६ जानेवारी, २०११

पत्र १ : ना.घ.देशपांडे

श्रीयुत प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचा ‘गुलाल’ हा पन्नास गझलांचा संग्रह मी नुकताच वाचला. पुन्हा वाचला. आकर्षक वाटला. संग्रह चांगल्या दर्जाचा आहे. श्रीयुत प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.
गझल हा काव्यप्रकार मूळचा अरबस्थान व पर्शियामधला. कालांतराने तो भारतात आला. मोरोपंत व अमृतराय यांच्या रचनांत गझल क्वचितच येतात. ‘रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी’ व ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ हे गझल मी लहानपणी ऐकले होते. रविकिरण मंडळ व त्यांच्यापैकी माधव ज्यूलियन यांनी मराठीत गझल बरेच रचले. त्यानंतर आता श्रीयुत सुरेश भट यांनी मराठीत गझल ब-याच प्रमाणात केले. आता हा श्रीयुत राऊत यांचा गझलांचा संग्रह मराठीत आला.
या कवीची मनोभूमिका शोकात्मक आहे. जगाने या कवीवर अन्याय केला आहे अशी त्याची तक्रार आहे. या भावनेने हा संग्रह भरलेला आहे. `Our sweetest songs are those that tell of saddest thought'या शेलेच्या वचनाची आठवण हा संग्रह वाचताना येते. कवी म्हणतो-

‘तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता’

‘हासतो जरी सुरात मी
घाव झाकतो उरात मी’

‘फसव्या कटात त्यांनी केली शिकार माझी
सोलून कातडीचे केलेत ढोल-ताशे’

आणखी अनेक उदाहरणे आहेत पण इतकेच पुरे व्हावेत. या संग्रहात अनेक ठिकाणी विरोधी विधाने परस्परांना जोडली आहेत त्याने आकर्षण फार वाढते. कवी म्हणतो-

‘जिंकून हारलो मी सारेच डाव तेथे’

‘ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्
मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता’

‘सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता’

‘सेंटेड माणसांची भलतीच घाण वस्ती’

‘क्षमा क्रूर झाली’

आणखीही अनेक उदाहरणे या संग्रहात सापडतील. गझलात लघुगुरुक्रम असतो. उर्दूप्रमाणे मराठीत दोन लघूचा दीर्घासारखा उपयोग या संग्रहात काही ठिकाणी केलेला दिसतो,
उदाहरणार्थ-

‘हा बहर यौवनाचा’

‘प्राणापल्याड जपते निवडुंग’

मराठीच्या पारंपरिक उच्चारांवर याचा परिणाम होईल की काय अशी शंका येते. काय ते काळच ठरवतील. गती तेथे क्रांती असते असे वाटते.

या कवीच्या शोक विव्हळ मनाच्या उद्गारांबरोबर स्त्रीप्रेमाचे सुंदर स्वरहि ऐकू येतात. ते मधुरहि आहेत-

‘सांगू कशी फुलाचा’

‘तुझ्या गुलाबी ओठांवरती’

‘तसा न चंद्र राहिला’

‘लाजून चांदण्यांनी’

‘लाजली पौर्णिमा’

या कविता या दृष्टीने वाचनीय वाटतात.
या कवीने या संग्रहातील गझलात अनेक गझलवृत्ते वापरली आहेत. त्यावरून या कवीचा गझलांचा व्यासंग दिसून येतो. एकंदराने हा गझल संग्रह चांगल्यापैकी वाटतो. वाचनीय आहे. या कवीविषयी बरीच उमेद वाटते. पुन्हा कवी श्रीयुत श्रीकृष्ण राऊत यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.

- ना.घ.देशपांडे
२१-९-८९ ई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: