१७ ऑक्टोबर, २०१०

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांमधील स्त्रीजाणीव : श्रद्धा पाटील


श्रीकृष्ण राऊत हे गझलसम्राट सुरेश भट यांच्या नंतर त्यांच्या तख्तावर हक्क सांगू शकेल असे नाव़ त्यांचा गुलाल आणि इतर गझला' हा संग्रह लोकप्रिय झाला आहे़ त्यातील काही गझला संगीतबद्धही झालेल्या आहेत़ प्रस्तुत संग्रहात व कवीच्या इतर असंग्रहित गझलांमध्ये प्रकटलेली स्त्रीजाणीव हा या लेखाचा विषय आणि मर्यादा़
श्रीकृष्ण राऊतांच्या गुलाल आणि इतर गझला' या संग्रहातील ६९ गझला आणि असंग्रहित १६ गझला मिळून एकूण ८५ गझला प्रकाशित झालेल्या आहेत़ त्यातील बहूतांश गझलांमध्ये स्त्रीजाणीव व्यक्त झालेली आहे़ प्रीतीच्या विभिन्न छटा आणि स्त्री जीवनातील व्यथा असा दुपदरी स्त्रीजाणीवेचा गोफ प्रस्तुत गझलांमध्ये गुंफलेला आहे़

स्त्री-पुरूषांमध्ये एक आदिम नातं आहे़ निसर्गतःच असलेल्या परस्पर आकर्षणातून ते निर्माण झालय़ समाज' म्हणून काही आस्तत्वात येण्यापूर्वी पासून ते येथे फूललय, बहरलय, त्याचे नाव प्रीत़ प्रेमात पडल्यावर माणसाला काव्य स्फुरते की काव्यच त्याला प्रीती शिकविते कोण जाणे परंतु प्रेमकविता लिहिली नाही असा कवी दुर्मिऴ श्रीकृष्ण राऊतांच्या अनेक गझलांमधून प्रीतीभावनेचा आविष्कार झालेला आहे़ नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रेमवीरापासून तर प्रगल्भ प्रियकरापर्यंत व प्रेमातील बेहोशी पासून तर प्रेमभंगातील उदासी पर्यंत विविध भावभावनांचे तरंग प्रस्तुत गझलांमधून उमटले आहेत़ यात प्रीतीच्या चढत्या प्रवासा सोबतच कवीच्या वाढत्या विकासाच्या पाऊलखुणाही स्पष्टपणे चिन्हांकित झालेल्या आहेत़

प्रेमात पडलेल्या माणसाला आपल्या प्रेयसी एवढे सुंदर काहीच वाटत नाही़ तिची तुलना तो चंद्र तार्‍यांशीच करणाऱ त्याची दृष्टी जमिनीवर असतेच कुठे ? आणि येते तेव्हा गुलाबांच्या ताटव्यावर विसावते़ चंद्र-चांदणे, चांदण्या यांचा मराठी काव्यातील वापर मराठी काव्याच्या जन्माइतका प्राचीन आहे़ त्याहीपूर्वीच्या संस्कृत काव्याशी नाते सांगतील अशा या प्रतिमा आहेत़
लाजली पोर्णिमा, लोपला चंद्रमा;
चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला़'
गर्व त्या हारल्या, सर्व त्या भाळल्या;
अप्सरांनी तुझा चेहरा पाहिला !'
अगदी देवही फसतो आणि देवता मत्सराने पेटतात असे वर्णन कवीने केलेले आहे़ प्रेयसीच्या रूपवर्णनात आतशयोक्ती अलंकाराचा वापर ही प्रेमाची प्राथमिक अवस्था आहे की कवीची ?

गौरवर्ण, गुलाबी गाल, मधाळ ओठ, चेहर्‍यावर रुळणार्‍या केसांच्या बटा, गालावरची खळी, काळा तीळ, चंद्र फिका पडेल असे सौंदर्य, ही सौंदर्याची एक पारंपरिक चौकटच साहित्यात निर्माण झालेली आहे़ मराठी साहित्यातील कथा, कादंबर्‍या, कविता पैकी कोणताही वाङ्मय प्रकार उघडावा ही सौंदर्यस्थळे जागोजागी दृष्टीस पडतील़ पूर्वसुरींचा प्रभाव म्हणा किंवा प्रेमाचा स्वभाव पण प्रस्तुत गझलांमध्ये ही सौंदर्यस्थळे आढळतात़




गालावरी कळ्यांना उमलून रूप आले;
हा ताटवा गुलाबी वाटे तयार झाला़'


माझिया ऐवजी ओठ ज्या चुंबिती;
त्या बटांना गडे दूर सारू नको़

गोर्‍या तुक्या रूपाने भलती कमाल केली;
बघण्यास आरशाला दृष्टी बहाल केली़'

परंतु कवी लवकरच या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडतो़ इतकेच नव्हे तर या चौकटीला आपल्या कल्पकतेचे रंग चढवून नाविन्य बहाल करतो़ परंपरा आणि नवता यांचा सुरेख समन्वय काही गझलांमध्ये साधलेला आहे़ गावरान गुलाबावर केलेले बडिंग जोमाने बहरावे तशा या गझला बहरल्या आहेत़

तुझ्या गुलाबी ओठांवरती गीत लिहावे ओठांनी;
चंद्र असावा मिठीत अन्‌ धुंदीत रहावे ओठांनी़'
हळूच हसता लख्ख चांदणे अंगावरती बरसावे़
गालावरच्या खळीत तेव्हा सहद टिपावे ओठांनी़'

कोणत्याही काळात कोणत्याही स्थळावरून आणि कितीही वेळा चंद्र-चांदणे पाहिले तरी ते मोहकच वाटणार तशा ह्या गझला मोहकच वाटतात़

पारंपरिक प्रतिमांना नवीन आशय वलय प्रदान करण्यात कवी यशस्वी झालेला आहे़ तशाच अनेक नाविन्यपूर्ण प्रतिमा ही त्यांनी समर्थपणे साकारल्यात़ काही ठिकाणी सूचकतेने सौंदर्य आधक खुलले आहे़

टंच ओठी तुक्या हे मधाचे झरे;
श्वास होण्या तुझा रोज वारा झुरे़'

सांगू कशी फुलाचा देठास भार झाला;
हा बहर यौवनाचा देहास फार झाला़'
प्रस्तुत गझलांमध्ये प्रेमभावनेचा वसंत पानोपानी बहरलाय तशीच प्रेमभंगातील शिशिराची पानगळ ही दृष्टीस पडते़ प्रेमसाफल्यामुळे उचंबळून जाणारी भाववृत्ती व प्रेमभंगाच्या नैराश्याने उन्मळून पडलेली मनोवृत्ती कवीने सारख्याच उत्कटतेने चितारलेली आहे़ सर्व गझला पाहता जाणवते की या गझलांमधील प्रीतीभावना ही प्रेयसीविषयीची आहे़ पत्नीविषयक प्रेमभावना यात नाही़ प्रेमाची नव्हाळी, आर्तता, मीलन, प्रेमभंग, सावरणे अशी चढती, उतरती भावनिक आंदोलने यात चित्रित झालेली आहेत़
ना झोपतो, ना जागतो, मी वागतो वेड्यापरी;
तंद्रीत एका वेगळ्या मी राहतो वेड्यापरी़'

तुह्या मुचूक जगणं वाटे जह्यराची पुडी;
तुह्या संगच मरावं माह्या जिवाले वाटते़'

जे काय पाहिले ते ठाऊक फक्त त्याला;
शेजेसमोर होता जो आरसा बिलोरी़'
अशी प्रीत दिवसागणिक भराला येते़
फूल ज्वालांवरी झोपले जे
नाव त्याचेच का प्रीत आहे ?'

सुकुमार काळजाचा पेटेल रोज वणवा;
होईल राख तेव्हा माझी तुझी कहाणी़'
यासारख्या काही गझलांमधून भग्नहृदयाचा टाहो ऐकावयास येतो़
कवीने काही ठिकाणी शारीर पातळीवरील प्रेमभाव चितारलेला आहे़ परंतु तो अशा कौशल्याने चित्रित केलेला आहे की कुठेही अश्र्लीलता जाणवणार नाही़

स्पर्श सांगती स्पर्शांना अन्‌ डोळे वदती डोळ्यांना;
अशा घडीला मूक राहुनी फक्त पहावे ओठांनी़'
प्रस्तुत गझलांमध्ये कवीची पत्नीविषयक प्रेमभावना कुठे आभव्यक्त झाली नसली तरी़ डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील वंदना' या गझलेमध्ये बाबासाहेबांचे त्यांच्या पत्नीवरील प्रेम कवीने समर्थपणे आभव्यक्त केले आहे़

इथे दूर देशी मला आच लागे;
उभे दुःख तेथे तिला जाळण्याला़'

तिच्या काळजीने कधी खिन्न होतो;
परी वेळ नाही मला थांबण्याला़'

कविवर्य कुसुमाग्रजांच्या काव्यातील देशभक्ती पोटी आपल्या प्रीतीभावनेला दूर सारणार्‍या प्रेमिकाची(पतीची) आठवण देईल अशी ही गझल आहे़

पारंपरिक सौंदर्याच्या कवीकल्पनांहून सर्वस्वी वेगळे असे प्रेयसीचे वर्णन काही गझलांमध्ये आहे़ कवीची प्रेयसी रूपवती नाही तर गुणवती आहे़ रूपापेक्षाही गुणांचे मोल जाणणारी प्रीतीभावना ही आधक परिपक्वता दर्शविणारी आहे़ प्रीती सोबतच कवीच्या स्त्रीजाणीवेतील परिपक्वताही यात प्रतिबिंबित झाली आहे़

एक पोटामधे एक ओठावरी;
चांगली यापरी सावळी सावळी़'
मोकळे बोलणे, हासणे मोकळे;
पारदर्शी प्रिये तू जळासारखी़'

अनुभवातून आलेल्या प्रगल्भतेने प्रीतीविषयक तत्त्वज्ञान कवी मांडतो़

समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते;
मीपण अवघे किंमत भारी प्रेम मागते़'

रांगोळी जर नकार दे;
रंग गुलाबी भरू नको़'

शाहीर अनंतफंदी' च्या फटक्यात शोभेल असा हा शेर आहे़

कवीची ‘मी गेल्यावर' ही गझल नारायण सुर्वेंच्या तेव्हा एक कर' कवितेची आठवण देणारी आहे़ उदात्त प्रीतीभावना त्यात साकारलेली आहे़
जाळ आपल्या पत्रांना त्या जुन्यापुराण्या;
लिहू लाग तू मजकूर नवे मी गेल्यावऱ'


प्रतिमा, प्रतिके यासारखाच काव्यातील एक महत्त्वपूर्ण गुण म्हणजे प्राक्कथा़ एखाद्या कथेएवढा आशय एका ओळीत सांगण्याचे सामर्थ्य एका प्राक्कथेत असते़ परंतु त्याचा ताकदीने वापर करण्यासाठी कवीकडे तेवढे प्रतिभा सामर्थ्य असावे लागते़ मर्ढेकर व सुरेश भट यांच्या एवढ्या ताकदीने प्राक्कथांचा वापर करण्याची हातोटी श्रीकृष्ण राऊतांना साधलेली आहे़
परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;
मला सांगू नको रामा, तुझा वनवास थोडासा़'

शेजेवरती सांगे ताबा घरी रूक्मिणी;
कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते़'

राज्यात कोतवाली त्यालाच लाभते;
लाचेत देत आहे जो लेक भामटा़'
प्रस्तुत गझलांमध्ये शब्दाच्या वार्‍यानेही आशयाचा सुगंध उडून जाईल इतका तरल भाव काही ठिकाणी विसावलेला आहे़

शृंगारल्या उन्हाने मजला विकार झाला़

झंकार स्पंदनांचा तर बेसुमार झाला़
आषाढ यौवनाचा जर जाणकार झाला़
पापण्यापल्याडची झेलता व्यथाफुले़
शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे़
चंद्राविणा नभाच्या रूसतील हाय रात्री़
वाटली तू सूगंधी फुलांची कधी;
अन्‌ कधी तू उन्हाच्या झळासारखी़
तू मौन घेतले पण, हे बोलती शहारे़

प्राजक्ताचा सडा डोळे भरून न्याहाळावा आणि त्याचा हळुवार सुगंध तनामनात साठवावा़ पण त्या नाजूक कोमल फुलाला आपल्या राकट हाताने स्पर्श करू नये; तशा या प्रतिमा़ त्यातील प्रसन्नतेची छाया आपल्या मनाच्या कुपीत जपून ठेवावी़

कवीला स्त्री व्यथेची जाण आणि सामाजिक जाणीवेचे भान आहे़ कवीची स्त्रीजाणीव केवळ प्रीतीभावनेत बेधुंद होणारी नाही़ तर तिचे नाते मानवतेशी, समतेशी आहे़ म्हणूनच पुरुषप्रधान संस्कृतीतील विषमतेने कवी विषण्ण होतो़ मुलीचा गर्भ पाडणे, दुय्यम दर्जा, बलात्कार, विक्री, सासुरवास, हुंडाबळी अशा स्त्रियांच्या व्यथा औपरोधिक आवेशाने कवीने मांडल्या आहेत़ स्वातंत्र्य, समता आणि न्याय यापासून स्त्री आजही वंचित आहे़ हे सामाजवास्तव अधोरेखित करताना कवीची केवळ सहृदयताच नाही तर उद्विग्नतेतून प्रकटलेली चीड ही दिसते़
नव्या या उंबर्‍यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे;
कुणी हे लावले आहे इथे रॉकेल मापाला ?'
देतोस थोरली तू की धाकटीस नेऊ;
हा कर्ज फेडण्याचा साधा उपाव आहे़'
यांच्या करामतींना नाही अशक्य काही;
पोरीस अर्धकच्च्या आणेल न्हाण वस्ती़'
वाचणार्‍याच्या काळजात चर्र होईल इतक्या प्रभावीपणे येथील भीषण सामाजिक वास्तव कवीने शब्दबद्ध केले आहे़ एक अंतर्मुख करणारा प्रश्न कवी विचारतो-
कशी कळेना अजून आहे इथे वडांची सुरूच पुजा;
जिथे कधीही नवीनवेली उभ्याउभ्याने जळून जाते़'

मऊ मेणाहून आम्ही विष्णूदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥ तुकोबांच्या या उक्तीमध्ये आलेले मेणाहून मऊपण व वज्राहूनही काठिन्य असे परस्पर विरोधी भाव राऊतांच्या गझलांमध्ये समर्थपणे प्रकटलेले आहे़ प्रीतीभावनेतील कोमल भाव ज्या तरलतेने कवी मांडतो तितक्याच उपरोधपूर्ण आवेशाने अन्यायावर तुटून पडतो़

स्पर्शात मोर आले, अंगांग फूल झाले;
नाजूक पाकळ्यांचा फुलतो हळू पिसारा़'

टिळे लावून रक्ताचे, भरा ओट्या निखार्‍यांनी;
कुणी घासात निर्दोषी जरा पोटॅश' ही घाला़'

प्रस्तुत गझलांमध्ये स्त्री जाणीवेच्या अनुशंगाने आलेल्या एकूण १७ गझला या मुसल्सल गझल' प्रकारात मोडणार्‍या आहेत़(एकच विषय उलगडत नेणार्‍या गझलेल्या उर्दूत मुसल्सल गझल' म्हणतात़) त्यापैकी कोळसा' ही एकमेव मुसल्सल गझल' स्त्रियांवरील अन्यायाचा परखड शब्दात निषेध करणारी आहे़ उर्वरित १६ ग्ाझलांमध्ये प्रीतीभावना व्यक्त झाली आहे़ इतर गझलांमध्येही स्त्रीव्यथेचा उद्गार उमटलेले शेर' अल्प प्रमाणात आहेत़ स्त्री समस्येची जाण, चिंतनशीलता, संवेदनशीलता, धारदार उपरोध प्रकट करण्याचे सामर्थ्य, अन्यायाची चीड हे सर्व आभव्यक्त करण्यासाठी नवीन प्रतिमा निर्माण करणारी प्रतिभा (उदा़ उंबर्‍यावर रॉकेल मापाला लावणे, कुंकातील लाली कपाळाला डसणे) राऊतांकडे असूनही त्यांची लेखनी प्रीती भावनेभोवतीच रुंजी घालताना दिसते़ भ्रमर जसा कमलपुष्पात अडकून पडतो तसा कवी प्रेमपुष्पात गुंतून पडलेला आहे़
उपरोक्त निष्कर्ष हा श्रीकृष्ण राऊतांची स्त्रीजाणीव ह्या विषय मर्यादेच्या अनुशंगाने काढलेला आहे़ अन्यथा प्रस्तुत संग्रहात सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या विषयावर भाष्य करणार्‍या गझलांची संख्याही लक्षणीय आहे़ एकंदरीत श्रीकृष्ण राऊतांच्या गझला आतशय दर्जेदार आहेत़ अनेक मान्यवर साहित्यिकांनी गुलाल आणि इतर गझला' या संग्रहास वाखाणलेले आहे़ कवीचा गझलांचा व्यासंग, विभिन्न गझलवृत्तांचा समर्थ वापर, छंदावरील प्रभृत्व, आशयसंपन्नता इ़अनेक गुणांनी हा संग्रह परिपूर्ण असून मराठी गझलेच्या प्रांतात कवीला अढळ स्थानावर विराजमान करण्याएवढ्या ताकदीचा आहे़

________________________________________
प्रा़श्रद्धा पाटील
श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला
मो. ९८२२८५६१४५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: