Related Posts Plugin for WordPress, Blogger...

६ जानेवारी, २०११

श्रीकृष्ण राऊत हयांची गझल : डॉ.अविनाश सांगोलेकर

मराठीतील ज्येष्ठ गझलकार कै़.सुरेश भट जन्म : इ़.स़.१९३२ मृत्यू : इ़.स़.२००३ ह्यांच्यानंतरच्या पिढीतील एक महत्वाचे गझलकार श्रीकृष्ण राऊत जन्म : इ़.स़.१९५५ हे होत़ ते एम्‌. क़ॉम., एम्‌.फिल्‌. असून विदर्भातील अकोला येथील श्री़.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विषयाचे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत़.मराठी भाषा व साहित्य हया दोहोंच्या आवडीमधून त्यांनी एम्‌.ए़. (मराठी) केले असून ते नुकतेच पीएच्‌.ड़ी़ ही झाले आहेत़. राऊतांनी कविता, कथा, एकांकिका, समीक्षण आदी स्वरुपातील विपुल लेखन
केलेले असून ह्या लेखनाला ‘कविता-रती’ , ‘अनुष्टुभ्‌’ ,‘साधना’ , ‘अक्षर’, ‘हंस’ , ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘मौज’, ‘अस्मितादर्श’,‘प्रतिष्ठान’ , ‘युगवाणी’आदी प्रतिष्ठित नियतकालिकांमधून प्रसिद्धी मिळालेली आहे़. शिवाय चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी, घ्वनीफिती आदी प्रसार माध्यमांमधूनही प्रसिद्धी मिळालेली आहे़. विपुल आणि विविध लेखनाबद्दल राऊतांना आजपर्यंत अनेक मान-सन्मान प्राप्त झालेले आहेत़.
राऊत हे प्रामुख्याने कवी म्हणून, गीतकार म्हणून, विशेषतः गझलकार म्हणून मराठी रसिकांना सुपरिचित आहेत. ‘गुलाल’ (१९८९), ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म
घेणार्‍या तान्ह्या मुला’ (२००१), ‘गुलाल आणि इतर गझला’ (२००३), ‘चार ओळी तुझ्यासाठी’ (२००३), हे चार काव्यसंग्रह त्यांच्या नावावर जमा असून त्यातील पहिला व तिसरा काव्यसंग्रह संपूर्णपणे गझलांचा आहे़. ‘डुंडा ओळा पिपल साई’ हा त्यांचा कोरकू आदिवासांच्या जीवनानुभवाला अभिव्यक्ती देणारा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे़. अशा राऊतांची गझलकार म्हणून प्रथम ओळख महाराष्ट्राला झाली ती १९८१ मध्ये प्रदीप गुजर संपादित कविता ह्या गाजलेल्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहामधूऩ. ह्या संग्रहात राऊतांच्या चार गझला समाविष्ट आहेत़. ही ओळख अधिक ठसठशीत करण्याचे काम ‘काफला’ (१९९०), ‘गझलधारा’ (१९९४), ‘कारवा’ (२०००)व विदर्भाची मराठी गजल (२००४) ह्मा चार प्रातिनिधिक मराठी गझलसंग्रहांमधील त्यांच्या गझलांनी केले़. दरम्यानच्या मधल्या काळात एप्रिल १९८९ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखन अनुदान योजनेमधून श्रीरामपूर (जि.अहमदनगर) येथील शब्दालय प्रकाशनाने राऊतांचा ‘गुलाल’हा गझलसंग्रह प्रकाशित केला़. संग्रहामध्ये ५० गझला आहेत़. नंतर स्वतः राऊतांनी फेब्रुवारी २००३ मध्ये ‘गुलाल आणि इतर गझला’ हा आपला दुसरा गझलसंग्रह प्रकाशित केला़.ह्या संग्रहामध्ये आधीच्या ‘गुलाल’ ह्या संग्रहामधील ५० गझला तर आहेतच, शिवाय नव्या अशा १९ गझलाही आहेत़ तसेच संग्रहाच्या मलपृष्ठावर ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर जन्म घेणार्‍या तान्ह्मा मुला’ ह्या काव्यसंग्रहातील ‘भाई’ ह्या शीर्षकाची गझलही उद्धृत करण्यात आलेली आहे़. अशा प्रकारे नव्या-जुन्या अशा सर्व मिळून राऊतांच्या संग्रहबध्द गझलांची संख्या ७०
भरते़. श्रीकृष्ण राऊत ह्यांची गझल जाणून घ्यायची ती ह्या संग्रह्बद्ध ७० गझलांवरुनच़.
राऊतांची गझल ही गझलवृत्त व गझलवृत्ती ह्या दोहोंच्या बाबतीतले समाधान खूप देऊन जाणारी आहे़. ती पुष्कळशी निर्दोष आहे़. तिच्यात विपुलता व विविधता लक्षणीय आहे़. वृत्तयोजनेच्या बाबतीत तपशील द्यावयाचा झाला, तर ७० गझलांपैकी ६६ गझला ह्मा अक्षरगणवृत्तांमधील आहेत आणि उर्वरित ४ गझला ह्मा मात्रावृत्तांमधील आहेत़ आनंदकंद ह्मा लोकप्रिय अक्षरगणवृत्तामध्ये २९ गझला आहेत, वियद्गंगा व स्त्रग्विणी ह्मा अक्षरगणवृत्तांमध्ये प्रत्येकी ७-७ गझला आहेत, देवप्रिया ह्मा अक्षरगणवृत्तांमध्ये ४, भुजंगप्रयाता व देवराज अक्षरगणवृत्तांमध्ये प्रत्येकी ३-३, तर सुकामिनी ,ह्मा अक्षरगणवृत्तामध्ये २ गझला आहेत़
बाकीच्या ११ अक्षरगणवृत्तांमध्ये प्रत्येकी एकेक गझल आहे, ही सर्व वृत्तयोजना निर्दोष,
तंत्रशुध्द, सफाईदार, सहजोस्फुर्त जाणवते़ क्वचित काही ठिकाणी एका गुरु अक्षराऐवजी दोन लघु अक्षरे वापरण्याची सवलत घेतली आढळते़ तसेच अगदी तसेच अगदी थोड्या ठिकाणी वृत्तपूर्तीसाठी मधुर ,चतुर , झिंगुनी ,बुध्दीबळास , नाजूक असे अशुध्द शब्द वापरलेले आढळतात़सोमराजी ,आनंद , मनोहरा ही अत्यंत छोटी व दुर्मिळ अक्षरगणवृत्ते राऊतांनी सफाईदारपणे हाताळली आहेत़ नमुन्यादाखल सोमराजी ह्मा अक्षरगण-वृत्तामधील पुजारी (पृ़५३) ही गझल पाहण्याजोगी आहे़ ह्मा गझलेतील पहिल्या तीन द्विपदी अशा आहेत :
कशी वेळ आली
क्षमा क्रूर झाली !
हसे आज कुंकू
गमावून लाली़
करा बंद वर्षा;
पिके तर जळाली़
राऊतांची गझल ही आत्मचिंतनपर, सामाजिक व प्रेमविषयक अशा तीन प्रकारचा अशय मोठ्या प्रमाणात व्यक्त करणारी आहे़ ह्मा गझलेच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने मी आढळतो़ हा मी बर्‍याच प्रमाणात जगाकडून दुखावला गेलेला, तरीही रडत-कुढत न राहणारा, जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीशी सतत झुंज देत जगणारा आहे़७ नमुन्यादाखल नमुन्यादाखल काही द्विपदी पाहू :
१़माझी भकास शिल्पे शोधीत काल होर्ता;
तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता
(गुलाल ,पृ़१२)
२़हासतो जरी सुरात मी;
घाव झाकतो उरात मी़
(सोबती,पृ़१५)
३़आत्मकेंद्र फार झाले खानदानी आरसे;
त्यात नाही स्पष्ट आता दुःख झाले फारसे़
(तेरवी ,पृ़१९)
४ज़ीवना रे मला त्रास ह्याचाच की;
कोणताही तुझा त्रास नाही खरा ़़़़
(घास ,पृ़२३)
५़निखर्‍यातून दुःखाच्या सुखाने चालतो आता;
हवा ही बोलकी झाली हवेशी बोलतो आता़
(मदिरा ,पृ़२८)
६़तुला सांग दुःखा कसा मित्र मानू ?
हवे तेवढे तू न आघात केले़(हात ,पृ़२३)
७़हुंदक्याचे फूल काढी अंतरंगी स्वस्तिके;
आज दिंडी आसवांची येत आहे लोचना़
(दिंडी ,पृ़३९)
८़उभी जिन्दगानी पहाडाप्रमाणे;
तिला लोटतो मी कवाडाप्रमाणे़
(फूल ,पृ़७५)
म.सा.प.चा कवी यशवंत काव्य पुरस्कार कविवर्य हेमंत जोगळेकर यांचे कडून स्वीकारताना
सोबत गं.ना.जोगळेकर

राऊतांची गझल सामाजिक आशय व्यक्त करताना उपहास, उपरोध ह्या अस्त्रांचा
मार्मिक उपयोग करते़ ती नेमकेपणाने वर्मावर बोट ठेवते, नव्हे, घाव घालते़ त्यातून जे
सामाजिक वास्तव उघडे होते, ते मनाला क्लेशदायक असते़ गझलकाराने जणू आपल्या
मनातीलच बोलून दाखवली आहे, असे रसिकाला वाटत राहते ह्या सर्व दृष्टीने काही
प्रातिनिधिक ठरतील, अशा द्विपदी पुढीलप्रमाणे :
१़दिसते जरी तुम्हाला ही फार छान वस्ती;
सेंटेड माणसांची भलतीच घाण वस्ती़
(वस्ती ,पृ़२२)
२़टाळा हुशार पाणी बेटे सनातनी ते;
चवदार ह्या तळ्याला राखा असेच राखा़
(पहाट ,पृ़३४)
३़मांजरीने कुण्या शाप ह्यांना दिला?
एकमेकास हे बोखरु लागले ़
(वाढ ,पृ़३६)
४़हुंकार देत आहे काळोख भोवताली ;
सांभाळ रे दिव्या तू रंगीत रोषणाई !
(अनुवाद ,पृ़३८)
५ज़खमेस न्याय आता सांगा कसा मिळावा ?
सामील रक्त झाले निर्ढावल्या सुर्‍याला !
(सामील ,पृ़४०)
६ऩावा किती बुडाल्या त्याचा हिशेब नाही ;
पण दीपस्तंभ सारे सागर तरुन गेले़
(लकवा ,पृ़४६)
७फ़ाटून नष्ट झाला मागे कधीच झेंडा
हा उंच भीकमाग्या नुसताच हात आहे़
(झेंडा ,पृ़४९)
८़घाऊक आजचा हा बाजारभाव ताजा स्वस्तात
रक्त मिळते भाकर महाग आहे !
(डाग ,पृ़५०)
९ख़ुनी देव झाले ;
पुजारी मावाली ! (पुजारी ,पृ़५३)
१०ज़्यांना तहान त्यांना पाणी न पाजतो;
देवास घालतो पण आभषेक भामटा़
(भामटा ,पृ़७२)
११़मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी;
खिशाच्या आत घालुनी विठू नेतात मंबाजी़
(मंबाजी ,पृ़७४)
राऊतांची गझल प्रेमविषयक आशय व्यक्त करताना प्रेमभावनेच्या विविध छटा समर्थपणे व सौंदर्यपूर्ण वृत्तीने रसिकांसमोर आणते़ आषाढ ( पृ़१३), रासलीला ( पृ़३०),
निखारे ( पृ़४३) व बिंब ( पृ़५५) ह्या चार गझलांचा मात्र वेगळा विचार करावा लागेल़
कारण ह्या चारही गझलांचे स्वरुप गझलेच्या आकृतिबंधातील नाट्यगीत असे आहे़ गझल हा आत्मनिष्ठ काव्यप्रकार आहे़ त्याद्वारे स्वतःच्या भावभावना, चिंतन व्यक्त व्हावे, अशी अपेक्षा असते़ कवी जेव्हा परचित्तप्रवेश करुन दुसर्‍याच्या भावभावना, चिंतन व्यक्त करतो ; तेव्हा
त्यांच्या कवितेचे स्वरुप नाट्यगीत असे बनते़ राऊतांनी उपरोक्त चार तथाकथित
गझलांमधून परचित्तप्रवेश करुन प्रेयसीच्या भावभावना, चिंतन तिच्याच शब्दांमधून व्यक्त
केलेले आहे़ सुरेश भटांच्या रुपगंधा (१९६१) ह्या काव्यसंग्रहामध्ये रुपगंधा (पृ़१) ही एक गझल; रंग माझा वेगळा (प्१९७४) ह्या काव्यसंग्रहातील माझी उदास गीते (पृ़३२), तरुण आहे रात्र अनुनी (पृ़६१) ह्या दोन गझला, एल्गार (१९८३) ह्या काव्यसंग्रहातील एकटी (पृ़२२),
भल्या पहाटे निघून आले (पृ़२८) व सुन्या मैफलीत (पृ़८२) ह्या तीन गझला ह्याच कारणाने खर्‍या अर्थाने गझला न ठरता गझलेल्या आकृतिबंधातील नाट्यागीते ठरतात़ मात्र एक कविता म्हणून, नाट्यगीत म्हणून भटांच्या व राऊतांच्याही ह्या तथाकथित गझला उत्कृष्ट आहेत, ह्यात दुमत असण्याचे काही कारण नाही़ राऊतांच्या सावळी (पृ़८०) ह्या प्रेमविषयक गझलेबद्दल
एक तव्रᆬार अशी की, ह्या गझलेतील बर्‍याचशा द्विपदी ह्या नेहमीच्या भावकवितेप्रमाणे -
भावगीताप्रमाणे सरळ, सपाट व उलगडत जाणार्‍या अशा आहेत़ अन्य प्रेमविषयक गझला व
प्रेमविषयक द्विपदी मात्र गझलवृत्त व गझलवृत्ती ह्या दोहोंना पूर्ण न्याय देणार्‍या आहेत़ काही प्रभावी द्विपदी अशाः
१़पुसून लोचने तिथे तुक्या निरोप घेतला;
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली़
(वरात ,पृ़२५)
२ग़ोर्‍या तुक्या रुपाने भलती कमाल केली;
बघण्यास आरशााला दृष्टी बहाल केली़
(रक्त ,पृ़३२)
३़पापण्यांनी खोल केले वार तू;
सात माझे जन्म केले ठार तू़
(सत्कार ,पृ़३७)
४़लाजली पौर्णिमा, लोपला चंद्रमा, चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला;
सांगतो मी खरे, फार झाले बरे, फक्त तुक्या चेहरा पाहिला़
(चेहरा ,पृ़४७)
५़वळणावून तूही जाशील दूर राणी;
होईल पूᆬल माझे निर्माल्य त्या ठिकाणी़
(राख ,पृ़५१)
६़वुंᆬतलात गुंतता अखेर हीच जाण ये-
कापणार ना गळ्यास तोच केस चांगला़
(जाण ,पृ़७०)
७़तुझा हात साधा न हातात माक्या;
मला भेटली तू घबाडाप्रमाणे़
(फूल ,पृ़७५)
८़माझियाऐवजी ओठ ज्या चुंबिती;
त्या बटांना गडे दूर सारु नको़
(डाव ,पृ़७७)
९़आज काळास हे काय झाले असे;
संपली रात्र माझी पळासारखी़
(पारदर्शी ,पृ़७८)
१०़लाव छातीस तू कान देवा जरा;
ऐक माक्या उरी सावळी सावळी़
(सावळी,पृ़८०)
श्रीकृष्ण राऊतांची गझल प्रभावी पध्दतीने जीवनभाष्य करणारी़ ती जगण्याची उमेद वाढवणारी आहे़ तिच्यामध्ये परिणामकारक उपदेशात्मकता आहे़ ह्या सर्व संदर्भातील नमुने
म्हणता येतील, अशा काही द्विपदी
पुढीलप्रमाणे :
१़चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा;
चालेल जीव गेला, शाबूत नाक ठेवा़
(काटे ,पृ़१७)
२़माणूस तू कसा रे खातोस शेण वेड्या;
इतका नको पडू तू सांभाळ तोल काही़
(तोल,पृ़२४)
३ऩव्या या उंबर्‍यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे;
कुणी हे लावले आहे इथे रॉकेल मापाला?
(कोळसा ,पृ़२६)
४़पोथीत पेरती हे संदेश लाचखाऊ;
आत्म्यास राहण्याचे हे मागतात भाडे़
(प्रचिती ,पृ़२७)
५क़ाढा उपाय काही शोधून यार आधी;
किंवा खुशाल तोडा हे बंद दार आधी़
(प्रसंग ,पृ़३१)
६ज़मलेच तर तुला तू घ्यावा वसा सतीचा;
पोथी तशी कुणीही घेते छिनाल हाती़
(वषा ,पृ़४८)
७़सरावा जन्म हा सारा अशा कैफात स्वानंदी;
निरागस लेकरु तान्हे जसे झोपेत हासावे़
(कायदा ,पृ़५८)
८़सोबतीच जरी सर्व झाले पशू;
तू तरी वाग ना माणसासाखा!़
(सर्व ,पृ़६२)
९़वेडेपण हे करु नको;
विस्तव हाती धरु नको़ (पर्याय ,पृ़६८)
१०़ऐकवू नकोस तू तुझी नवी नवी गझल;
भोवताल मंडळी इथे महान चोरटी़
(भोवताल ,पृ़७१)
११़तुकारामा, अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा;
मुखोटा लावुनी फिरती तुक्या वेषात मंबाजी ़
(मंबाजी ,पृ़७४)
१२़लाख होउ दे सभोवताली उजाड बागबगीचे;
गाव फुलांचे मनात हसर्‍या अमुच्या वसते भाई ़
(भाई ,पृ़मलपृष्ठ)
श्रीकृष्ण राऊतांच्या गझलेत बोलीभाषेतील सहजता, प्रासदिकता, संवादात्मकता, गोडवा हे गुण ओतप्रोत आहेत़ मात्र काही अल्प स्थळे अशी आहेत की, ज्या ठिकाणी अपरिचित शब्दांमुळे अर्थहानी होण्याचा धोका संभवतो़ प्रचिती (पृ़२७) ह्या गझलेतील नवाडे हा शब्द, देव (पृ़४५) ह्या गझलेतील भुजून हा शब्द, जाण (पृ़७०) ह्या गझलेतील घापला हा शब्द व शुभेच्छा (पृ़७९) ह्या गझलेतील नवाई हा शब्द ही ती अल्पस्थळे होत़
राऊतांनी आपल्या गझलांना शीर्षके देताना शेवटच्या द्विपदीतील एखादा शब्द निवडून तो शीर्षक म्हणून योजलेला आहे़ (अपवाद : पारदर्शी ही गझल़) ही शीर्षके आटोपशीर आहेत़ मात्र ती समर्पक वाटत नाहीत़ अर्थात्‌ हा दोष राऊतांचा कमी व गझल ह्या
काव्यप्रकाराचा आधक, असे म्हणावे लागते़ कारण नेममीच्या कवितेत पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत जो आशय आलेला असतो, तो एकाच विषयाला धरुन आलेला असतो़ त्यामुळे अशा ठिकाणी समर्पक शीर्षक निश्चित करता येते़ गझलेत मात्र एकच एक विषय सर्व
द्विपदींमधून हाताळलेला असतोच, असे नाही़ म्हणून गझलेला शीर्षक देण्याच्या फंदातच पडू
नये, असा एक मतप्रवाह आहे़ मात्र शीर्षकामुळे काही एक सोय होत असते, हे नाकारता येत नाही़
थोडक्यात, श्रीकृष्ण राऊत ह्यांची गझल ही तंत्रशुध्द आणि अस्सल मराठमोळ्या मराठी गझलेचा जिताजागता नमुना आहे़ विदर्भाने मराठी गझलसृष्टीला अमृतराय, उऱा़गिरी, सुरेश भट ह्यांच्यासारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ गझलकार दिले; डॉ़ राम पंडितांसारखे तळमळीचे गझल अभ्यासक दिले़ श्रीकृष्ण राऊत हे ह्याच विदर्भातील आहेत आणि ते विदर्भाची ही उज्वल परंपरा पुढे नेतील, इतकेच नव्हे तर ही परंपरा अजून आधक उज्वल करतील़ असा भरंवसा त्यांच्या गझलेतून मिळत राहतो़ त्यांच्या गझलेचे स्वागत सुरेश भट, वि़वा़शिरवाडकर, पु़ल़देशपांडे, ना़घ़देशपांडे, मंगेश पाडगावकर अशा अनेक दर्दी ज्येष्ठांनी केलेले आहे़ समस्त गझलप्रेमींनी तर केलेले आहेच़ नुकतीच वयाची पन्नाशाी पूर्ण केलेल्या राऊतांची भावी गझल त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे दिवसेंदिवस आधकधिक परिपक्व, प्रगल्भ होत जाईल, असा विश्वास त्यांच्या विद्यमान गझलेमधून मिळत राहतो, ह्यातच सर्व काही आले !
संदर्भ आणि टीपा :
१़ गुजर प्रदीप मुरलीधर (संपा़), कविता (प्रतिनिधिक काव्यसंग्रह), प्रकाशाक स्वतः संपादक, ठाणे, प्रथमावृत्ती : मार्च १९८१, पृ ६ व
२़ भट सुरेश व कांबळे (सांगोलेकर) आवनाश (संपा) काफला (प्रातिनिधिक मराठी गझलसंग्रह), कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे़ प्रथमावृत्ती : ऑगस्ट १९९०, पृ़१०१ व १०२़
३़ कांबळे (सांगोलेकर) आवनाश (संपा़) गझलधारा (प्रतिनिधिक मराठी गझलसंग्रह),
कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे़ प्रथमावृत्ती :१९९४, पृ़७८
४़ पांचाळे भीमराव व इतर (संपा़) कारवा (प्रतिनिधिक मराठी गझलसंग्रह),गजलसाग्ार प्रतिष्ठान, मुंबई, प्रथमावृत्ती : २ डिसेंबर २०००, पृ़१३३़
५़ पंडित राम व पांचाळे भीमराव (संपा़) विदर्भाची मराठीगझल (प्रतिनिधिक मराठी
गझलसंग्रह),गजलसागर प्रतिष्ठान, मुंबई, प्रथमावृत्ती : ७ फेब्रुवारी २००४, पृ़१३० व १३१़
६़प्रस्तुत शोधनिबंधात राऊतांच्या गझलांचे पृष्ठांक नमूद करणार आहे ते गुलाल आणि इतर गझला (पेᆬब्रुवारी २००३) ह्या संग्रहामधील़
७़ गझलकार श्रीकृष्ण राऊत हे स्वतः शारीरिकदृष्ट्या काहीसे अपंग आहेत़ शिवाय गुलाल व गुलाल आणि इतर गझला ह्या दोन्ही गझलसंग्रहांना त्यांनी जी अर्पणपत्रिका जोडलेली आहे़ तीत त्यांनी जीवनाशी सतत झुंज देत जगणार्‍या जगातल्या तमाम अपंगांच्या जिद्दीला , अशा शब्दांमध्ये आपली भावना व्यक्त केलेली आहे़
८़ पुणे येथे ३० ऑगस्ट१९८७ रोजी मी स्वतः भटांना समक्ष भेटलो असता त्यांना मी एकटी , भल्या पहाटे निघून आले व सुन्या सुन्या मैफलीत ह्या तुमच्या गझला खर्‍या अर्थाने गझला
नाहीत, तर गझलेच्या आकृतिबंधातील नाट्यगीते होत, असे म्हटले असता ते त्यांनी मान्य
केले होते़
_______________________________________________________
डॉ़.अविनाश सांगोलेकर
प्रपाठक व मराठी विभागप्रमुख
पुणे विद्यापीठ, पुणे़
भ्रमणध्वनी : ९८५०६१३६०२

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP