१७ ऑक्टोबर, २०१०

मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत


गझल हा कवितेचा आकृतिबंध आहे. फारसीतून अरबीत; अरबीतून उर्दूत; आणि उर्दूतून जवळपास सर्वच भारतीय भाषातल्या कवितांनी गझलच्या आकृतीबंधाला आपलेसे केले आहे.मराठीतही आज कवितेचा हा आकृतिबंध चांगलाच लोकमान्य आणि रसिकप्रिय झालेला आहे. यमकांच्या धाग्यात गुंफलेली दोन दोन ओळींच्या शेरांची माळ म्हणजे गझल.
            कवितेच्या इतर आकृतिबंधांच्या तुलनेत गझल अधिक यमकप्रधान आहे. कमीतकमी शब्दातल्या दोन ओळीत मानवी जीवनानुभवाचा एखादा पैलू इतक्या उत्कटपणे व्यक्त होतो की वाचणाज्याच्या-ऐकणाज्याच्या मनाला तो चटकन भिडतो. आणि तो शेर सहजपणे एका जिभेवरून दुसज्या, दुसरीवरून तिसज्या असा पुनरावृत्त होता होता त्याला सुभाषितत्वाचा दर्जा प्राप्त होतो.
मराठी कवितेत १९७५नंतरच्या अलिकडच्या पंचवीस वर्षांत गझलचा आकृतिबंध चांगलाच बहरलेला असला तरी त्याचा इतिहास मात्र २५०वर्षांपेक्षाही अधिक जुना आहे.
आतापर्यंतच्या संधोधनानुसार मराठीतले पहिले गझलकार होण्याचा मान अमृतराय या कवीकडे जातो. विदर्भातला बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील साखरखेर्डे हे अमृतरामांचे जन्मगांव. अमृतरामापासून तर उ. रा. गिरी, सुरेश भट पर्यंतचे महत्वपूर्ण गझलकार विदर्भातीलच आहेत. त्यामुळे मराठी कवितेला गझलच्या सशक्त आकृतिबंधाचे महत्वपूर्ण योगदान विदर्भानेच दिले आहे, हे महाराष्ट्राला मान्य करावेच लागेल.

अमृतरायांनी रचलेली -

'जग व्यापका हरीला नाही कसे म्हणावे ?

तंतू पटी मिळाले, भूमी नभापरी हो ।
घट - मृत्तिका निराळी ऐसे कसे म्हणावे '

ही मराठीतली पहिला ज्ञात गझल होय. तिचा लेखनकार अंदाजे इ. स. १७२९ समजला जातो.

           त्यानंतर मोरोपंतांची साधारणत: इ. स. १७८८ मध्ये रचलेली दोन पदे आढळतात.

'रसने! न राघवाच्या थोडी, यशात गोडी'

आणि

-हृदया ! बरे विचारी।नामस्मरे, न तापे '

ही दोन्ही पदे मांडणीच्या दृष्टीने गझलच्या आकृतिबंधाशी साम्य दर्शविणारी असली तरी ती मात्र मुळात गीतेच आहेत.

          १७८८ ते १८८० या जवळपास शंभर वर्षाच्या काळात मात्र मराठी कवितेत गझलचा आकृतिबंध संपूर्णपणे दूर्लक्षित राहिलेला दिसतो. त्याचे काय कारण असावे हे मात्र कळत नाही.नंतर १८८० मध्ये किर्लोस्करांच्या 'संगीत शाकुंतल' या नाटकात आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'संगीत वीरतनय' या नाटकातील काही पदे गझलच्या आकृतिबंधाची प्राथमिक रूपे वाटतात.
             मराठी गझलच्या प्रवासात माधव ज्युलियन हे महत्वाचे वळण आहे. फारसीचे अध्यापन आणि छंद शास्त्राचा व्यासंग माधव ज्युलियनांना गझलकडे घेऊन गेला. फारसीतली गझलांची वृत्ते शुध्द स्वरूपात मराठीत आणावीत म्हणून त्यांनी १९२० ते १९३३ या काळात शंभरावर गझला रचल्या. त्यांचा समावेश  १९३३ साली प्रसिद्ध    झालेल्या 'गज्जलांजली' नामक संग्रहात आहे.हटातटाने रचलेल्या त्यांच्या गझलातील कृत्रिमता आज वाचतांना आपल्याला चांगलीच बोचते. तरीपण गझलांच्या सदुसष्ट फारसी वृत्तांचा त्यांनी प्रात्यक्षिकासह मराठीला करून दिलेला परिचय ही त्यांची मराठी गझलला फार मोठी उपलब्धी आहे. माधव ज्युलियनांच्या गझलातील काही ओळी आजही लक्षात राहण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ -

लाज जरा, हास जरा, हास तू
लाजव या मत्त गुलाबास तू

किंवा

रूक्याची सोयरी सारी फुकाचा सोयरा कोठे ?
दुकाळी सोयजो पाही जिव्हाळा तो खरा कोठे ?

किंवा

भवानी आमची आई शिवाजी आमचा राणा
मराठी आमची बोली गनीमी आमचा बाणा

किंवा

सहधर्मिणी, तुज वाचुनी, दुनिया सुनी मज वाटते
फिरतो प्रसन्न उन्हात मी तरी अन्तरी तम दाटते.

माधवरावानंतर गझलकडे वळणारे महत्वाचे कवी विंदा करंदीकर. त्यांनी १९४१ मध्ये 'लाज' ही पहिली गझल लिहिली. जी त्यांच्या ‘स्वेदगंगा’या संग्रहात समाविष्ट आहे. 'सुरूवातीला गझलांकडे वळलो तो माधवरावांच्या प्रभावामुळे' असे ते एका मुलाखतीत कबूलही करतात. नंतर वीसेक वर्ष ते गझलच्या वाटेला जात नाहीत. आणि नंतर १९६० ते १९६५ या काळात त्यांनी १५ गझला लिहिल्यात. ज्यांचा समावेश १९६८ मध्ये प्रसिद्ध झालेलया 'जातक' या त्यांच्या कवितासंग्रहात आहे.

जेव्हा प्रदक्षिणा ती घालील मारूतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी !

किंवा

लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे
हा जन्म माझा संपला ती वाचतांना शायरी.

किंवा

जो बाटलीत आहे आहेच तो बूचात:
हे सत्य नास्तिकांच्या डोक्यात हाणतो मी !

किंवा

खुश्शाल जा तू मंदिरी, त्याला तिला देण्याफुले
पण त्यातल्या एका फुला हुंगावया विसरू नको.

अशा कितीतरी सुंदर ओळी करंदीकरांच्या गझलात आढळत असल्या तरी त्यांच्या गझला माधवरावांच्या प्रभावातून काही सुटल्यासारख्या वाटत नाहीत.
करंदीकरांनी घेतलेल्या काव्यसंन्यासानंतर ‘मौज’ दिवाळी १९९९  मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या दहा गझला वाचल्या की त्यांनी काव्यसंन्यास घेतला होता, तेच बरे होते, असे प्रकर्षाने वाटल्यावाचून रहात नाही.
माधवराव ते सुरेश भट या गझल प्रवासातील करंदीकर आणि पाडगांवकर हे दोन टप्पे आहेत एवढेच फार तर आपल्याला म्हणता येईल.
१९८१ मध्ये पाडगावकरांचा 'गझल' संग्रह प्रकाशित झाला असला तरी त्यात समाविष्ट गझलांचा लेखन काळ १९६० ते १९८०  असा आहे.

'गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे '

असे जरी त्यांनी एका गझलेत म्हटले असले तरी गझलच्या आकृतिबंधाशी वरवर इमान राखणा-या पाडगावकरांना गझलचा आत्मा आत्मसात करता आला नाही, असेच म्हणावे लागते.
गझलच्या आकृतिबंधात यशस्वीरीतीने काव्य लेखन करणार्‍या उ. रा. गिरींच्या उल्लेखाशिवाय मराठी गझलचा इतिहास अपूर्णच राहील. त्यांनी लिहिलेल्या गझला एक पिंडी भावगीतासारख्या उलगडत जाणार्‍या  असल्याने त्या गझलांना उर्दूची संकल्पना स्वीकारायची तर 'गझल ए मुसलसल' म्हणता येईल.
अभ्यासक-समीक्षकांनी त्यांची गणना गझलकारात करू नये याचेही मोठे आश्चर्य वाटते. मराठी गझल १९२० ते १९८५ असा प्रबंध लिहून पुणे विद्यापीठाची पी. एच. डी. मिळविणाज्या प्रा. डॉ. अविनाश कांबळेच्या पुस्तकात उ. रा. गिरींचा साधा उल्लेखही नाही.त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी दोन ओळींच्या शेराची चार चरणात केलेली मांडणी. या मांडणीमुळे त्यांच्या गझलांचा आकृतिबंध दृश्य स्वरूपात कवितेसारखा नजरेस पडतो व वाचक समीक्षकांना हुलकावणी देतो.
१९६४ ते १९८१ या काळात त्यांनी लिहिलेल्या २९ गझलांचा समावेश १९८३ साली प्रसिद्ध झालेल्या 'मी एकटा निघालो' या त्यांच्या संग्रहात आहे.

खर्जात घर्घराया लागे दूरात जाते
ओवीतुनी मिसळले आवाज कंकणांचे

किंवा

मृदू रेशमी फुलांचा शयनास शेज होती
वक्षी विसावलेली तव सावळी अहंता

किंवा

थोड्याच तू क्षणांची दातार देवयानी
थोडा अजून प्यासा माझ्यातला ययाती

किंवा

सोडून चाललेले माझे मलाच गाणे
मी मैफलीत उरलो वर्ज्य स्वरा प्रमाणे

अशा कितीतरी सर्वांगसुंदर ओळी मराठी कवितेला देणार्‍या   गिरींना मात्र समीक्षेने अद्यापही उपेक्षितच ठेवलेले आहे.अनेकपदरी आशय देणारे शेर अट्टाहासाने रचून प्रत्येक शेर आशयदृष्ट्या स्वतंत्र करणार्‍या कृत्रिम गझल रचनेच्या तुलनेत गिरींचे कितीतरी शेर 'शेरास सव्वाशेर' असेच आहेत. त्यातील सहजता, भावोत्कटता, प्रतिमांचे नावीन्य कवितेच्या केवळ बाह्यांगावर लक्ष केंद्रीत करणार्‍या समीक्षकांना कसे लक्षात यावे ?

            गझलच्या  आकृतिबंधाला सर्वांत महत्वपूर्ण योगदान देणारे कवी म्हणजे सुरेश भट.१५ मार्च १९६१ ते  ११एप्रिल १९९४ या तेहतीस वर्षाच्या कालावधीत सुरेश भटांचे 'रूपगंधा', 'रंग माझा वेगळा', 'एल्गार' आणि 'झंझावात' हे चार कविता संग्रह प्रसिध्द झालेत. ज्यात चार संग्रह मिळून २०४ गझला आहेत. गझलांची एवढी मोठी संख्या एकाच कवीच्या नावावर मराठीत पहिल्यांदाच आढळते.
                       १९७४ ते १९८३ या कालखंडात त्यांच्या गझलांना चांगलाच बहर आल्याचे जाणवते. हे खरे असले तरी 'रंग माझा वेगळा' मधील गझलांच्या तुलनेत नंतरच्या गझला थोड्या डाव्याच वाटतात. ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे सुचतील तेवढे शेर गझले मध्ये कोंबण्याची वृत्ती.
               गझल हा कवितेचा आकृतिबंध आहे. तिच्याकडे एक कलाकृती म्हणून पाहतांना एकंदर प्रभावाच्यादृष्टीने विसविशीतपणा टाळावा लागातो. इतर शेरांच्या तुलनेत डावे असणारे अनेक शेर वगळावे लागतात. परिणामाची एकसंधता राखण्यासाठी शेरांची गझलेतील अपरिहार्यता जोखावी लागते. आणि महणूनच जास्तीत जास्त आठ शेरांची गझल लिहिणारे हिन्दीचे दुष्यंतकुमार गझलकार म्हणून थोर वाटतात. त्याचे कारणही हेच आहे.
           'रंग माझा वेगळा' पर्यंतच्या गझलांचा आपण सूक्ष्मपणे अभ्यास केला तर त्या एकपिंडी भावगीता सारख्या वाटतात.प्रत्येक शेर आशयदृष्ट्या स्वतंत्र असला पाहिजे ही अलीकडच्या उर्दू गझलची खासीयत 'एल्गार' पासून पुढेच त्यांच्या गझलात आढळते.
'एल्गार' मधील 'दीपदान' आणि झंझावात मधील 'बोलणे' ही गझल तेरा शेरांची आहे. दहा-अकरा-बारा शेरांच्या अनेक गझला 'एल्गार' आणि झंझावात मध्ये आढळतात. तर 'रंग माझा वेगळा' मध्ये जास्तीत जास्त आठ शेरची गझल आढळते.

सुरेश भटांच्या गझल लेखनात 'रंग माझा वेगळा' हा एक आणि त्यानंतर 'एल्गार' आणि 'झंझावात' मधील गझलांचा दुसरा असे दोन टप्पे सरळ सरळ पाडता येतात.
'रंग माझा वेगळा' पर्यंतच्या त्यांच्या गझलांचे त्याच संग्रहातील इतर भावकवितेशी दृढ नाते आहे. म्हणून त्या आशयदृष्ट्या एकपिंडी भावगीतांसारख्या वाटतात. पण म्हणून त्यातील काव्यात्म गुणवत्ता कुठेही उणी पडते असे नव्हे. उलट आपण चारही संग्रह एकत्र वाचले तर 'रंग माझा वेगळा' तील मुसलसल गझलाच एकसंध परिणामाच्या दृष्टीने अधिक उजव्या वाटतात.
उदाहरणार्थ-

लाजुनी झाले गुलाबी दु:ख माझे देखणे
ही तुझी श्वासात आली लाघवी आमंत्रणे

किंवा

आसवांनो माझिया डोळ्यातुनी वाहू नका
अंतरीच्या वेदना सा-या जगा दावू नका.

ह्या चार चार शेरच्या गझला असूनही उत्कृष्ट वाटतात. गझलमध्ये कमीत कमी पाच शेर असलेच पाहिजेत. ह्या व्याख्यात्म निकषाला पक्के चिकटून राहणारे सुरेश भट त्यांना अपूर्ण गझला म्हणत असले तरी त्या परिपूर्ण वाटतात. आणि किमान पाच शेरच्या व्याख्यात्म निकषाला निकालात काढतात.

              'रंग माझा वेगळा' नंतर प्रत्येक शेरचा दुसर्‍या  शेरशी आशयदृष्ट्या संबंध नसलाच पाहिजे अशी गझलेची नकारात्मक व्याख्या स्वीकारल्याने आशयदृष्ट्या येणारे पुनरावर्तन 'एल्गार' आणि 'झंझावात' मध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसते. वास्तविक 'गझलमध्ये एका शेरचा दुसर्‍या शेरशी संबंध असतोच असे नाही' अशी व्याख्या सेतू माधवराव पगडींनी 'उर्दू काव्याचा परिचय' या ग्रंथात केली आहे. 'असतोच असेही नाही' म्हणजे असूही शकतो ही होकारात्मकता संपूर्णपणे टाळून संबंध नसतोच अशी नकारात्मक व्याख्या स्वीकारल्यामुळेही 'एल्गार' आणि 'झंझावात' मधील गझलांना आशयाच्या पुनरावर्तनाचा शाप भोवला असावा, असे वाटते.
पण तरीही-

'बांधू हवेत किल्ला बाका बुलंद यंदा
या क्रांतीकारकांचा आवाज बंद यंदा'

किंवा

'आज घालू नका हार माझ्या गळा
मी कुणाचा कळा कापला यार हो'

किंवा

'भयमुक्त गोजिर्‍यांनी स्वातंत्र्य धन्य केले
ही भाकरीच साली अमुचा करी चुराडा

हे आणि असे अनेक भावोत्कट शेर दुसर्‍या सुरेश भटांनी गझलच्या आकृतिबंधाचे मराठी कवितेला दिलेले भक्कम आणि महत्वपूर्ण योगदान मान्यच करावे लागते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: