१३ मार्च, २०१०

दोन गझला : वीरेंद्र बेडसे




वीरेंद्र बेडसे
९४२१८८६०९२

१.मोहरा

यार माझा खरा;
लोचनीचा झरा.

ही जगाची तर्‍हा-
हा नको, तो बरा.
जीव वेडा-खुळा,
हावरा...कावरा.

घात करतो सदा;
देखणा चेहरा.

काय आयुष्य हे;
मखमली पिंजरा.

खेळ त्यांचा जुना;
मी नवा मोहरा.


२.वादळ

ब्रह्मांडाला वळसा घालत दिशात घुमते वादळ;
रोज मुखवटे,काया बदलत युगात असते वादळ.

या एकाकी जगण्याला हा जीव असला विटला;
नातलगांना अता पुकारत जगात फिरते वादळ.

निर्मळ,हसमुख माझी सजणी तशीच अवघड,कणखर;
नयनावरती नाजुक हरकत;उरात जपते वादळ.

मजबूत हव्या आपसातल्या विश्वासाच्या भिंती;
‘संशय’ असतो सदैव भटकत...घरात शिरते वादळ.

नकोस सखये रोज रोज तू चेह‍र्‍यास या सजवू;
नंदनवन हे जिथे, पानिपत क्षणात करते वादळ.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: