मुलाखतकार : डॉ. राम पंडीत
राजेश तू संगीताकडे कसा वळलास ? तुझ्या घरात संगीताची परंपरा होती काय ?
माझ्या वडिलांना भजनाचा छंद असल्यामुळे तसेच सांगितीक वातावरण घरांमध्ये पूर्वीपासूनच होते. मी सात-आठ वर्षांचा असतांना वडिलांसोबत भजनांमध्ये सुध्दा जात होतो. संगीतांची आवड ही मला लहानपणापासूनच होती.
गजल गायनाकडे आकृष्ट होण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरली ?
पूर्वी रेडिओवरून 'आपली आवड' कार्यक्रमामधून पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांनी गायिलेल्या गजला खूप वेळा प्रसारित व्हायच्या. नंतर तर असे झाले की 'आपली आवड' या कार्यक्रमाची वाट फक्त सुरेश भटांच्या गझला ऐकण्यासाठी मी बघायचो. त्याही पुढे आंतरविद्यापीठ स्पर्धेत स्पर्धक म्हणून गेलो आणि त्या स्पर्धमध्ये जेष्ठ गयिका शोभा गुर्टू यांची 'उघड्या पुन्हा जाहल्या' ही गजल तर उर्दू गजल गायकीचे बादशहा मेहंदी हसन खाँ साहेब यांच्या गजलगायकीने मी प्रेरीत होऊन गजल गायन प्रकाराकडे आकृष्ट झालो.
बेगम अख्तर, मेहंदी हसन, गुलाम अली, मुन्नीबेगम, फरीदा खानम, आबिदा परविन अशी समृध्द व विविध रंगी परंपरा उर्दू गजल गायन क्षेत्राला आहे. या स्तराची कोणतीच परंपरा मराठीत नसतांना तुला मराठी गजल गायनाकडे का वळावसे वाटले ?
माझ्या मनात नवनिर्मितीची जिज्ञासा असल्यामुळे हिंदी उर्दुत गझलगायकी सारखे काम मराठी गजल मध्ये करता येईल का ? असा प्रश्न मनात भेडसावत असल्यामुळे मी मराठी गजलेला गजल गायकीचा रंग देण्याचा प्रयत्न केला व पुढे प्रत्यक्ष सादरीकरणातील दाद पाहून व मला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मी पुर्ण वेळ मरीठी गजलेचे काम करण्याचे ठरविले.
मराठी गजलेचे गायन हे दालन गजलसृजनाच्या तुलनेत अत्यंत दयनीय स्थितीत आहे तेव्हा पुढे मागे गजलगायक घडविण्याचा (गुरूकुल अथवा कार्यशाळा घडवून) निदान प्रयत्न तरी करावा, असे तुला वाटत नाही काय ?
काही प्रमाणात कार्यशाळेने गजलगायकीची ओळख परिचय हा आपण सृजन श्रोत्यांना देवू शकतो परंतु माझ्या मते कोणतीही गायकी ही शिकविण्यापेक्षा शिकणे ही जिज्ञासा मनात असणे अत्यंत आवश्यक आहे. कार्यशाळेच्या प्रचारासाठी थोडासाच उपयोग होत असल्याचे उदाहरणे आहेत. मात्र जोपर्यंत गझलगायकीचे रहस्य, जिज्ञासा कलावंताच्या मनात निर्माण होत नाही तो पर्यंत ही शैली कोणावरही लादणे योग्य होणार नाही.
गायनासाठी गजलकारांच्या गजला निवडतांना तुझे निकष काय असतात ? गजलेतील साहित्यीक मुल्य व गायलमुल्य (लय गेयता इत्यादी दृष्ट्या ) हे समान दर्जाचे नसतात. तु प्राधान्य कशाला देतोस ?
गजलगायकीचे यश त्यातील उत्कृष्ट काव्य यावर निर्भर असल्यामुळे उत्तम काव्य, विविध गजलांचे वृत्त व विविध गजलांचे वृत्त व विविध विषय अशा गजल रचनांचा मी नेहमीच शोध घेतो व अशा रचनांवर अधिक मेहनत घेतल्याने अशा रचनांना यशही प्राप्त होते. व या रचना पुढे रसिकाभिमुख होतात. याचे बहुवंशी कारण काव्यच असते.
गझलकारात गुरू-शिष्य परंपरा आढळते मात्र मराठी गजल गायन क्षेत्रात याचा मागमूसही नाही (ख्याल गायकीला ही परंपरा गौरवास्पद आहे) गजलगायक शिष्य निर्मितीला धास्तावतात का ?
मराठी गजल गायकीची परंपरा ही अत्यंत अल्पवयीन आहे. खरे तर पुरेसा मराठी गजल गायकीचा परिचय ही श्रोत्यांना झाल्याचे दिसत नाही. मात्र दिवसेंदिवस जिज्ञासा वाढत आहे व एक इतर शैलीप्रमाणे गझलगायन शैली बैठकीसाठी उपयुक्त ठरू शकते, मात्र अशा बैठकीसाठी गजलगायकीचे रहस्य आत्मसात क रण्याची आवश्यकता असते. अल्पकाळामध्ये मिळत असलेला प्रतिसाद हा आशादायी वाटतो. मात्र अनेक दिवस जाणकार प्रतिष्ठीत अशा लोकांना गजलगायकीवर स्थिर होवून काम करण्याची आवश्यकता आहे आणि मराठी गझल गायकीची प्रचाराला प्रादेशिकतेचे बंधनही अडसरच ठरल्यामुळे अमराठी कलावंत सहसा या प्रातांत येतांना दिसत नाहीत. गजल गायकीच्या मार्गदर्शनाचा अभाव असल्याकारणाने फारसे नवे कलाकार या क्षेत्राकडे येतांना दिसत नाही.
__________________________________________________
राजेशजींच्या स्वरात ऐका :सुरेश भटांची गझल :
हेही असेच होते :
__________________________________________________
उर्दू - मराठी गजला ऐकतांना मराठी गजला त्या प्रमाणात दाद घेऊ शकत नाहीत हे गजलकारचे अपयश की गायकीचे, की गजल निवडीचे ?
उर्दू गजलांचा माहोल अगदी तयार आहे. दाद कुठे द्यायची यांची रसिकांना जाणीव आहे. मराठी गजलेला अशी कोणतीही परंपरा नसल्यामुळे मराठी गझलेच्या वयाप्रमाणे जी रसिकांकडून दाद येते ती काही प्रमाणात ठीक आहे. माझ्या मते गझलेची भाषा कोणतीही असो रसिकांची दाद ही गजलगायकाने ती गजल स्वरबध्द कशी केली व त्यांच्या पेशकारीवर अवलंबून आहे आणि तेवढेच महत्व गझलगायकाने निवडलेल्या गजलेला सुध्दा जाते.
उर्दू गजला गाण्याचा मोह मराठी गायकांना का होतो ? त्यांचे शब्दोच्चार मूळ शब्दाचा अनर्थ करणारे असतात. उर्दू गायक न येणाज्या अन्य भाषेत गातच नाही ?
उर्दूचे गजल काव्य काव्यदृष्ट्या आणि लयदृष्ट्या मराठीपेक्षा सकसं आहे हे मान्य करणे भाग आहे त्याच्या एका शब्दातून बहू अर्थछटा मिळतात तशा मराठी शब्दांच्याबाबत मिळत नाहीत. बहुदा मराठी शब्दांचे विशिष्ट अर्थच असतात. त्यामुळे एका शेराचा स्केलीडोस्कोपी अर्थ ग्रहण करता येत नाही तसेच उर्दू ही मुळात काव्यभाषा असल्यामुळे तिच्या शब्दात लय व नजाकत आहे. मराठी त्या मानाने किंचीत रांगडी म्हणता येईल. (अपवाद, ज्ञानेश्वर ते बोरकर, महानोर असे काही सन्माननीय अपवाद तिला तुकोबा किंवा गाडगेबाबांसारखीच परखड विचारशैली जास्त भावते)
गजल व्यतिरिक्त अन्य काव्यप्रकार गातोस की नाही ? गायकाने एकाच काव्य प्रकारावर संतुष्ट असावे काय ?
इतरही काव्यप्रकार मी गातो. नुसते गातच नाही तर स्वरबध्द करून आजपर्यत माझ्या संगीत दिग्दर्शनात प्रसिध्द पाश्र्वगायक सुरेश वाडकर, साधना सरगम, उत्तरा केळकर, रविंद्र साठे, कविता कृष्णमूर्ती अनुप जलोटा इत्यादी मान्यवर गायकांनी माझ्या १५-२० कॅसेट सीडमध्ये गाणी गायली आहेत.या सगळ्या काव्यप्रकारांचे सुरवातीपासून ती माझी सर्वात आवडती रचना आहे. स्वत:ला अभिव्यक्त करण्यासाठी सगळ्या प्रकारांमध्ये गजलगायकीच मला जवळची वाटली. आणि गेल्या १२-१३ वर्षापासून मी मराठी गलनांचे कार्यक्रम महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये मराठी गजलच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्याने करत आहे.
गजल व इतर काव्यप्रकारात वेगळेपण कोणते आहे असं तुला वाटतं ?
गजल एकतर वृत्त बध्द काव्य व त्यातही गेयता असलेल्या वृत्तांचा वापर अधिक आहे. त्यातील काफीया व रदीफ हे रचनेचे काव्य व लयात्मक मूल्य वाढवतात. रदीफ व काफीयामुळे गजलच्या शेरामध्ये एक नैसर्गिक लालित्य साकारते. शिवाय विषय वैविध्य असलेले प्रत्येक शेर विविध अनुभूती देतात तरीही रदीफ व काफीयामुळे त्याच्यांत एक आंतरीक एकरूपता विद्यमान असते आणि त्यामुळे वाचक अथवा श्रोत्याला एक प्रकारचा लक्षणीय स्वरानंद उपभोगता येतो आणि याच गुणांमुळे गजल इतर काव्य प्रकाराहून आपले वेगळेपण स्थापित करते.
मराठीत मेंहदी हसन खाँ साहेबांच्या तोडीचे गजल गायक निर्माण होऊ शकतील काय ?
उर्दू गजलगायकीचा इतिहास हा उर्दू गजल लेखनाच्या इतकाच जुना आहे. शतकांच्या या कालावध ीत उर्दू गजल गायनाची कला समृध्द झाली. मराठी गजलची सुरवात भटांपासून मानली तर गझलगायनांची सुरवात सुधाकर कदमांपासून मानावी लागेल म्हणजे मराठी गजलगायकीचे वय फार तर 30ते 35 वर्षे वयाचे मानावे लागेल. एवढ्या कमी कालावधीत मराठीत गजल गायनाची परंपरा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यालाही निदान शतकाचा कालावधी ओलांडावा लागेल. सुधाकर कदम, भिमराव पांचाळे व माझ्यापर्यंत चालत आलेली ही परंपरा पुढे मागे निश्चितच एखादा मेंहदी हसन निर्माण करेल, अशी मला आशा वाटते.
गझलगायनाची मैफल ऐकतांना बरेच गायक गजलकारांचे नांव सांगत नाहीत. पण येणारी दाद साठ टक्के ते सत्तर टक्के शब्दांना असते त्यामुळे ते तसे करतात हे खरे काय ?
गायकांनी गायल्यानंतर जी गझल लोकांपर्यत पोहचते त्यात चाल, आवाज, गजल बांधणी, साथसंगत आणि शब्द फिरविण्याची किमया तसेच गजलकाराची गझलरचना श्रोत्यांपर्यत संप्रेषित करण्याचे कसब ही गायकात असते किंवा असावी लागते त्यामुळे लोकप्रिय झालेल्या लोकांच्या मनात श्रवणाव्दारे घर केलेल्या गझलेच्या यशस्वितेत गायकाचा आणि गजलकाराचा समान वाटा असतो. त्यामुळे अर्थात गायकाने गझकाराचे नाव नमूद करणे हे त्याच्या प्रोफेशनशी बेइमानी करणे आहे असे मला वाटते.
मराठी गझलेत उर्दू गजलची नजकता नाही असे बरेच जणांचे मत आहे तुझे मत काय आहे ?
खावर यांनी मराठी गजलेला उंची दिली, पण त्यांच्या काळातील प्रतिथयश कवी गजल सृजनाकडे वळले नाहीत त्यामुळे गजल हा काव्यप्रकार इतर काव्यप्रकाराहून दुय्यम गणला गेला आणि याउलट उर्दूतील श्रेष्ठ ते कनिष्ठ कवी आपली सृजनशैली गजलच्या फॉर्ममध्येच शिवाय उर्दू भाषेचे सौदर्य शैली शब्दांमधील गोडवा हे ही उर्दू गजलची नजाकता वाढविण्यास मदत करतात, मराठी गजलकारांनीही या ञ्ृष्टीेने प्रयत्न केले चांगले कवी देखील गजल सृजनतेकडे वळले. मराठी गझलेला उर्दू गजलेची नजाकत येण्यास वेळ लागणार नाही.
तुझ्या संगीतावरील प्रबंधनाबाबत जरा विस्ताराने सांग ?
दोन ओळींच्या शेरांचे स्वतंत्र काव्य अस्तित्व, त्याचे स्वयंपूर्णत्व आणि तरीही यमक (काफिया) व अत्यंस्थिर यमकांची (रदीफ) एकासमान धाग्याने विणलेली ही गझल आकर्षित करून गेली. मान्यवर गझलकारांच्या गझलांच्या श्रवणामधून मी गजल स्वरबध्द करून गायला लागलो. पुढे २००२ च्या नाशिकच्या संमेलनामधून गजला गायिल्या. तेव्हा तेथील तेथे गजलवरील परीसंवाद, चर्चासत्रे, मुशायरे मी ऐकले आणि माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपला संशोधनाचा विषय मराठी गजलगायकी वर असू शकतो व गजलगायकीचा सर्वकष अभ्यास करावा म्हणून संशोधनाकरीता मी "स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी गजलगायकीचा उद्गम व आजपर्यंतचा विकास" हा माझा आवडीचा विषय निवडला. या अभ्यासामध्ये माझे मार्गदर्शक डॉ. भोजराज चौधरी यांचे अत्यंत मौलिक मार्गदर्शन व प्रोत्साहनाने मी संशोधन पूर्ण करून प्रबंध विद्यापीठाला सादर केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा