६ जानेवारी, २०११

मराठी गझलचा धृवतारा : श्रीकृष्ण राऊत : प्रा. राहुल गोवर्धन माहुरे

मराठी गझलच्या क्षेत्रात विविध दिग्गजांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून जम बसविण्याचा प्रयत्न केला पण ते पाहिजे त्या प्रमाणात त्यामध्ये आपला जम बसवू शकले नाही. मराठी गझल क्षेत्राला प्रत्येक व्यक्ती आकर्षित होतो. बरेच नवोदित प्रयत्न पण करतात, परंतु पूर्णतः यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी लागतो त्याग, अनुभव आणि गझलचे तंत्र आणि हे सर्व भरभरून ज्यांना मिळाले ते म्हणजे आमचे आदरणीय गुरूवर्य डॉ. श्रीकृष्ण राऊत. त्यांनी मराठी गझल क्षेत्राला नव्या आशा आणि दिशा प्रदान केल्या आणि नवोदितांसमोर कशा प्रकारे गझल लेखनाचे कार्य करावे याचा एक मार्गच दाखवून दिला.

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माला ग्लानी किंवा संकटे येतात तेव्हा कृष्ण जन्म घेतो असं काही लोक म्हणतात. परंतु आजतागायत पृथ्वीवर एवढी भयंकर संकटे आलीत, तरी त्यांनी तर जन्म घेतला नाही पण साहित्यातील कवितेतील व गझल क्षेत्रातील मक्तेदारी संपविण्यासाठी मात्र श्रीकृष्ण राऊत यांनी जन्म घेतला हे उल्लेखनीय.

श्रीकृष्ण राऊत हे नांव आज संपूर्ण साहित्य क्षेत्रात -गझलच्या क्षेत्रात एक नावाजलेलं आहे. जीवनात एका व्यक्तिने किती संघर्षाचा सामना करावा? एवढ्या सगळ्या संकटांना तोंड देवून संघर्षमयरीत्या जीवन जगून कितीतरी व्यक्तींना मोठेपण या कृष्णाने प्रदान केले आहे. म्हणतात ना की व्यक्तींचे मोठेपण हे त्याने किती माणसे मोठी केलीत यावर अवलेंबून असतं. एवढं मोठेपण या व्यक्तीमध्ये असून देखील आजही गर्वाने किंवा अभिमानाने हा व्यक्ती मलीन झाला नाही.

श्रीकृष्ण राऊत यांच्या कविता आणि गझलांचा विचार करतांना प्रत्येक गझलेत किंवा कवितेत पुरोगामी विचार, वास्तवता, स्त्री जाणीव, जीवनाची खरी वाटचाल, उमेद, यांचा प्रभाव जाणवतो. विविध दिग्गज व्यक्तींनी त्यांच्या कवितेवर-गझलेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका आयुष्यात व्यक्तींनी किती कामे करावीत? अशी विविध कार्ये मराठी साहित्यात त्यांनी केली आहेत. समाजात कुठलेही स्थान नसलेल्या आदिवासी कोरकु जमातीच्या लोकगीतांवर आपला पीएच.डी.चा प्रबंध सादर केला. आदरणीय डॅडी देशमुखांची निर्मिती असलेल्या 'राघू-मैना' चित्रपटातील गीतांचे लेखन करून चित्रपट क्षेत्रात आपले पाऊल टाकले. त्याच प्रमाणे राजदत्त सारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर डॉक्युमेन्ट्री फिल्म तयार करण्याचे त्यांचे कार्य प्रगतीपथावर आहे.

श्रीकृष्ण राऊत यांना एखाद्या चित्रपटातील कलावंताप्रमाणे विविध भूमिका सादर कराव्या लागतात आणि अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी त्या पार पाडल्या आहेत व पार पाडीत आहेत. ते उत्तम पुत्र आहेत, उत्तम पती, उत्तम पिता त्याच प्रमाणे उत्तम प्राध्यापक आणि आता उत्कृष्ट विभाग प्रमुख म्ह्णून कार्यरत आहेत. आपल्या अधिनस्थ असलेल्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात त्यांचे एक सन्मानाचे स्थान आहे. अत्यंत आनंदाने जीवन जगण्याचा जणू मार्गच राऊतांना सापडलेला आहे असं त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वातून आपल्याला प्रतीत होतं.

‘चार ओळी तुझ्यासाठी’चे ब्रेल लिपीत प्रकाशन प्रसंगी डावीकडून कला दिग्दर्शक अरूण रहाणे आणि अभिनेता मिलिंद शिंदे

प्रत्येक क्षेत्राचं सखोल ज्ञान राऊत यांच्या शब्दांतून व्यक्त होते. ओशोसारख्या महान व्यक्तिच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर जाणवतो. त्याचप्रमाणे महात्मा फुल्यांच्या विचारांचे ,पुरोगामीत्वाचे बाळकडू त्यांनी लहानपणापासून घेतलेले आहे, असे त्यांच्या कवितांच्या ओळींतून जाणवते.

जीवनातील वास्तवा बरोबरच ही दुनिया ज्यावर आजही टिकून आहे असं 'प्रेम', या प्रेमाची चाहूलचं काय तर अख्खा प्रेमग्रंथ यांच्या गझलांवर आपल्याला लिहिता येईल. श्रीकृष्ण राऊतांनी आपल्या गझलेत प्रेम या सर्वोच्च भावनेचा आदर नेहमी केलेला आहे. म्हणुन ते म्हणतात की,

''तुझ्या गुलाबी ओठांवरती गीत लिहावे ओठांनी''

प्रियकराची ही आर्त आस त्यांनी आपल्या या गझलेद्वारा व्यक्त केली आहे.

व्यक्ती हा नेहमी दूरदृष्टीचा असायला हवा असं म्हणतात ना, तर श्रीकृष्ण राऊतांनी या दूरदृष्टीचा आणि बदलत्या जगाचा झपाट्‌याने होणारा विकास लक्षात घेतला . वेळेबरोबरच चला या नियमाप्रमाणे शाईच्या पेनाने कविता लिहिण्यापासून सुरूवात केलेल्या या कविने संपूर्ण विश्वामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या साधनाचा उपयोग करून आज आपली वेबसाईट, ब्लॉग तयार करून पातूरच्या एका लहानशा गावातील हा व्यक्ती आपली कविता घेऊन पॅरीसच्या रसिकांच्या घरात पोहोचला हे विशेष.

एवढचं नाही तर आपल्या कविते प्रमाणेच आपण ज्या फॅकल्टीला शिकवितो त्याचं भान ठेवून स्वतः 'कॉमर्स टुडे' नावाचा ब्लॉग देखील व्यवस्थितपणे सांभाळत आहेत. सर्वांनाच अवाक करणारे असं त्यांचे हे कार्य आहे यात शंका नाही कारण व्यक्ति बुध्दीच्या जोरावर संपूर्ण जग जिंकू शकतो, त्यासाठी गरज आहे प्रेम आणि स्नेहाची, इतरांना आदराचा वागणुक देण्याची, हे सर्व गुण श्रीकृष्ण राऊतांमध्ये भरलेले आहेत. याचा प्रत्यय त्यांच्या सभोवती असणार्‍या समुदायावरून आपल्या लक्षात येईल.

२१ व्या शतकातले पहिले दशक संपत असतांना बांधण प्रतिष्ठानने 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करून जो सन्मान या कवीचा केला तो त्यांच्या कार्यावर चढविलेला कळसचं होय असं म्हणावं लागेल. परंतु यावरचं त्याचं कार्य संपत नाही तर नव्या उमेदीने ते आपल्या या कार्याची सुरूवात करू पाहत आहेत हे विशेष.

सन्मान आणि पुरस्कारांचा विचार करतांना लक्षात येतं की श्रीकृष्ण राऊतांना कितीतरी पुरस्कार त्यांच्या ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला’व 'गुलाल आणि गझला' या संग्रहाला मिळालेले आहेत. हे सर्व यश अत्यंत नम्रपणाने त्यांनी स्वीकारल्यामुळे व कवितेप्रती असलेल्या निष्ठेमुळेच आज त्यांनी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आहेत. 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या आयुष्याकडे पाहिल्यास आपल्याला येतो. कारण जिद्द,प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची तयारी, चिकाटी हे गुण घेऊनच श्रीकृष्ण राऊतांचा जन्म झालेला आहे. यामध्ये त्यांच्यासाठी संधी महत्वाची असते. आजुबाजूची परिस्थिती नाही.

श्रीकृष्ण राऊत हे एक प्रतिभावंत आहेत, शब्दप्रभु आहेत, त्यांच्या आयुष्याला एक कवितेची किनार आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांतून, काव्यातून गरूडासारखे गगन भरारीचे बळ प्राप्त होते. त्यांच्या प्रतिभेची झेप अंतराचा वेध घेणारी आहे. व्यक्तीला स्वीकारायचे तर त्याच्या चांगल्या वाईट गुणांसकट कारण माणसाला सांभाळतांना वाईटाची वजाबाकी व चांगल्याची बेरीज करून सांभाळता येत नाही, हे सत्य त्यांनी ओळखले म्हणुन आपल्या आवडत्या माणसांकडे आणि विषयांकडे पाहण्याचा त्यांचा असा दृष्टिकोन आहे.

कवितांप्रमाणेच श्रीकृष्ण राऊत यांचे वक्तृत्व देखील प्रभावी आहे. सतत हसरा आणि प्रसन्न चेहरा भाषणातील विविध विनोदांची छटा आणि जीवंतपणाचा भाव या सर्वांची छाप ते श्रोत्यांवर सोडून जातात व त्यांच्या वत्कृत्वाने निराशेने ग्रासलेल्या व्यक्तीच्या मनाला जगण्याचं आणि प्रेरणेचं बळ मिळतं. त्यामुळेच ते त्यांच्या गझलेत एका ठिकाणी म्हणतात -

''भेटली तू मला वादळासारखी

प्रेरणेने दिलेल्या बळा सारखी''

अशा या कवीला जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन आणि त्यांच्या विषयी खालील ओळी म्हणाव्याशा वाटतात.

जो तो तुमच्या प्रेमामध्ये पडतो,

तुम्ही रूप कृष्णाचे असावे वाटते;

त्या ईश्वराने पाहिले जेव्हा तुम्हाला

म्हणतो कसा ? माणूस व्हावे वाटते

_________________________________________________________

प्रा. राहुल गोवर्धन माहुरे

शांती नगर, जुने शहर,

अकोला. मो.९८२२२७८९२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: