माझे मित्र सुधाकर कदम यांचे नाव प्रामुख्याने संगीतकार म्हणून आणि विशेषत्वाने मराठी गझल गायक म्हणून सर्वविख्यात आहे़. आर्णी-यवतमाळच्या भागात संगीत शिक्षक म्हणूनही ते अनेकांना परिचित आहेत़. त्यांचे एकूण व्यक्तिमत्व संगीताच्या दुनियेशी मेळ खाणारे आहे़. म्हणजे असे की भरपूर उंची, गोरापान रंग, नीटस नाक-डोळे आणि डोक्यावरील कुरळ केस असे त्यांचे दर्शन आहे़. त्यावरून सहजपणे कुणालाही वाटून जावे की, हा माणूस नक्कीच गायक-कलावंत असणार! फार कमी लोकांना अशी एकरूपता लाभत असते़. आपण पाहतोच ! निसर्गाने ज्यांच्या कंठामध्ये मधाचे पोवळे ठेवले आहे त्यांना रंग आणि रूप देतांना मात्र त्याने फार कंजूषपणा केलेला आहे़. अर्थात यालाही-अपवाद असतोच़. विशेषतः जे गझल गायक-कलावंत असतात ते तर निश्चितच याला अपवाद दिसून येतील़. सर्वच कसे देखणे, रुबाबदार! सुधाकर कदम हेही त्याच मालिकेतले़. आर्णीसारख्या आडगावात राहूनही त्यांनी गायकीचा रंग-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला़. संगीताच्या प्रसारासाठी संगीताची शाळा काढली़. स्वतःच्या पदराला खार लावून घेत कार्यक्रम केले़. आपले आणि आपल्या वाद्यवृंदाचे वेगळेपण ठसविण्यासाठी गझल या प्रकारातील गीतांची निवड केली़. ती करतानाही त्यांनी अनवट अशी वाट निवडली़. ‘मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला़. हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे़. हिंदी, उर्दू-हिंदूस्थानी, मराठी या केवळ भाषा नाहीत़. भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते़. संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यामुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो. गझल च्या संदर्भात ते अधिकच खरे आहे़. कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे़. अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाऴ. अव्वल इंग्रजीच्या काळात केव्हा तरी मराठीने गझलचे वृत्त-लेखन स्वीकारले़. त्या सर्व तपशिलामध्ये जाण्याचे येथे कारण नाही़. सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले़. ही वाट वहिवाट नव्हती़. हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती़. सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला़. कित्येक वर्ष तो या खटाटोपीच्या मागे होता़. पुढे त्याने स्वर-लेखन केले़. त्याचा अर्थ असा की तेथे स्वर हा घटक प्रधान होता़. ‘लेखन’ ही दुय्यम बाब होती़. त्याच्या कार्यक्रमातही ‘गझल’ हा प्रकार प्रधान होता; ‘मराठी’ हा त्याचा पेहराव होता़. कित्येक वर्ष तो या केंद्राभोवती घुटमळत रमला़. अगदी परवा परवा पर्यंत त्यात अंतराय असे आले नव्हते़. मराठीतील कवी आणि त्यांच्या रचना यांचेशी त्याची सलगी होती खरी, पण त्यामागचा हेतू ‘गझल रचना मिळणे’ हा होता़. कदाचित् त्या जोशाजोशात त्याने कविता-लेखनही करून पाहिले असेल, पण तेही पुन्हा गाण्यासाठीच होते़. असे असताना, माझ्या समजुती प्रमाणे, तो अचानक स्फुट लेखनाकडे वळला़. योगायोगाने त्याच वेळी नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकामधून त्याच्या संपादकीय पृष्ठावर ‘विषयांतर’ हा स्तंभ येत होता आणि त्यातील हलक्या-फुलक्या लिखाणामुळे तो स्तंभ वाचकांच्या व लेखनाची सुरसुरी असणार्यांच्या आवडीचा स्तंभ झाला होता़. सुधाकरने अलगद त्या स्तंभावर झेप घेतली आणि गायनीकळा लाभलेला सुधाकर कदम लेखन-कलेने बाधित झाला!
सुधाकर कदम यांच्या गायक असण्याचा, तो शिक्षक असण्याचा, वाद्यवृंद संघटक असण्याचा वर मी थोड्या अधिक तपशिलाने उल्लेख केला आहे़. त्याला तसेच कारण आहे़. आयुष्याची मोलाची बरीच वर्षे या क्षेत्रामध्ये झिजतांना माणसांचे जे चित्रविचित्र नमुने आणि अनुभव त्याच्या गाठी जमा झाले होते; त्या अनुभवांना त्याच्या ‘विषयांतर’ मधील स्फुट-लिखाणाने एक चांगला पाट मिळाला आहे़. संगीताची जाण ठेवणार्यांना आणि विशेषतः गीत-गायकांना कवितेची-काव्याची व बर्या-वाईट साहित्याची ओळख असायलाच हवी असते़. सुधाकरच्या ठिकाणी ती ओळख पिण्डतःच होती़. त्याच्या या पुस्तकात संग्रहित झालेल्या स्फुट-लेखांवरुन वाचकांना त्याची सहजच कल्पना येईल़. उदाहरणावरून यातील शीर्षकाचा स्फुटलेख पहा़. त्याची सुरवातच श्री़. म़. माटे आणि त्यांच्या ‘भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी’ या पाठाच्या उल्लेखाने होते़. जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर ‘माटे मास्तरांचा हा धडा’ अनेकांनी अभ्यासिला असेल़.परंतु नेमक्या ठिकाणी त्याचा संदर्भ देण्याचे कसब त्यातल्या फारच थोड्यांना साधले असेल़. मुळात साहित्य व त्याची आवड असेल तरच पाठ्यक्रमातून जाणारे असे संदर्भ संबंधिताला आठवतील, ही बाब येथे लक्षात घेण्यासारखी आहे़. स्फुटासाठी सुधाकरच्या कामी हा संदर्भ जसा हुकुमासारखा येतो त्याचप्रमाणे गायकी कलेतील प्रत्यक्षातला अनुभवही कामाला येतो़. हे अनुभव इतर सामान्य अनुभवापेक्षा वेगळे असतात, आणि लेखकाच्या हातोटीमुळे ते पैलूदार बनतात़. त्याचाही प्रत्यय या संग्रहात वाचकांना ठिकठिकाणी आल्याखेरीज राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो़.
सुधाकर कदमचे हे लिखाण अर्थातच स्फुट स्वरूपाचे आणि विरंगुळ्यासाठी केलेले लिखाण आहे़. अशा लिखाणाची खुमारी त्याच्या मांडणीत, आणि लेखकाचे ठायी असणार्या निरीक्षणाच्या ताकदीत सामावलेली असते़. तसे त्यातले अनुभव, त्यातले प्रसंग, प्रसंगविशेषी दिसून येणार्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव, त्यांचे वर्तन, त्यांचा व्यवहार आपल्या नित्याच्या अवलोकनाचाही असतो़. परंतु त्याकडे आपले लक्ष जातेच असे नाही़. लेखक आणि वाचक यांच्यात हीच एक रेषा असते़. वाचक जेव्हा ही रेषा ओलांडतो तेव्हा तोही लेखक होऊ शकतो़. ज्यांना ती रेषा पार करता येत नाही त्यांना या प्रकारच्या लेखनामुळे एकप्रकारचा विविध पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो़.
सुधाकर कदमच्या या पुस्तकातून त्याच्या वाचकांना असा आनंद मिळेलच याविषयी मला मुळीही शंका नाही़. अशी शंका नसणे हे लेखक म्हणून सुधाकरचे यशच मानले पाहिजे़.
(‘फडे मधुर खावया’ या पुस्तकाची प्रस्तावना : वामन तेलंग, नागपूर : कार्तिक एकादशी / १९९८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा