१३ नोव्हेंबर, २००९

गायक-वादक-संगीतकार ‘सुधाकर’ : सौ़. रजनी करकरे-देशपांडे



१९८२ च्या सुमारास सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. आणि हा कार्यक्रम आंबा टॅनीन ऍंन्ड पोल्सन उद्योगाचे व्यवस्थापक श्री़ वा़. रा़. राजंदेकर ह्या माणूसवेड्या व संगीतप्रेमी व्यक्तीने आखला होता़. श्री राजंदेकर मला आपली मानसकन्या मानत होते. त्यामुळे ह्या कार्यक्रमास मला आवर्जून बोलावण्यात आले़. मी ही एक गायिका आहे. गझल हा उर्दू-हिन्दी भाषेतला प्रसिद्ध गायन प्रकाऱ. मराठीत गझलेला मानाचे स्थान देण्याचे काम कविवर्य सुरेश भट ह्यांनी केले़. आणि सुरेश भटांच्या गझलेबद्दल व्यक्तिशः मला प्रेम असल्यामुळे व त्यांच्याच जवळजवळ सर्व गझला व गीते सुधाकर कदम गाणार आहेत असे समजल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची एक वेगळी उत्सुकता मनात होतीच़. कदमांनी सर्व गीते गझल स्वतःच स्वरबद्ध केल्या होत्या़. चाली आकर्षक, अर्थाला अनुरुप अशा होत्या़. विशेष म्हणजे कार्यक्रमात ते स्वतःच निवेदन करत होते. त्यामुळे नीटनेटकेपणा होता़. एरवी निवेदक कंटाळवाणे बोलून श्रोत्यांना नकोसे करू शकतो़. एकूण कार्यक्रम चांगला झाला व कदमाबद्दल कौतुक वाटले़. एकच व्यक्ती हार्मोनियम वाजवते, गाते, बोलते व संगीतही देऊ शकते, हे वेगळेपण होतेच़. गझल, ठुमरी ह्या प्रकारच्या गायनाला तबला साथ फार तयारीची लागते. पुण्याचा शेखर सरोदे नामक एक तरुण तबलजी कदमानी साथीला आणला होता़. तबला साथी मुळे कार्यक्रम बहारदार झाला़. कार्यक्रमानंतर ओळखही झाली आणि नंतर पत्रव्यवहाराने ती दृढ झाली़. कोल्हापुरातील पहिल्या कार्यक्रमापासून माझी ओळख झाल्याने ते परत आले तेव्हा माझे घरी राजंदेकर बाबाबरोबर आले़. यावेळी संगीत गप्पा- एकमेकांचे संगीतातील नवीन उपक्रम ह्यातूनच एक स्नेहबंध जुळत गेला़. पुढे अधुन मधुन एकमेकांची विचारपूस करणे, नवीन वार्ता कळवणे वर्गरे देवाण घेवाण सुरू झाली़. सुरेश भट, नारायण कुळकर्णी कवठेकर आणखी काही वैदर्भीय कवी यांच्या एकत्रीत परिचयाचे दुवे जुळले़.
सुधाकर कदम यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावचे़. त्यांच्या परिचयामुळेच हे गांव कळले. त्यांचे काम ही कळले़. गाण्याबरोबरच हार्मोनियम, सरोद वादनातील त्यांची गती कळली़. तब्येतीच्या तक्रारी झेलत संगीत साधनेचे काम ते नेटाने करताना आढळले़. १९९६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ललितकला मानद शिक्षिका म्हणून मी काम करत असल्याने कदमांविषयी डॉ़. भारती वैशंपायन ह्यांच्याशी बोलून, सुधाकर कदमांना सुगम संगीताची कार्यशाळा घेण्यास निमंत्रण दिले़. ह्याच सुमारास श्री कदमांचे ‘सरगम’ हे शालोपयोगी विविध गीत प्रकारांच्या स्वरलिपीचे पुस्तकही पाहण्यात आले. त्यातील एक दोन गीते सामुदायिकरित्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवली़. ह्या निमित्ताने दोन तीन दिवस सौ़. कदमांसह ते विद्यापीठ गेस्टरुममध्ये राहिले़. त्यांची शिकविण्याची सुंदर धाटणी, प्रसन्न व्यक्तिमत्व ह्यामुळे विद्यार्थी वर्ग खुश होता़. समुहगीते चांगल्यातर्‍हेने तयार झाली़. चाली सोप्या पण आकर्षक होत्या़. सहसा गायक व संगीतकार एकत्र मिळत नाहीत. पण कदमांचे ठायी हा दुर्मिळ योग आहे़. त्यांनी मलासुध्दा बर्‍याच सुरेख चाली देऊन गाणी सांगितली आहेत़. नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला़. संपूर्ण महाराष्ट्रभर असे गीत प्रचाराचे कार्य करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्णार्थाने साकार झालेले नाही़. सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे सततचे सहकार्य अपेक्षित आहे़.
मला आमच्या या कलाकाराचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे़. आर्णी सारख्या गावात राहुनही त्यांनी मोठे प्रचारकार्य केले आहे़. सामाजिक बांधिलकी जपली आहे़. पुण्या-मुंबईत वास्तव्य असते तर अशा कलाकाराचे अधिक चीज झाले असते़. संगीताबरोबरच चित्रकलेचे अंग ही कदमांकडे आहे़ जिथे संगीत असते तिथे चित्रकलाही जुळ्या बहिणीप्रमाणे हजर असते़. अशा या कलाकाराचा परिचय मला राजंदेकर बाबामुळे जवळून झाला. व संगीत स्नेहबंध दृढ झाले ह्याचा मनाला फार संतोष वाटतो़.

*****************************************************
३५/जी३ प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटी, रंकाळा पार्क, कोल्हापूर-४१७१०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: