६ जानेवारी, २०११

सामाजिक आशयाची सर्वांगीण अभिव्यक्ती : श्रीराम गिरी

विरंगुळा म्हणून कोणी कवी काव्य निर्मिती करील असेल असे मला वाटत नाही. आणि अशा कवीच्या हातून चांगली काव्यनिर्मिती होत असेल असेही मला वाटत नाही. मुळात आपण ज्याला कवी म्हणतो तो सामान्य माणसापासून वेगळाच असतो. प्रापंचिक माणूस वैयक्तिक विवंचनापलीकडे सहसा जात नाही. आपले कुटुंब व आपण भले. आपला दैनंदिन रेटा रेटत तो जगत असतो. समाजातील इतर घटकांशी औपचारिक संबंध ठेवणेच तो पसंत करतो. संवेदनशील कवीचे तसे नसते. तो सभोवतीच्या जगाशी भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला असतो. समाजाच्या सुखदुःखांशी त्याचे कर्तव्य असते. एकूण जगाची आग त्याला जाळत असते. पण तो तात्काळ काहीच करू शकत नाही. म्हणून तो कवितेला कवेत घेऊन मोकळा होतो. यामध्ये कधी संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत तुकाराम तर कधी केशवसुत, सुरेश भट, नारायण सुर्वे तर कधी श्रीकृष्ण राऊत असतात.
प्रत्येक कवीची अभिव्यक्त होण्याची पद्धती वेगळी असते. कोणी संततधार होऊन बरसणारा संत ज्ञानेश्वर असतो तर कोणी विजेसारखा कडाडून कोसळणारा संत तुकाराम असतो. जहाल व मवाळ व्यक्तिमत्वे सगळीकडे आढळून येतात. गझल काव्यप्रकारामध्येही सुरेश भटाप्रमाणे ज्यांना कधी मवाळ होता आले नाही असे सुरेश भटांनंतरचे आघाडीचे गझलकार श्रीकृष्ण राऊत होत.
ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची गझल एकूणच मराठी गझलकाव्य प्रकाराला सधन आणि समृद्ध करणारी आहे. सुरेश भटानंतर खर्‍या अर्थाने सदर काव्यविधेची व रसिकांची तहान त्यांनी भागवली. सुमारे ३५ वर्षे अविरत काव्य लेखन करणार्‍या श्रीकृष्ण राऊत यांना नुकताच मुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ व मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मरठी गझलकाराला दिला जाणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्राप्त झाला. वीस वर्षापूर्वीच पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर या दिग्गजांनी राऊत यांच्या गझलेची विशेष दखल घेऊन ती गौरविली आहे. दशरथ पुजारी, सुरेश वाडकर, सुधाकर कदम, भीमराव पांचाळे, रफिक शेख इ. गायकांनी ती गायली आहे. अनेक नियतकालिकातून ३५ वर्षांपासून गझल लेखन करणारे श्रीकृष्ण राऊत यांनी गझल शिवाय कविता, गीत, कथा, एकांकिका, समीक्षण आदी स्वरूपातील विपुल लेखन केलेले आहे. त्यांच्या नावावर रसिक प्रिय असा ‘गुलाल आणि इतर गझला’ हा एकमेव गझलसंग्रह आहे. जवळपास ९०-९५ गझलांच्या बळावर आपले
श्रेष्ठत्त्व सिद्ध करणार्‍या ह्या गझलकाराच्या निवडक गझलांचा परामर्ष घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे.
समाजपरिवर्तनाचे व्रत स्वीकारणारी ही गझल आहे. साहित्याच्या माध्यमातून सुरू असलेली सामाजिक चळवळ व प्रत्यक्ष समाजसुधारकांनी चालवलेली सामाजिक चळवळ हे बदलांचे दोन्ही मार्ग परस्परपुरक आहेत. हिंदीतील दुष्यंतकुमार व मराठीतील सुरेश भट ही याची ताजी उदाहरणे होत. याच परंपरेतले श्रीकृष्ण राऊत सामाजिक लढ्यात स्वतःला अग्रस्थानी ठेवून पुढील पिढीला याचसाठी सजग व सज्ज राहण्याचे आवाहन करतात-


‘चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा;
चालेल जीव गेला शाबूत नाक ठेवा.’

‘वाफयातले जुने हे बदलू जरा बियाणे;
तेव्हा कु्ठे इथेही उगवेल पेरलेले.’

घेऊन ते मशाली येतील जाळण्याला;
लाक्षागृहात आता खोदा भुयार आधी.’

‘हुंकार देत आहे काळोख भोवताली;
सांभाळ रे दिव्या तू रंगीत रोषणाई.’

‘पर्णात ओल नाही झाल्यात जीर्ण शाखा;
वृक्षावरी युगाच्या लावा नवी पताका.’

‘अजून नाही रात्र संपली;
सक्त पहारा देत जाग तू.’


अभिनेता-कवी किशोर कदम ‘सौमित्र’ यांच्या सोबत रंगलेली चर्चा


प्रत्यक्ष अनुभवाने काव्यनिर्मितीत वास्तवता येते तर चिंतनाने जाणिवा व्यापक होतात. आणि असे झाले तर कवी नेमकेपणाने अभिव्यक्त होतो. कवीचे विचारही वाचकांना थेटपणे कळतात. राऊत यांना समाज आमुलाग्र बदललेला हवा आहे. सामाजिक दुखण्यावर त्यांना मलमपट्टी नको आहे. परंतु समाज हा प्रेमाने सांगून बदलणार आहे का? ही सामाजिक दुखणी दूर कशी होणार? या संदिग्ध मनःस्थितीत कवी असतानाच कैफियत विद्रोहात रूपांतरीत होते. आणि सामंजस्याची भाषा सोडून कविता थेट व्यवस्थेशी भिडते-
‘बेरंग बाग झाली; कोठे सुगंध गेले?
येथे ऋतूऋतूंनी चाळे अनेक केले.’

‘आत्मकेंद्री फार झाले खानदानी आरसे;
त्यात नाही स्पष्ट आता दुःख माझे फारसे.’

‘पणाला लावली अब्रू सभेने ह्या;
कधी येणार श्रीरंगा, मला सांगा.’

‘कधी आसूड पाठीवर कधी पोटावरी लाथा;
कधी या चंद्रमौळींच्या दिव्यांना झोंबतो वारा.’

‘लावा खुशाल बोली विक्रीस गाव आहे;
चौकात मांडलेला अमुचा लिलाव आहे.’

’’देहविक्रयावरी रात्र सांज भागवी;
थंड बैसला मुका काय हा करे दिवस?’

कवी कुसुमाग्रज व सुरेश भट यांच्या कवितेने माणसाला दिलेला आत्मविश्वास मराठी काव्येतिहासात अजरामर झाला आहे. पराभवाच्या काळोख्या विवरातून प्रवास करताना सोबतीला उरात जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अखेरचा विजयोत्सव आपलाच असतो. हा आत्मविश्वास, ही इच्छाशक्ती राजकीय, सामाजिक, व्यक्तिगत यांपैकी कु्ठल्याही स्वरूपाची असू शकते. कविता माणसाला जगण्यासाठी बळ पुरवते हेच खरे.
‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा;
विजा घेऊन येणार्‍या पिढ्याशी बोलतो आम्ही.’

कविवर्य उत्तम कोळगावकर,गझलनवाज भीमराव पांचाळे आणि चि.संकेत राऊत सोबत

सुरेश भटांच्या परिवर्तनाविषयीचा हाच अतुट विश्वास व निर्धार श्रीकृष्ण राऊत यांच्या सामाजिक आशयाच्या गझलेचेही वैशिष्ट्य आहे. त्यांची कविता भावी पिढीशी संवाद साधणारी आश्वासक अशी आहे. त्यात समाजाला सावध राहण्याच्या इशा‍र्‍यासोबत उज्ज्वल भविष्याचा ‘वचननामा’ देखील आहे.

‘रक्ताळल्या पहाटे उगवेल सूर्य नक्की;
डाल्यात कोंबड्याला कोणी खुशाल झाका.’

’’बांधून टाकलेली आहे जरी हवा ही;
उच्चार वादळाचा तो थांबणार नाही.’

‘वारूळ शोधणार्‍या मुंग्या पुढे निघाल्या;
वाटेत पर्वतांनी केली जरी मनाई.’

’’ज्यांची उद्या भरारी छेदेल अंबराला;
संचारली हवा ती ह्या पाखरात माझ्या.’’

’’जरी न आला मला तोडता कधी पिंजरा;
जाळे घेऊन उडतील थवे मी गेल्यावर.’

राऊत यांची स्त्रीविषयक सामाजिक गझल विशेष लक्ष वेधून घेते. स्त्री स्वातंत्र्याआड येणार्‍या सर्वच समस्या बुद्धीवादाने सुटणार्‍या नाहीत. मान्य असूनही काही बदल पुरूषी मनोवृत्ती स्वीकारत नाही. स्त्रियांच्या अनेक समस्येवर तोड केवळ कायदाच होऊ शकतो. एकीकडे समाजमन आमुलाग्र बदलत नाही आणि दुसरीकडे कायदाही धनदांडग्यांचा बटीक झालेला. मग गर्भजल परीक्षा थांबणार कशा? आजही देशातील बहुतांशी राज्यात कौटुंबिक पातळीवरील आर्थिक प्रश्न स्त्रीचे लैंगिक शोषण करून सोडवले जातात.

‘देतोस थोरली की धाकलीस नेऊ;
हा कर्ज फेडण्याचा साधा उपाव आहे.’
ह्याला जबाबदार त्या कुटुंबातील पुरूष? स्त्री? का आर्थिक विषमता? अशा अनेक स्त्री समस्यांच्या संदर्भात वाचकांना अंतर्मुख करण्याची ताकद कवीच्या गझलात आहे. याचबरोबर एका बाजुला कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी प्राणाची बाजी लावणारी स्त्री तर दुसरीकडे स्त्रीस्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ लावून चक्क मातृत्व नाकारणारी आधुनिक स्त्री एका वेगळ्याच समस्येकडे इशारा करते. अन्यायग्रस्त स्त्री विषयीचा कळवळा आणि आईत्व नाकारून भारतीय संस्कृतीमध्ये असणार्‍या पवित्र परंपरेचा अवमान करणार्‍या स्त्रीचा धिक्कारही ही गझल करते. कवीचा कुठलाही विचार, कुठलेही तत्त्वज्ञान समाज व भारतीय संस्कृतीप्रति पूर्वग्रहदुषित नाही हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

‘क्षणाची ही कशी पत्नी? अनंताची कशी माता?
कसे सौभाग्य हे आहे? दुधाचा कोळसा झाला.’

‘सौंदर्य आपले ती सांभाळते असे की;
नाहीच लेकराला पाजीत माय आता.’

‘राज्यात कोतवाली त्यालाच लाभते;
लाचेत देत आहे जो लेक भामटा.’

‘परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;
मला सांगू नको रामा तुझा वनवास थोडासा.’

‘कशी कळेना सुरूच आहे इथे वडांची अजून पूजा;
जिथे कधीही नवीनवेली उभ्याउभ्याने जळून जाते.’

‘तू वांझ गाजलेली; आई कसा म्हणू मी?
पान्ह्यात दूध नाही, काखेत बाळ नाही.’

‘केली होती जरी परीक्षा गर्भजलाची;
चौथ्यानेही मुलगी होऊन डसली चिंता.’

‘काय झाले सांग पोरी सोसणे आहे गुन्हा;
फाटलेले पोलके अन् देह का हा कापरा?’

येथे कवीच्या सिद्ध हस्त लेखणीतून काही सामाजिक भाष्ये साकारलेली आहेत;ज्याला जात, धर्म, इतिहासपुराण आदींचे फारसे संदर्भ नाहीत. कु्ठल्याही कालखंडात आत्मकेंद्रित, सुखलोलुप माणसे समाजात कायम असतात. ते हरप्रकारे इतरांचे सुख ओरबाडून घेण्यात तत्पर असतात. दुर्बल, लाचार माणसाचे शोषण त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच असते. त्यांना कु्ठलेही सामाजिक कर्तव्य नसते. सुरेश भटांनी बहुतांशी गझल ह्या लोकांना बदलण्यासाठीच लिहली. ‘ही दुनिया पाषाणाची’ हे वर्णन त्यांचेच आहे. संत तुकाराम यांनीही अशा वृत्तींच्या लोकांमुळेच तत्कालीन परिस्थितीला ‘कलीयुग’ असे संबोधले आहे. सद्य परिस्थितीवरची राऊत यांची अशीच काही सामाजिक चिंतने :

‘प्राणापल्याड जपते निवडुंग जागजागी;
अन् टाकते फुलांची मोडून मान वस्ती.’

‘बाहेर एकमेका सौजन्य दाखवा रे;
आतून सज्ज सारा विश्वासघात आहे.’

‘भिंती चतूर त्यांच्या संभाळती तिजोर्‍या;
पाहून माणसाला ती लागते कवाडे.’

‘किनारी चंद्रभागेच्या विकत घ्या प्लॉट मोक्याचे;
तुम्हाला सांगतो तुमच्या भल्यासाठी तुकारामा.’

प्रत्येक प्रसंगी शत्रुला आपल्याकडील धारदार शस्त्र दाखवावेच असे नाही; तर तो नजरेनेही गर्भगळीत व्हावा. आक्रमकता, रोखठोक भाषा, उपहास, उपरोध खरे तर ही सामाजिक कवितेची वैशिष्ट्ये होत. परंतु अतिरेकी वापरामुळे त्याचा प्रभाव कमी होतो. प्रतिमा, प्रतिकांचेही असेच होते. राऊत यांच्याही सामाजिक कवितेमुळे त्यांच्या प्रेमादी विषयांवरची कविता झाकोळून गेल्यासारखी वाटते. परंतु ही उणीव भरून निघते ती राऊत यांच्या गझलेतील सामाजिक आशयाच्या विपुल अर्थछटांमुळे. त्यामुळेच राऊतांची गझल सामाजिक आशयाची सर्वांगीण अभिव्यक्ती ठरते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: