सुधाकर कदम हे नाव आता महाराष्ट्राला अपरिचित राहिले नाही़ ह्या नावाने संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला आहे़ पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाते़ तेथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधव जुलियन सभागृहात झालेला श्री सुधाकर कदम यांचा मराठी गीत-गझलचा कार्यक्रम मी प्रथमच ऐकला आणि उर्दू गझल प्रमाणेच मराठी गझलही गझलप्रमाणे गाईल्या जाऊ शकते व श्रोत्यांची भरपूर दादही घेऊ शकते याची प्रचीती आली़ या कार्यक्रमाकरिता झालेली गर्दी पाहून मी सुध्दा आश्चर्यचकित झालो़ वरील सभागृह बांधल्यापासून श्री सुधाकर कदम यांच्या कार्यक्रमाला झालेल्या प्रचंड गर्दी इतकी गर्दी या सभागृहाने आतापर्यंत पाहिली नाही़ अशी कबुली म़. सा़. प़ च्या अध्यक्षांनी जाहीरपणे दिली़.
सुधाकर कदम यांच्या आवाजात मला काही दोष आढळलेत़ पण हे दोष ते आपल्या ढंगदार गायनाने, गझलच्या सादरीकरणाने व स्पष्ट, शुध्द, शब्दोच्चाराने भरुन काढतात़ गझलच्या सुरुवातीलाच एखादा शेर सादर करुन हळूहळू गझल फुलवीत नेण्याची किमया या माणसाला चांगल्याप्रकारे साधली आहे़.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसारख्या गावात राहून त्यांनी हे कसं काय आत्मसात केलं याचं राहून राहुन नवल वाटतं. गझलच्या बंदिशीही त्यांनी आतशय सुबकपणे बांधल्या आहेत़ दिशा गातात गीते श्रवणाची कुणाला याद तान्हेल्या तृणाची ही सुरेश भटांची गझल त्यांनी आतशय वैचित्र्यपूर्ण बंदिशीत सादर केली, त्यावेळी मी अवाक झालो़ जैजैवंती रागात ही बंदिश असून रुपकमध्ये तालबध्द केली आहे़ रुपक म्हणजे मुळातच विषम मात्राचा ताल, त्यात गझलचा मुखडाच मुळी साडेतीन मात्रापासुन सुरु होणारा़ रसिकांना दाद देणे भाग पडले़ तसेच तान्हेल्या या शब्दावर जयजयवंतीमध्ये नसलेला कोमल धैवत वापरुन सुधाकर कदमांनी शब्द व स्वरांचा सुंदर समन्वय कशाप्रकारे साधता येतो याचे प्रात्यक्षिकच दिले़ तसेच ‘हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही; चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’ या गझलमध्येसुध्दा ‘कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता’ या ओळीतील ‘वेगळा’ शब्दाचा वेगळेपणा वेगळ्या सुरावटीद्वारे स्पष्ट केला़. देशकार, रागाच्या बंदिशीत ललितसारखा राग बेमालूमपणे मिसळून, आशयाची हानी होऊ न देता पुन्हा सर्व सुरावटीवर येणे हे किती कठीण काम आहे; ते संगीताचे जाणकारच सांगू शकतील़. आतापर्यंत मी, कदमांच्या अनेक मैफिली ऐकल्या़ पुण्याच्या म़. सा़. प़ ची (येथे निवेदक कवी सुरेश भट स्वतः होते) व अचानक यवतमाळला आलो असताना २ ऑक्टोबरची यवतमाळ कॉटन सिटी जेसीजने आयोजित केलेली नगर भवनातील मैफिल या तीनही मैफिलीत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की, सुधाकर कदमांच्या प्रकृतीतच मराठी गझल भिनली आहे़.
यवतमाळलाही रात्री दोन वाजेपर्यंत श्रोत्यांना खिळवून ठेवून सतत दाद घेत असलेल्या कदमांना मी पाहिलं. त्यांच्यासोबत असलेले निवेदक श्री खान हेही एक वेगळंच व्यक्तिमत्व माझ्या पाहण्यात आलं. खानांचे निवेदन व कदमांची गझल ह्या एकजीव होऊन रसिकांना आनंदाचा आगळावेगळा अनुभव देतात़.
कार्यक्रमानंतर मी कदमांना भेटलो़. बराचवेळ चर्चा केली़. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ २०० कार्यक्रम केले आहेत़. मी एक निष्कर्ष काढला़ सुधाकर कदमांना मराठी गझल महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे-जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पोहचवायची व लोकप्रिय करावयाची आहे, अशी त्यांची इच्छा आहे़.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा