत्तम जोपासलेले शरीर सौष्ठव, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे ते त्या नऊ-दहा तासाच्या स्टेजवर मानापमानातल्या धैर्यधरासारखे वाटत़. यावेळचा त्यांचा पोषाखही अगदी प्रसंगाला अनुरुप असा चोखंदळ असे़. अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्र- मध्यप्रदेशात गाजली़. त्यांच्या मैफिलींचे वृत्त वर्तमान पत्रातून मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा़.
सुधाकर कदम आर्णीला़ स्थायिक झाले़. गांधर्व संगीत विद्यालय ही स्वतंत्र संस्था निर्माण करून संगीताचे दान त्यांनी दिले़. या संस्थेच्या विद्यमाने ते दरवर्षी संगीत सम्मेलन घेतात़. या वेळी ते जीव ओतून त्यात राबतात़. सम्मेलन असते एक ना दोन दिवसाचे़ पण त्यामागचे जे कष्ट एक महिना आधीपासून उपसावे लागतात; याचा प्रामाणिक आढावा घेतला तर सम्मेलन काय असते ते कळेल़. संगीत सम्मेलनासोबतच अभिनय कला मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, तालुका पत्रकार संघ, सरगम, अशा अनेक संस्थांची स्थापना करून सामाजिक, राजकीय, सांगीतिक, बौध्दिक या सर्व स्तरावर आपल्या जीवनाची वाटचाल दमदारपणे चालत असता त्यांनी थोड्याच काळात अमाप लोकप्रियता मिळवली़. हिंदु आणि मुस्लिम समाजात ते सारखेच लोकप्रिय आहेत़. हरदिल अजीज आहेत़. भावी आयुष्यात त्यांना आणखी लोकप्रियता मिळो, सगळ्यांचे हरदिल अजीज होवो ही या रौप्य महोत्सव प्रसंगी कामना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा