१० एप्रिल, २०१०

चार गझला : अभिषेक उदावंत

अभिषेक उदावंत
९९२२६४६०४४


१.सूर्य

सावलीने देव जेव्हा बाटला;
देव तेव्हा खूप छोटा वाटला.

या जगाला फक्त मी देतो शिव्या;
अन्यथा मी खूप आहे चांगला.

जास्त झाला त्रास त्याचा यामुळे
वाद करणाराच होता आपला.

बोलण्याचा काय झाला फायदा;
अर्थ जर सोयीप्रमाणे लावला.

दर्शनाला लांब रांगा लागल्या
देवळांचा छान धंदा चालला.

बंद केले दोन डोळे जर तुम्ही
एवढयाने सूर्य कोठे झाकला ?


२. दीक्षा

आम्हास खूप ज्ञानी माना, अशी अपेक्षा;
आम्हीच फक्त येथे करतो खरी समीक्षा.

उल्लेख हाच त्यांचा आहेत खूप दानी;
त्यांना शिव्या घरातून जे मागतात भिक्षा.

आला नवीन कैदी करते तुरंग चर्चा -
अपराध काय केला? झाली कितीक शिक्षा?

आभाळ फाटल्यावर धावून कोण येते;
तेव्हा भल्याबु-यांची होते खरी परीक्षा.

काही कठीण नाही आकांत मांडणे रे;
चुपचाप सोसण्याची आहे कठीण दीक्षा.


३.विदुषक

जे चुकीचे आत आहे;
ते मनाला खात आहे.

आंधळयाचा ठोस दावा-
सूर्य अंधारात आहे!

जीव घ्यावा विदुषकाने,
मग मजा मरण्यात आहे.

देव माना भाकरीला;
मोक्ष हा पोटात आहे.

दूत आम्ही शांततेचे,
शस्त्र अन्‌ हातात आहे.

पिंज-याला हा दिलासा
पाखरू गावात आहे.


४. प्रशंसा

हात मी हृदयात जेव्हा घातला;
भाग सारा वाळवंटी वाटला.

ठेवती पर्याय ते हातामध्ये,
छान आहे काम करण्याची कला.

ऐकली माझी प्रशंसा काल मी-
टाळणारेही म्हणाले आपला.

जीवघेणा रोग आहे ‘मी’पणा
एकही माणूस नाही वाचला.

कामधंदयाने कसाई तो जरी
आतला माणूस आहे चांगला.

सोडले जर मी मला तर एकही
भेटला नाही कुणी येथे भला.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: