६ जानेवारी, २०११

आत्मबल देणारी गझल : गंगाधर मुटे

गझल या प्रांतात मी तसा फ़ारच नवखा आहे. गझलांचा समावेश असलेला माझा ’रानमेवा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असला तरी मी अजुनही गझल समजून घेण्याच्याच वाटेवर आहे. माझ्या मनात अजूनही गझलेबाबत बरेच गोंधळ आहेत आणि मी त्यातून वाट शोधायचा प्रयत्न करतो आहे. गझलेविषयीची अनेकांची परस्परात सामजंस्य, एकरूपता नसलेली मते ऐकली की आधीच असलेला गोंधळ आणखी वाढतो. गझलेत रचनात्मक तंत्रशुद्धता असायलाच हवी, हे निर्विवाद. पण गझलेचा विषय/आशय असा असावा, कसा नसावा, याविषयीची गझलेच्या क्षेत्रातील मान्यवरांची मते पाहीली की माझा गोंधळ आणखीनच वाढत जातो.
मराठी गझल नवखी आहे, बाल्यावस्थेत आहे म्हणून असे असेल कदाचित पण बर्‍याच मुद्यावर आजच्या गझलाकारांत एकमत होत नाही, हे खरे आहे. स्व. सुरेश भट यांनी गझलेची बाराखडी लिहून गझलेला एक मजबूत पाया उपलब्ध करून दिला आहे पण अजून त्याही पुढील अनेक बाबींचे उलगडे व्हायचे आहेत. त्यामुळे त्या न उलगडलेल्या मुद्यांस संदिग्धता प्राप्त झाली आहे आणि अशा परिस्थितीत नवगझलकाराला त्याचे फ़टके सोसावे लागत आहेत.
मी याच अवस्थेतून जात असतांना "मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता?" या डॉ.राऊत साहेबांच्या लेखाने माझी बरीच मदत केली. त्या लेखातील "तंत्र कोणत्याही कवितेचे असो; जोवर ते आशयाशी एकजीव झालेले असते तोवर ते आपले स्वतंत्रपणे अस्तित्व जाणवू देत नाही. तीच खर्‍या अर्थाने त्या तंत्राची शुद्धता असते." या वाक्याने माझा मार्ग बराच सुकर झाला. आणि तशातच डॉ. श्रीकृष्णजी राऊत यांचे ”गुलाल आणि इतर गझला” हा गझलसंग्रह हाती पडला आणि मला त्यानिमित्ताने प्रचंड आत्मबळ प्राप्त झाल्यासारखे वाटले. खूप मोठा आधार मिळाल्यासारखे वाटले.
जे काही कळतं ते मलाच कळतं, मीच काय तो पारंगत सर्वज्ञ, असा स्वत:चा समज करून काही मंडळी वावरतात. त्यांचा वावर त्यांच्यापुरता मर्यादित असेल तर इतरांनी हरकत घ्यायचेही कारण नाही परंतु त्यांच्यामध्ये दुसर्‍याला तुच्छ लेखण्याचा जो गूण ठासून भरलेला असतो, त्यामुळे एखाद्याची अपरिमीत हानी होऊ शकते किंवा मानसिक खच्चीकरण होऊ शकते, हे ते समजूनच घेत नाहीत. असाच काहिसा जो मुद्दा आज मला छळतोय, तशाच काहीशा मुद्द्यांनी यापुर्वीही अनेकांना छळलेले आहे, असे खालील शेर वाचल्यावर सहज लक्षात येते. वेगळ्या तर्‍हेने का होईना पण, अशाच तर्‍हेची मनातील खदखद खालील शेरातूनही व्यक्त झाली आहे, याची प्रचिती येते.

दोह्यात जीव नाही, गझलेत जान नाही
शायर जगात दुसरा, माझ्या समान नाही

इतरांना कस्पटासमान लेखणारी वृत्ती वरील विडंबनात्मक शेरातून छान व्यक्त झाली आहे. तो तुकड्या असो की गाडगेबाबा, तुकाराम असो की कबीर, हे सारेच तुच्छ आहेत कारण त्यांचेकडे वांङमयीन पांडीत्य नाही, म्हणून आपणच कसे दर्जेदार आहोत, असे वाटणार्‍या स्वनामधन्य प्रवृत्तींना हा सणसणीत फ़टकारच ठरावा. शिवाय यांचे कर्तृत्व, श्रेष्ठत्व तरी काय? तर उर्दूमधला आशय चोरायचा आणि त्याचे मराठीकरण करायचे. बस्स एवढाच ना?

चोरून रोज खातो, उर्दू मधील लोणी
सायीवरी मराठी माझे इमान नाही

अन्य भाषेतील आशय मराठी गझलेत येऊ नये असे नाही, पण त्यापोटी मराठी सौंदर्य बलस्थानांना कस्पटासमान लेखण्याचे प्रयोजन काय? मराठी भाषेला स्वत:चे सौंदर्य आहे, स्वत:ची नजाकत आहे, स्वत:चा सुगंध आहे. पण तो सुगंध तमाम प्रांतीय बोलीभाषेसहीत शुद्धभाषेत दडला आहे. प्रांतीय बोलीभाषेबद्दल अढी बाळगणार्‍यांना तो सुगंध कळावा तरी कसा? जेथे प्रेम नाही तेथे सन्मान नाही आणि जेथे सन्मान नाही तेथे इमान तरी कुठून येईल?
सर्व गेले तरी चालेल,पण नाक शाबूत असायलाच हवे. पण एकदा इमान राखायचे नाही म्हटले की, नाक घासणे ओघाने येतेच. त्यांना हा शेर तरी कसा पचनी पडेल बरे?

चाणाक्ष त्या हवेचा, श्वासात धाक ठेवा
चालेल जीव गेला, शाबूत नाक ठेवा

‘रानमेवा’ हा आपला कवितासंग्रह श्रीकृष्ण राऊत यांना भेट देताना गंगाधरजी मुटे

डॉ. राऊत साहेबांच्या गझला मी जसजसा वाचत गेलो, तसतसा मला त्यांच्या काही गझलातून त्यांच्या मनातील खदखदणारा असंतोष, ज्वालांचे रूप घेऊन विद्रोहाच्या रंगात प्रकटतांना दिसला. त्यांनी अनुभवलेली, मनात खोलवर रुतून बसलेली खंत विजेच्या कडकडाटाप्रमाणे शब्दांमधून साकार झालेली दिसली.

पेटले तुझ्या स्पर्शाने चवदार तळ्याचे पाणी
धगधगत्या संघर्षाने शब्दांना फ़ुटली वाणी
यासारखे शेर किंवा जे माझ्या आवाक्यात होते ते मी करण्याचा प्राणपणाने प्रयत्न केलाय. पण हे सर्व माझ्या एकट्याने होणार नाही त्यासाठी तुझी साथ हवीय, असे सांगताना ते एका शेरात लिहितात,


तोडल्या चौकटी मी जुन्या
भिंत ती तेवढी तोड तू

किंवा,

डोक्यात वीज माझ्या, ओठावरी निखारे
माझ्या उरात ताजे हंगाम पेटलेले

पण साद घातली की हवा तसा प्रतिसाद मिळतो, असे थोडेच आहे? मग त्यांची गझल समजावणीचा मार्ग चोखाळते. अबोलतेला परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करते.

टपलेत भोवताली चारीकडून बोके
सांगा कुण्या खुबीने वाचेल साय आता?

असा मार्मीक प्रश्नही विचारती होते. पण एवढे करूनही अबोलपणा जेव्हा अबोलच असतो तेव्हा त्याला बोलके करण्यासाठी मग मात्र त्यांची गझल थोडीसी आदेशात्मक आणि अधिकारात्मक रूप धारण करते.

तोंडास काय टाळे लावून बैसला तू
सोसू नको मुक्याने तू आज बोल काही

डॉ. राऊत साहेबांच्या गझलेविषयी लिहावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या गझलेने मला खूप आत्मबल दिले आणि यापुढेही त्यांची गझल मला वेळोवेळी, विशेषत: आणिबाणीच्या प्रसंगी पुरेपूर मनोधैर्य प्रदान करीत राहील, याची खात्री आहे.
_________________________________________________________________

गंगाधर मुटे
gangadharmute@gmail.com
आर्वी छोटी - ४४२३०७
ता. हिंगणघाट जि. वर्धा


1 टिप्पणी:

रवींद्र कामठे Ravindra Kamthe म्हणाले...

खपच छान गंगाधर मुटेजी. तुमचे हार्दिक अभिनंदन

रविंद्र कामठे.
५ ऑक्टोबर २०१४