१३ नोव्हेंबर, २००९

सर्जनशील संगीतकार : प्रा़. निवृत्ती पिस्तुलकर



काही माणसांना गावांमुळे ओळखल्या जाते तर काही गावांना माणसांमुळे ओळखल्या जाते़. अशाच धर्तीवर आर्णी गावाला सुधाकरराव कदमांमुळे ओळखल्या जाते. ही आम्हा आर्णीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे़. श्री महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक असलेल्या या असामान्य व्यक्तिमत्वाच्या धन्याने आर्णी गावाला सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय वळण देऊन महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आर्णीचे नाव चमकवले़. मराठी गझल गायक म्हणून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ मध्ये व राष्ट्रीय एकात्मतापर गाण्यांना स्वरसाज चढवून ही गाणी तामिळनाडु ते पंजाबपर्यंत पोहचवून आर्णी नावाच्या लहानशा गावाला मोठी कीर्ती मिळवून दिली़.
गेल्या २२ वर्षांच्या कालावधीत आर्णीच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव प्रयत्नशील असलेल्या सुधाकररावांनी शिवजयंती, दत्तजयंती, भातखंडे-पलुस्कर पुण्यतिथी, विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धा, राज्य स्तरीय मराठी गीत-गझल गायन स्पर्धा, कलावंत मेळावे, कविसम्मेलने, वृक्षारोपण, संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गीतमंच-एकसूर एकताल शिबिरं असे उपक्रम राबवून व गांधर्व संगीत विद्यालय, ‘अभिनय कला मंडळ’, ‘सरगम’ अशा संस्था स्थापन करून आर्णी गावाला एक वेगळा सांस्कृतिक दर्जा प्राप्त करुन दिला़. १९७२ च्या दरम्यान सतत तमाशाप्रधान मनोरंजनात गुंतलेल्या आर्णीकरांना वरील उपक्रमाद्वारे उच्च अभिरुचीकडे ओढत नेले़. हे करतांना त्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास निश्चितच झाला, पण हे कार्य आर्णीच्या नवीन पिढीकरीता अत्यंत मोलाचे ठरले़.
आर्णीतील शिवसेनेची चळवळही सुधाकररावांमुळेच सुरू झाली व त्यांच्या मेहनतीला फळ येवून आज आर्णीला एक (पहिला वहिला) आमदार मिळाला आहे़. त्यांच्या विविध उपक्रमामुळे आर्णीतील अनेक तरुण सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर असून विविध उपक्रम राबवीत आहेत. तसेच पाठ्यपुस्तकातील कवितांच्या ध्वनिफितीमुळे व व्हिडिओ कॅसेटमुळे संगीतकार म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थी त्यांना ओळखतात़. आज शेकडो शाळांमधून त्यांनी स्वरबध्द केलेली गाणी हजारो विद्यार्थी रोज गात आहेत़.
नवोदित संगीत शिक्षक व विद्यार्थ्यांची अडचण ओळखून त्यांनी शालोपयोगी विविध गीत प्रकाराचे ‘सरगम’ नामक पुस्तक तयार केले़. सर्व शाळा, महाविद्यालयांनी संग्रही ठेवावे असे हे पुस्तक तयार करण्याकरिता त्यांना १० वर्षे अथक परिश्रम घ्यावे लागले़. या पुस्तकातील बहुतेक गाणी पुण्याच्या बालचित्रवाणीवरून व आकाशवाणीवरून प्रसारित झाली आहे़त. यवतमाळ जिल्हा प्रौढ साक्षरता अभियान समितीतर्फे तयार झालेली ‘अक्षर गाणी’ ही ध्वनिफित सुधाकररावांच्या स्वरसाजाने नटली आहे़. त्यातील शंकर बडे यांचे ‘कशी सांगू राया तुले, नाही वाचता ये मले’ हे वर्‍हाडी बोलीतील गीत, सुधाकररावांच्या सखोल अभ्यासाची व नेमक्या स्वररचनेच्या कुशलतेची जिती जागती मिसाल आहे़.
आर्णी परिसरातील संगीत शिकू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना गांधर्व संगीत विद्यालय हे एक वरदानच ठरले आहे़. येथेच परीक्षा केंद्रही असल्यामुळे दरवर्षी ५० च्या वर विद्यार्थी गायन, तबला, मेंडोलिन, हार्मोनियम, सरोद, बासरी वगैरे विषयांचे शिक्षण घेऊन परीक्षेला बसतात. कोणाच्याही आर्थिक पाठबळाशिवाय गेल्या २३ वर्षांपासून ही संस्था सुधाकरराव चालवत आहेत. तर काही विद्यार्थी आकाशवाणीवरुन कार्यक्रम सादर करण्यापर्यंत पोहचले आहे़त. तर काही विद्यार्थी बालचित्रवाणीवर पोहचले आहे़त. ग्रामीण भागात संगीताचा प्रसार करणे व विद्यार्थी तयार करणे हे किती जिकरीचे काम आहे हे फक्त जाणकारच सांगू शकतील़.
दूरदर्शन, आकाशवाणी, बालचित्रवाणीद्वारेच नव्हे तर हाथरसच्या ‘संगीत’, मुंबईच्या ‘नादब्रह्म’ या मासिकाद्वारे आपल्या स्वररचना सतत लोकांपर्यंत पोचवणार्‍या सुधाकररावांनी गेल्या एक-दीड वर्षात ‘विषयांतर’ लिहून लेखक म्हणूनही मान्यता मिळविली आहे़. अशा या सर्जनशील संगीतकार कलावंताला नागपूरच्या मा़. बा़. गांधी चॅरिटेबल ट्रस्टने पुरस्कृत केले़. त्याबद्दल ट्रस्टचे आभार मानून, सुधाकररावांना आर्णीची शान वाढविणारे असे अनेक पुरस्कार मिळो, ही सदिच्छा बाळगून आर्णीकरांतर्फे अनेक शुभेच्छा़.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: