१७ ऑक्टोबर, २०१०

उर्दू गजल गायनातील एक मराठी माणूस : मदन काजळे



मदनजी आपण मराठी भाषिक असूनही उत्कृष्ट उर्दू गजल गाता व त्यात आपण आपला ठसा उमटविला आहे, तर आपले पूर्ण नाव काय ?

माझे नाव मदन नागोराव काजळे.

आपली जन्म तारीख आणि जन्म ठिकाण कुठले ?

आपल्या घरी गाण्याचा वारसा आहे का ?

तसे म्हणाल तर असा वारसा नव्हताच पण माझ्या आईचा आवाज गोड होता. ती येता-जाता, शेतात काम करता गाणे गुणगुणायची. तिला हा वारसा तिच्या वडलांकडून मिळालेला होता.

आपला पूर्वापार व्यवसाय ?

आम्ही शेतकरी. माझे आई - वडिल शेतकरी. मी त्यांचे एकुलते एक अपत्य. अ सणाज्या शेतीत शेतीत आम्ही काम करीत असू पण त्यातून संसार चालविणे कठीण होते. त्यामुळे 12 पर्यंत पुसद येथे शिक्षण घेतल्यावर आम्ही गावची शेती विकून अकोल्याला स्थायिक झालो.

आपले शिक्षण कुठपर्यंत झाले ?

मी अकोल्यात राहून माझे पुढील कला शाखेतील पदवीपर्यतचे शिक्षण घेतले.

गायनाची आवड केव्हापासून व त्याचे रीतसर शिक्षण कधी घेतले ?

माझ्या आईचा आवाज गोड होता व तिला गाणे गुणगुणण्याची हौस होती ते मघाशी मी म्हणालो आहे. त्याचा परिणाम बालपणापासून माझ्यावर पडला. पण गाणे मात्र कधी गायलो नाही. गावातील भजन मंडळात मात्र जाणे असायचे.
गायनाच्या शिक्षणाबाबत सांगायचे झाले तर माझे रीतसर असे शिक्षण खूपच उशिरा म्हणजे कला शाखेच्या पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना झाले. नामवंत शास्त्रीय संगीत - गायक श्री. अनिरूध्द खरे यांच्याकडे सुरू झाले. त्यांनी माझी परीक्षा घेतली आणि त्यांची खात्री पटली की एवढ्या उशिरा सुरवात केल्यावरही हा तरूण काहीतरी चांगले करून दाखवील. त्यानुसार त्यांनी माझ्यावर मेहनत घ्यायला सुरवात केली.
एकीकडे माझे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते व दुसरीकडे शास्त्रीय संगीताचे धडे. माझ्या या तरूण वयात मी यावर खूप मेहनत घेतली. त्या काळी अप्रूप असणाज्या सिनेमालाही मी जायचो नाही. कारण तिथे जाऊन घालविल्या जाणाज्या तीन तासांऐवजी मी रियाज करीन. मी या कलेला संपूर्णतया वाहून घेतले होते.

शास्त्रीय गायन शिकत असतांना गझल गायनाकडे कसे वळलात ?

गुरूजींकडे गाण्याचे शिक्षण सुरू होते. पण त्याच वेळी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द हार्मोनियमवादक, संगीत तज्ज्ञ श्री. सुधाकर आंबुसकर यांच्या संपर्कात मी आलो. त्यांनी मला याबाबत खुपच महत्वाचे आणि उपयुक्त असे मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून सुगम संगीत - भावगीत, भक्तीगीत, गजल गायन याबाबत अनेक प्रेरक गोष्टी ऐकल्या. त्यातूनच मला गजल गायनाची ऊर्मी झाली.

आपण मिरज-सांगली येथील अखिल भारतीय गांधर्व महामंडळाची गायन विशारद ही परीक्षा उत्तम रीत्या उतीर्ण झाला आहे . ते शिक्षण कोणाकडून घेतलेत ?

आदरणीय श्री. बाबासाहेब देशपांडे हे नागपुर येथील मॉरीस महाविद्यालयातुन संगीत विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे मुळचे गाव दिग्रस. माझे मामा तेथे असत. मामांकडे गेल्यावर त्यांच्याकडे जाणे येणे सुरू झाले त्यांनी माझी तयारी पाहून विशारदसाठी शिक्षण देण्याची संमती दर्शविली.
हे गायन शिक्षण घेत असतांना मी त्यांच्या घरी 12-12 किलोमीटर पायी चालत जायचो - यायचो. कारण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्या आडगावातून एस. टी. नव्हती.
वर्षभर माझी पायपीट पाहून एक सद्गृहस्थ माझ्या मदतीला धावून आले. त्यांचे नाव शंकरराव सोनटक्के. ते पाटबंधारे खात्यात वरिष्ठ लिपिक म्हणून दिग्रसला कार्यरत होते. गाणे शिकण्याची माझी जिद्द व त्यासाठी मी घेत असलेले कष्ट हे पाहून त्यांनी जुजबी ओळखीवर मला त्यांच्याकडे ठेवून घेतले. त्यांच्याकडे राहून मी गुरूजींकडे गाणे शिकू लागलो.

_________________________________________________________

मदनजींच्या स्वरात ऐका : डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची गझल :


तुझ्या हासण्याचे दिवाणे किती

____________________________________________________


हा नित्यक्रम पुढे तसाच चालू राहिला का ?

वर्षभर श्री. सोनटक्केच्या घरी मी राहिलो. पण नंतर त्यांची बदली पुसद येथे झाली. आता माझ्यापुढे मोठे संकट उभे राहिले. गावाकडून यायचे तर खुप त्रास व शिक्षण अर्धवट सोडावे तर आतापर्यंत उपसलेल्या कष्टावर पाणी फेरण्यासारखे होते. पण म्हणतात ना प्रबळ इच्छा असणाज्याला मदत मिळतच असते. यावेळी पुन्हा श्री. सोनटक्केच माझ्या मदतीला धावून आले व त्यांनी मला पुसदला एक खोली बघून दिली व तिथे राहून मी गुरू जीकडे शिक्षण घेऊ शकलो.त्यांनी नुसती खोली दिली नसून भोजनाची इतकेच नव्हे तर पुसदपासून दिग्रसपर्यंत जाण्या-येण्याचा खर्च ते करायचे.तेथेच मी त्यांच्या दुसज्या इयत्तेत असणाज्या मुलीला सारिकाला गायन शिकवू लागलो जी आज परतवाडा येथे संगीत प्राध्यापीका म्हणून काम करीत आहे.
बाबासाहेब देशपांडे यांच्याकडे शिक्षण घेत असतांना गजल, भजन, गीत अशा प्रकारचे काही जाहीर कार्यक्रम केले.

या उर्दू गजल होत्या का ?

होय, विदर्भात यासाठी चांगला माहौल आहे आणि मी देखील फक्त उर्दूचाच विचार केला होता.

मग शायरांशी तुमचा परिचय कसा झाला ?

एकदा पुसद येथे उर्दूतील दिग्गज शायर कैसर-उल-जाफरी हे मुशायज्यासाठी आले होते. मी त्यांची भेट घेतली. त्यांनी मला व्हिजींटिंग कार्ड दिले व मुंबईस आल्यावर भेटण्यास सांगितले.
पुढे मी पुसदहून अकोल्याला आलो. माझे लग्न झाले माझी पत्नी वनिता हिला गाण्याची आवड आहे. अकोल्यात असतांना नम्रता व निलांबरी या दोन मुलांचा जन्म झाला. त्यानंतर मी सन 1998 च्या सुमारास मुंबईस आलो.

मुंबईत आपला जीवन प्रवास कसा सुरू झाला ?

मी कला पदवी व गायनातील विशारद पदवी व पदरचे गाणे शिकून मुंबईस स्थायिक होण्यासाठी आलो होतो. शास्त्रीय गायन शिकलो होतो पण ओढ मात्र उर्दू गजल गायनाकडे होती. यासाठी प्रथम मी उर्दूतील शायरांची गाठीभेटी घेऊ लागलो. मुशायज्यांना, गजल गायन कार्यक्रमांना हजेरी लावू लागलो. आता पध्दतशीरपणे उर्दू गजल, त्यातील शब्दांचे उच्चार, भावर्थातील नाजूक- तरलपणा, लक्षात येऊ लागला होता. आणि आपण ज्या कामासाठी मुंबईला आलो आहोत - त्या उर्दू गजल गायनाचे आपले उद्दिष्ट पुर्ण करू असा मनोमन विश्वास बाणवला.

आपली याबाबत धडपड कशी सुरू झाली ?

पहिल्यांदा मी कैसर-उल-जाफरी साहेबांना भेटलो. त्यासाठी ते व्हिजिटिंग कार्ड कामी आले. त्यांनी माझे आनंदाने स्वागत केले. त्यांनी माझी कलाकारी जाणून घेतली. माझा आवाज आणि सादरीकरण करण्याची शैली पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी याबाबत काही मौलीक सूचना केल्या व उर्दू शब्दांच्या उच्चाराबाबत आणखी तयारी करण्याचे जाणून घेण्याचे फर्मावले.
त्यानुसार मी वेगवेगळ्या शायरांना भेटण्याचा, त्यांच्या गजला ऐकून घेण्याचा, उच्चारातील दोष कसा घालवावा व अचुक शब्दफेक कशी करावी याचे मार्गदर्शन घेऊ लागलो व त्यासाठी मी उर्दू मुळापासून शिकायला सुरवात केली.
कैसर-उल-जाफर साहेबांनीच मला बज्याच शायरांची ओळख करून दिली. मग मी शकील आजमी, अबू-हमीर आजमी, एच.के.राजदान, इब्राहिम अश्क, मुमताज राशीद आदी शायरांच्या सहवासात राहून उर्दू गजल लेखन-गायनाचा अभ्यास करू लागलो व आजही करत आहे. त्याचा फायदा मला माझ्या कलेत होत आहे.

आपण उर्दू गजलगायनातील एक सुप्रसिध्द गायक आहात. आपल्या सगळ्या मैफिली उर्दू संस्था-कॉलेज यांमध्ये झाल्यात. तिथे कधी तुम्हाला उणेपणा जाणवला का ?

सर्वसामान्यपणे कला पेश करतांना येणारे दडपण सुरवातीस माझ्यावरही होते. पण हळूहळू स्थिरावल्यावर मात्र मी मागे वळून पाहिले नाही. अर्थात हे दडपण कलेतील उणिवांबद्दल नव्हते जर केवळ नवखेपणाबद्दलचे होतेध्.

आपल्या मैफिली कुठे कुठे झाल्यात ?

सुरवातीस विदर्भात - त्यानंतर मुंबई व आजूबाजूचा परिसर तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व दिल्ली आदी राज्यांमधुन माझ्या गायनाचे कार्यक्रम झाले. यात कधी संस्था, कधी महाविद्यालये तर कधी क्लब्जमधूलही माझ्या मैफिली होत असतात.

आपणास लाभलेल्या श्रोतृवर्गाबद्दल काय सांगता येईल ?

मला नेहमीच चांगला श्रोतृवर्ग लाभला. इतकचं काय बज्याच वेळा त्यांना नंतर नावावरून कळले की हा बिगर उर्दू भाषिक आहे. ते मनापासून माझ्या गायनात समरस होतात. त्यातील कित्येक दर्दी मला मैफिलीनंतर भेटत असतात. नुकत्याच पोलीस जिमखान्यात झालेल्या मैफिलीत - तेथील पोलीस अधिकारी व त्यांचे सहायक खूपच खुश झाले. पण गजलच्या बाबतीत मात्र मला विदर्भातील श्रोतृवर्ग अधिक परिपक्व वाटला.

आपला पुर्ण वेळ व्यवसाय गजल गायन आहे ?

होय, मी सुरवातीस मुंबईस आल्यावर चरितार्थासाठी नोकरी करणे भाग होते म्हणून मी कांदिवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे तीन वर्ष संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली. पण केवळ नोकरी करण्यासाठी मी मुंबईस आलो नाही, याची जाण ठेवून मी आता गायनाचे जाहीर कार्यक्रम व गायनाचे शास्त्रीय तसेच सुगम संगीताचे शिक्षण देत आहे.

आपले आवडते गायक कोणते ?

उस्ताद गुलाम अली, मेहंदी हसन साहेब, हरिहरन, चंदनदास,रूपकुमार राठौड, जगजित सिंग आदी.
मराठीतील भीमराव पांचाळे, सुरेश वाडकर हे गायक आवडतात.

आपण मराठी भाषिक आहात आणि उर्दू गजला तितक्याच ताकदीने पेश करता, पण आपण मराठी गजल गायल्या का ?

होय तसा योग उशिराच आला.माझे स्नेही सुधाकर आंबुसकर यांनी अमरावतीचे गजल जाणकार नानाभाऊ लोडम यांच्याशी माझी ओळख करून दिली. अमरावती येथे त्यांनी सुरेश भटांच्या जयंती उत्सवात कार्यक्रम करण्याची संधी दिली व तिथे मी प्रथमत: इलाही जमादार यांची मराठी गजल गायलो.
त्यानंतर सांगली, वाई आदी ठिकाणी झालेल्या मैफिलीत मी दिलीप पांढरपट्टे, आप्पा ठाकूर, संदिप माळवी आदी गजलकारांच्या गजला गायल्या आहेत व यापुढे मराठी गजल गायन कार्यक्रम करण्याचा माझा मनोदय आहे.

आपला पहिला सीडी अल्बम उर्दू गझलांचा येतो आहे ना ?

हो, मुख्यत: आपल्या सहकार्याने व परिश्रमाने मी संगीत दिलेल्या व गायलेलया उर्दू गजलांचा एक अल्बम लवकरच येत आहे. त्यात राजेश रेड्डी, मुमताज राशीद, अबु हमीर आजमी, एच के राजदान आदी शायरांच्या गजला आहेत.
तसेच युनिव्हर्सल कंपनीकडून मी संगीत दिलेल्या गीत व गजलांचा दुसरा अल्बमही येत आहे. त्यात देवकी पंडित आणि सुरेश वाडकर यांचा आवाज आहे.

गायन अंगभुत असावे असे तुमचे मत आहे का ?

होय, गायन नुसते अंगात नव्हे तर रक्तात असावे असे मला वाटते. एखादा जोरजुलमाने गायन शिकू शकतो - त्यातील परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकतो पण तो गाण्याला न्याय देऊ शकत नाही. म्हणून गायण शिकणाज्याने आपल्यातील गुण ओळखून अपार मेहनत करायला हवी कारण गायन जसे वरदान असावे लागते तसे क्षणाक्षणाला शिकणे असते. परिश्रम घेण्याची वृत्ती असेल तरच तो गायक - कलाकार आयुष्यभरासाठी टिकून राहू शकतो. अन्यथा लवकरच यातून गाशा गुंडाळावा लागतो. त्यामुळे शेवटी कलेचीच हानी होत असतेध्.

आपण उशिरा गाणे शिकलात, त्यातही दुसज्या भाषेतील कार्यक्रम सादर करू लागतात आणि त्यात यशस्वीही झालात - या संपुर्ण वाटचालीत आलेल्या प्रसंगाबद्दल काही सांगायचे आहे का ?

माझा जन्म शेतकरी कुटुंबातील. माझी परीस्थिती गरिबीची होती. त्यात मी ना गाणं शिकू शकत होतो ना नीटसं जगु शकत होतो. या संपुर्ण प्रवासात अनेक वाईट-कटु प्रसंग आले - त्यातुन स्वत:च मार्ग काढीत मी त्यावर मात केली पण गाण्याची जिद्द काही सोडली नाही. अर्थात वेगवेगळ्या वेळी काही जणांची साथ मला मिळाली, हे ऋण मला मानलेच पाहिजे.
सगळेच प्रसंग हतबल करणारे नव्हते तर त्यातील काही जिद्द निर्माण करणारे होते. मी फक्त त्यातील विचारांना वेगळी दिशा दिली. म्हणजे खरं तर काही ठिकाणी अडचणी होत्या पण तिथे मी संधी शब्द टाकुन त्यातुन मार्ग काढला व गाणे आणि जीवण सुकर कसण्याचा प्रयत्न केला.
काही ठिकाणी मी अक्षरश: विहीर खोदून पाणी प्यायलो आहे. अर्थात परमेश्र्वर दयाघन माझ्या पाठीशी असल्यामुळे मला प्रकाशाचा मार्ग दिसत गेला.
परमेश्र्वराच्या कृपेने मी गात आहे याची जाणीव मला आहे. तोच माझ्याकडून कलेची साधना करवून घेतो ही माझी श्रध्दा आहे. आणि यातुनच रसिकांची उत्तोमोत्तम सेवा करता यावी हीच एक मनोकामना.
आपल्या सर्व शुभसंकल्पांना मनापासून शुभेच्छा !










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: