Related Posts Plugin for WordPress, Blogger...

१६ ऑक्टोबर, २०१०

पाच गझला : श्रीराम गिरी


श्रीराम गिरी
९७६३००४४९४

१. घाम थोडा

ऐक मित्रा बैस तू निष्काम थोडा;
तापलेला जीव घे आराम थोडा.

तोडला विश्वास तू माझा कितीदा ;
राह ना शब्दावरी तू ठाम थोडा.

मोल ना कष्टास येथे आज काही;
पाहिला मी गाळुनीही घाम थोडा.

समजुनी माझी जरा घेशील अडचण ;
हा मुळी बाकीच रे हंगाम थोडा.

माझिया छातीत गोळी झाडणार्‍या;
जाणतो मीही अरे इस्लाम थोडा.

सत्य केले सिद्ध माझ्या धोरणाने;
खंत नाही जाहलो बदनाम थोडा.

२.जाग

झाला पसार कोणी लावून आग येथे;
उपयोग काय त्याचा काढून माग येथे.

आम्हांस शौक भारी आहे कळ्या, फुलांचा ;
येणार फक्त सांगा कोठून बाग येथे.

होईल भस्म जेव्हा सृष्टीच तारकांची;
येईल माणसाला तेव्हाच जाग येथे.

जे पाहिजे तुम्हाला, द्यावे जगास आधी ;
जे वाटती फुलांना; त्यांचा पराग येथे.

ठेवा सुरूच चर्चा माझ्याच न्यूनतेची ;
ठेवा असाच तुमचा लपवून डाग येथे.


३.गुन्हा

हे दु:ख सांगणे रे मोठा गुन्हा जगाला ;
दावू नये कधीही जखमा अशा कुणाला.

ना भंगली कधीही माझी अभाळ स्वप्ने;
छाटून पाहिले तू माझ्या जरी पराला.

आमिष नवे गड्या तू शोधून काढ आता ;
ना लागणार त्याविन मासा तुझ्या गळाला.

ठाऊक रीत मजला चवचाल या जगाची;
नाठाळ माणसांचा देऊ नका हवाला.

पैशात तोलली तू नातीच काळजाची ;
देईल काय पैसा घरपण तुझ्या घराला.४.उपहास

माझा यशाचा जेव्हा ध्यास सुरू झाला ;
माझा खरा तेव्हा वनवास सुरू झाला.

नुकतेच स्वप्नांचे विणले घरटे होते;
तू टाळण्याचा अन्‌ आभास सुरू झाला.

तलवार रक्ताने भिजताच महात्म्यांच्या;
तेव्हा खरा येथे इतिहास सुरू झाला.

छळती मला ऋतु का ? ह्या सलती का वाटा ?
मी जाणतो का हा उपहास सुरू झाला.

घेऊन तो फिरतो डोळ्यात विजा कसल्या ?
कसला गडे त्याचा अभ्यास सुरू झाला?


५. आकस

प्रेमाने जग पालटण्याचा मानस आहे ;
येशू अन्‌ बुद्धाचा मीही वारस आहे.

पुरता झालो माणूस न मी अजुनी येथे ;
हृदयी माझ्या अजुनी थोडा आकस आहे.

आहे व्यर्थच हे घाबरणे एकामेका ;
दडुनी अपुल्या आतच मोठा राक्षस आहे.

जाळी जो प्रतिभेला अन्‌ कर्तृत्वालाही ;
शत्रुहुनी शत्रू मोठा तो आळस आहे.

अद्याप कुठे लढलो मी साक्षात लढाई;
अद्याप कुठे कळले माझे साहस आहे.

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP