१.
प्रतिष्ठा
तुझे वार थोडे हळुवार व्हावे...
कितीदा गळ्याने सुरीला पुसावे?
किती चोरले तू गळे कोकिळेचे;
तुझा कंठ व्हाया स्वरांनी झुरावे.
कसे प्रेम असते?कसा जीव जातो?
अरे मूर्ख श्वासा तुला ना कळावे!
उभा जन्म झाला भ्रमाची भ्रमंती...
तुझ्या सावलीला कितीदा धरावे.
मला सांग आता तुझ्या वाढदिवशी;
किती श्वास माझे तुला भेट द्यावे!
उन्हाच्या झळांशी लळा लागल्यावर,
तुझ्या सावलीला कशाला बसावे?
गडे सांत्वनाला दिली तू प्रतिष्ठा;
तुझ्या आसवांची रुमालास नावे!
1 टिप्पणी:
सर्वच शेर छान आहेत.
उन्हाच्या झळांशी लळा लागल्यावर,
तुझ्या सावलीला कशाला बसावे?
हा खास आवडला.
टिप्पणी पोस्ट करा