१६ ऑक्टोबर, २०१०

पाच गझला : नितीन भट



नितीन भट
_________
९८५०९५१८१४


१. मी

जीवनाला शेवटी हारून मी;
टाकले आयुष्य झिडकारून मी!

एकही ना सोयरा आला पुढे..
हाक जेव्हा पाहिली मारून मी!

प्राणही त्यानेच माझा घेतला;
ठेवला जो घाव गोंजारून मी!

आतला आवाज माझा ऐकतो,
काळजाची तार झंकारून मी!

जे हवे ते घडत नाही ; या इथे,
घेतले हे सत्य स्वीकारून मी!

काय आशेच्या प्रकाशा तू दिले?
केवढा आलोय अंधारून मी!



२. रात्र अंधारी

रात्र अंधारी कशी ही सरत नाही?
किरण आशेचा कुठेही दिसत नाही!

पेटले आयुष्य वणव्यासारखे अन्‌
लागलेली आग काही विझत नाही.

तीहि असते झुरत माझ्यावाचुनी अन्‌
मी तिच्यावाचून राहू शकत नाही.

दु:ख तर प्रत्येकजण देतोच आहे ;
का कुणी अश्रू कुणाचे पुसत नाही?

मी कशी दु:खास माझ्या हूल देऊ ?
नजर माझ्यावरून त्याची हटत नाही.

खूप काही बोलण्याचे ठरवतो पण,
तू पुढे आलीस की मग सुचत नाही!


३. धोक्याचा मार्ग

मी धोक्याचा मार्ग निवडला आहे;
जो रस्ता आतून उसवला आहे.

श्रीमंतीचा अर्थ सांगतो तो जो,
गरिबीच्या जात्यात भरडला आहे.

आता नाही पराभवाची भीती?
मी पत्ता हुकुमीच उघडला आहे.

तुझी माणसा सुटका नाही ; तू तर...
नात्यांच्या पाशात अडकला आहे.

या देशाचा विकास होता होता...
सरकारी फायलीत अडला आहे !

असेल कुठले दु:ख एवढे त्याला?
तो फुटल्या बांधासम रडला आहे !



४. चुका

मी आयुष्याला पुन्हा उभारत आहे;
मी गतकाळाच्या चुका सुधारत आहे.

मी खूप जरी दाखवतो वरवर हिंमत;
मी तरी आतल्याआत थरारत आहे.

मज कायमचे बेघर केल्यावर पुन्हा;
वर माझा पत्ता कोण विचारत आहे?

ना दैन्य इथे, दारिद्र्य न भांडणतंटा...
हा माझ्या स्वप्नामधला भारत आहे.

मी वरचेवर शांतीची भाषा करतो;
तू का वरचेवर शस्त्र उगारत आहे?


५. उन्ह-सावली

उन्ह-सावलीच्या खेळाला जीवन म्हटले;
पांघरलेलया दुलईला तारांगण म्हटले.

चार पावलांचीही नव्हती सोबत अपुली,
विरहालाच पुढे मी माझा साजण म्हटले.

फुले वाटली, व्याजामध्ये काटे आले...
पायी रूतलेल्या काट्यांना पैंजण म्हटले.

जवळ कधी आलीस, कधी गेलीस दूर तू;
तुझ्या कृपेच्या वर्षेला मी श्रावण म्हटले

रागाने का होईना तू पाहिलेस तर...
तुझ्या विखारी कटाक्षास मी औक्षण म्हटले.

रोजरोजच्या मरणाला मी सरावल्यावर...
वठलेल्या आयुष्याला नंदनवन म्हटले.


1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

nitin bhat,s gazal is really appreciable. The hard truth of life through the words of this young gazalkar is really made us proud