श्रीकृष्ण नारायण राऊत यांचा जन्म दि. 01/07/1955 साली पातूर जि. अकोला येथे झाला. पातूर हे अकोल्यापासून 32 कि. मी. अंतरावर असणारं छोटसं गांव. आपल्यात जे पोटेन्शिअल आहे ते व्यक्त करण्यासाठी त्यांनी प्रथमत: 1972 सालापासून गो. रा. वैराळे संपादित दै. शिवशक्ती या दैनिकातून ग्रामीण जीवनाविषयी लेखनाला सुरूवात केली. लेखन करीत असताना आधी वाचन हवं हे त्यांना पुरतं माहीत होतं. चांगल वाचन असल्याशिवाय चांगलं लेखन करणे तसं अशक्यचं. 1971-75 हा तसा त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा कालखंड डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर येथे बी. कॉमचे शिक्षण घेत असतांना त्यांनी तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, समर्थ रामदास, होनाजी बाळा, पठ्ठेबापुराव आदी प्राचीन व अर्वाचीन वाङ्मयाचे बरेच वाचन केले.सुरूवातीला हे वाचन अभ्यासक्रमापुरतेच, परीक्षा पास होण्यापुरतेच मर्यादित होते. परंतु ते वाचन सुरू असतांना त्यांना त्यात आवड निर्माण झाली. आणि त्यानंतर चिकित्सक अभ्यासाच्या दृष्टीकोनातून, स्वत:च्या ज्ञानात भर पाडण्यासाठी त्यांनी ते वाचन पुढे सुरू ठेवले. त्याच दरम्यान त्यांनी कु सुमाग्रज, सुर्वे, महानोर, मर्ढेकर, भा. रा. तांबे, अरूण कोल्हटकर आदी कवींचे साहित्य वाचले. ते वाचल्यानंतर आपणही त्यांच्यासारखं लिहायला हवं म्हणून 1973-74 पासून त्यांनी कविता लेखनास सुरूवात केली.
कविता लेखन करीत असतांनाच 1974 साली सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा संग्रह त्याच्या हाती पडला व त्यानंतर ते गझलच्या चुंबकीय श्रेत्राकडे नकळत ओढल्या जाऊ लागले. त्याच दरम्यान उ. रा. गिरींच्या संपर्कात ते आले उ.रा. गिरींसोबतच्या त्यांच्या भेटी वाढल्या त्यातून होणार्या चर्चा, मैफलींमुळे ते गझलच्या अधिकच प्रेमात पडले. मराठी गझल सोबतच त्यांना उर्दुमधील दुष्यंतकुमार सुद्धा खुणावू लागले. उ. रा. गिरी, सुरेश भटांसोबत त्यांनी संपूर्ण दुष्यंतकुमार आत्मसात केले. हया तीन मोठ्या गझलकारांचे वाचन केल्यानंतर त्यांच्या ओठांवर नकळत गझल रेंगाळू लागली परंतु गझलच्या श्रेत्रात मुशाफिरी करायची म्हटलं तर आधी तिचं तंत्र अवगत असणे भागच. गझलचं तंत्र अवगत नसेल तर गझल लिहिणे तशी कठीणच परंतु चांगली गझल लिहिण्यासाठी आधी चांगली कविता लिहिता येणे ही तिची आवश्यक अट. श्रीकृष्ण राऊत यांच्या कवितेच्या मनगटात ताकद असल्यामुळे गझलशी दोन दोन हात करण्यासाठी त्यांनी कंबर कसली व छंदवृत्त या गझलकरिता लागणार्या व्याकरणाकरिता बारकाईने अभ्यास करण्यासाठी रा. श्री. जोग यांचं काव्यविभ्रम नंतर माधवराव पटवर्धन यांचं छंदोरचना या ग्रंथांचा अभ्यास केला. सुरूवातीला गझलला लागणार्या संपूर्ण गोष्टींचे त्यांनी चिंतन करून त्या गोष्टी आत्मसात केल्या. आणि 1976 सालापासून गझल लेखनास सुरूवात केली.
1975 नंतरचा कालखंड हा समांतर सिनेमाचा , साहित्याच्या सामाजिक बांधिलकीचा. त्याकाळातही ना. धो. महानोरांच्या 'रानातल्या कवितां'चा प्रभाव तर होताच शिवाय ग्रामीण कवितेचा सुद्धा जास्त प्रभाव होता. स्व. डॅडी देशमुख हे त्यावेळेस अकोल्यातील मोठं नाव. पुण्या मुंबईच्या झगमग चंदेरी, रूपेरी दुनियेच्या तुलनेत आपला विदर्भ सुद्धा कमी नाही हे त्यांनी दाखवून दिलं. मराठी सिनेसृष्टीतील पुणे, मुंबईच्या लोकांची मक्तेदारी मोडीत या महाराष्ट्राला दोन मोठे सिनेमे दिले ते म्हणजे 'देवकी नंदन गोपाला' व दुसरा 'राघू मैना'.
त्याकाळातले हे दोन्ही सिनेमे राष्ट्रीय पुरस्कार विजेते. त्यातील 1981 साली निर्मीत राघू मैना या चित्रपटासाठी गीत लेखन श्रीकृष्ण राऊत यांनी केलं. यातून त्यांनी दाखवून दिलं की, प्रकार हा कुठलाही असो त्यासाठी जी शब्दात ताकद लागते ती त्याच्यात आहे.याच सिनेमातील त्यांचे एक गीत 'वाटली घडी घडी युगापरी तुझ्याविना' हे त्याकाळी एयर इंडियाच्या म्युझिक चॅनेल करिता निवडल्या गेले होते. याव्यतिरिक्त त्यांची काही गाणी उत्तरा केळकर, सुरेश वाडकर यांनी सुद्धा गायिली आहेत.
ख्यातकीर्त सिने दिग्दर्शक राजदत्तजी यांचा प्रेमळ सहवास
1989 साली पहिला 'गुलाल' हा गझल संग्रह प्रकाशित झाला आणि त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 2001 साली 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर जन्म घेणा-या तान्हया मुला' हा कविता संग्रह प्रसिध्द झाला. हा संग्रह प्रकाशित झाल्यावर असं वाटू लागलं की, पुरस्कार जणू त्यांच्या याच कविता संग्रहाच्या प्रतिक्षेतच होते की, काय कारण या संग्रहाकरीता त्यांना अनेक मोठे पुरस्कार प्राप्त झाले त्यात प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पद्मश्री डॉ. विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार, कवयित्री संजिवनी खोजे स्मृती पुरस्कार, तुका म्हणे काव्य पुरस्कार, वि. सा. संघाचा शरदश्चंद्र मुक्तिबोध काव्य पुरस्कार, प्रसाद बन ग्रंथ पुरस्कार, कवी यशवंत पुरस्कार, भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, इत्यादी. या व्यतिरिक्त त्यांच्या 'जो जो रे' या कवितेचा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. अंतिम वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.
कविता, गझल, गीत, रूबाया, अभंग, मुक्तक कथा, एकांकिका, या सोबतच डॉ. पंजाबराव देशमुख यांचया जीवनावर आधारित एका माहिती पटाचे स्क्रिप्ट लेखन केलेले आहे. सर्वोत्कृष्ट एकांकिका 1978 मध्ये त्यांच्या ब्लाईंड शो या एकांकिकेचा समावेश करण्यात आलेला आहे.तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर आधारीत माहिती पटाचे शुटींग प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त यांच्या दिग्दर्शनात येत्या काही दिवसात सुरू होणार आहे.
फेब्रवारी 2003 मध्ये ' गुलाल' या संग्रहातील गझला व नव्याने लिहिलेल्या काही गझला मिळून त्यांच दुसरा गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर मार्च 2003 मध्ये चार ओळी तुझ्यासाठी हा गाथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. हा संग्रह ब्रेललिपीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्यांचा प्रकाशनाच्या वाटेवर असलेला 'तुकोबादशहा' ह्यासंग्रहातील अभंग तर त्याच्या आजवरच्या जीवन अनुभवांचा जणू अर्कच आहे. 'कोरकू आदिवासींच्या पारंपरिक मौखिक गीतांचा लोकतत्वीय अभ्यास' या विषयावर त्यांनी संशोधन केले. त्याबद्दल त्यांना अमरावती विद्यापीठाने आचार्य ही पदवी बहाल केलेली आहे.
इंटरनेटच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तर त्यांची गझल केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता सातासमुद्रापार गेलेली आहे. त्यांनी सुरू केलेल्या ब्लॉग मध्ये प्रामुख्याने 'माझी गझल मराठी ', 'गझलकार', 'गाथा मराठी मनाच्या', ‘श्रीकृष्ण राउत यांच्या मराठी कविता’ व 'जरा सोचो' या इंटरनेटवरील ब्लॉग्जनी तर मराठी रसिकांना एक नवे दालन उघडे करून दिले आहे. एखाद्याने त्यावर पीएच. डी. करावी इतकी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. 'स्टार माझा' ने घेतलेल्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेकरीता तयार करण्यात आलेल्या जाहिरातीत त्यांच्या 'माझी गझल मराठी' या ब्लॉग्जच्या काही क्लिप्स समाविष्ट करण्यात आल्या होत्या, ही गोष्ट म्हणजे त्यांच्या ब्लॉगच्या डिझाईन-कल्पकतेला मिळालेली दाद आहे.
सध्या श्रीकृष्ण राउत श्री. शिवाजी महाविद्यालय अकोला येथे कॉमर्स विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. गेल्या 35 वर्षापासून ते लेखन करीत आहेत. लेखनाच्या बाबतीत त्यांनी कुठल्याही प्रकारे तडजोड केलेली नाही. स्वत:च्या लेखनावर निष्ठाअसणार्या या कवीला 'जीवन गौरव' देऊन पुरस्कृत करण्यात येणार असले तरी त्याचा त्यांच्या लेखनावर कुठलाही फरक पडणार नाही कारण पुरस्कार ही मान्यता आहे; पुरस्कारासाठी म्हणून कुणीही लेखन करीत नसतो असे ते मानतात प्रत्येकाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी असं नव्याने लिहिणार्यांना ते आवर्जून सांगतात.
_____________________________________________________
अभिषेक घ. उदावंत लक्ष्मी नगर, डाबकी रोड, अकोला.मो. नं. 9922646044
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा