६ जानेवारी, २०११

श्रीकृष्ण राऊत आणि तुकारामा : डॉ.किशोर सानप

श्रीकृष्ण राऊत यांनी मराठी कवितेत देशीय जीवन-जाणिवांच्या अंगाने काही प्रयोग केले आहेत. श्रीकृष्ण राऊत गेल्या चाळीस वर्षांपासून तरी कविता लेखन करीत आहेत. कवितेच्या अभिव्यक्तीचे निरनिराळे छंद, वृत्ते त्यांनी हाताळली. मुक्तछंदातही प्रयोगशीलता दाखविली. महाराष्ट्रात मराठी कवितेच्या छंदवृत्तादी अंगांचा आणि काव्यनिर्मितीच्या अंगांचा खोलवर अभ्यास असणारे जे मोजके कवी आहेत, त्यात श्रीकृष्ण राऊतांचा समावेश करावा लागतो. कवितेची मांडणी आणि कवितेची निर्मिती ह्यांचा जाणीवपूर्वक विचार करणारा हा कवी सलगपणे काव्यनिर्मिती करुनही मराठी काव्यक्षितिजावर ठळकपणे उमटला नाही. कारण कोणत्याही एका विशिष्ट साच्यात या कवीने आपली कविता ओतली नाही. आशय, मांडणी आणि विचारसरणीच्या कोणत्याही गटाचे सदस्यत्व धारण केले नाही. विविध छंदांचे प्रयोग करुन, आजच्या काळाला जिवंत करण्याचा ह्या कवीचा ध्यास, कवितेविषयी सजग नसलेल्या मराठी बाण्याने, कधी लक्षात घेण्याचा प्रयत्नच केला नाही.

सतत प्रयोगशील असणारी ह्या कविता मराठीतल्या दिग्गज असलेल्या मौज, अक्षर, साधना, अनुष्टुभ्‌, कविता-रती, हंस सारख्या जवळपास सर्वच मुख्य नियतकालिकांतून गेल्या चाळीस वर्षांत प्रकाशित झालेली आहे. कोणत्याही पध्दतीने स्थिरत्व न पावलेला हा कवी ताकदीचा असूनही दुर्लक्षित राहिला. गुलाल (1989) हा गझलांचा पहिला कवितासंग्रह शब्दालयने प्रकाशित केला. पुढे त्यातच नव्या गझलांचा समावेश करुन गुलाल आणि इतर गझला (2003) हा गझलांचा दुसरा संग्रह खुद्द कवीनेच प्रकाशित केला. सुरेश भट हे गझलसम्राट ठरवून टाकल्यावर, श्रीकृष्ण राऊतांनी कितीही श्रेष्ट आणि आशय-मांडणीच्या पातळीवर आपले स्वयंभू वैशिष्ट्ये सिध्द करणारी गझल लिहिली तरी, त्यांचा विचार करण्याची कधी कुणाला गरज वाटली नाही. मराठीत एखाद्या प्रकारात नाव सिध्द झाले की त्याच प्रकारात कुणालाही लेखन करण्याचा जणू अधिकारच नसतो. गझलांच्या निर्मितीनंतर ह्या कवीने कोरकू आदिवासींच्या पाड्यांवर राहून, वेगवेगळ्या पारंपारिक छंदवृत्तांचा प्रयोग करीत आदिवासी कोरकूंच्या जीवनाला साकार करणार्‍या कविता लिहिल्या. त्यात कवितांचा डुंडा ओळा पिपल साई हा संग्रह येऊ घातला आहे.

प्रकाशकांच्या निराशाजनक व्यवहारवादाला कंटाळून अखेर या कवीने स्वत:च्या खिशाला खार लावून स्वत:च एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तात्ह्या मुला (2001) हा छत्तीस कवितांचा संग्रह ऐन एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर प्रकाशित केला. आशय आणि अभिव्यक्तीच्या नव्या बळणाने जाणारी ही कविता, क्लेशदायक विसाव्या शतकाच्या पाश्वर्भूमीला सामोरी जाऊन, एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर नवे दु:ख गाणे गातांना दिसते. मराठी कवितेच्या हरवलेपणाच्या संदर्भात पुन्हा कविता सापडल्याची आशा निर्माण व्हावी, अशी ह्या कवीची निर्मिती आहे. विसाव्या शतकातील एका कवीचे मनोगत म्हणूनही ह्या कविता संग्रहातील कवितांना विशेषत्व लाभते. ह्या कवीने मधल्या काळात चार ओळी तुझ्यासाठी (2003) या संग्रहात मुक्तकेही लिहीली. त्यातही अनेक प्रयोग केले. देशीय काव्यपरंपरेच्या संदर्भात काव्य निर्मितीकडे गंभीरपणे पाहणारा हा कवी आहे.

तुकोबादशहा ही कविता एकविसाव्या शकतकाच्या उंबरठ्यावर माझ्या तान्ह्या मुला ... या कविता संग्रहात आहे. प्रस्तुत लेखकाच्या समग्र तुकाराम दर्शन या महाग्रंथात हीच कविता अवतरण म्हणून शीर्षस्थानी आहे. समग्र तुकाराम दर्शन या ग्रंथाची मांडणी एका दृष्टिक्षेपात लक्षात आणून देणारी ही कविता आहे. तुकोबा परंपरेत काव्यनिर्मिती करण्याचा मूलभूत प्रेरणा - स्त्रोत म्हणून ह्या कवितेकडे पाहता येते. खरेतर तुकोबादशहा ही ला ेकउपाधी आहे. दसर्‍याला देवीची पालखी उचलताना खेड्यापाड्यातले लोक आजही सदानंदीचा उदो sss बोल तुकोबादशा sss की जय sss असा लोकगजर करतात. देवीला सदानंदी म्हणणारे आणि तुकारामाला जगाचा बादशा म्हणणारे हे लोकमानस खरेतर आपल्या मराठी भाषा आणि संस्कृतीचे उर्ज्वस्वल असे सांस्कृतिक संचित आहे. कवीने पहिल्यांदाच मराठी कवितेत तुकोबादशाचे लोकमानस व्यक्त केले आहे.

मंबाजी,

तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच

तुमच्या वाकड्या सहाणेने लावली शब्दांना अभंग धार

नि बीणेला दिला तुमच्या तेढ्या खुटीने आधार

तुमच्या दगडी भिंतीशिवाय एवढा उसळलाच नसता

त्रिगुणांचा चेंडू.

तुकोबांच्या वाट्याला आयुष्यभर मंबाजींसारख्या - विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी - छळ आणि दु:खाचा भोगवटा आला. कविता हा शुध्द आणि निखळ वाड्‌मय प्रकार असून कवितेच्या निर्मितीचे लक्षण हे दु:खमूळ असल्याचा आजवरचा इतिहास आहे. वाल्मिकी पासून तर तुकोबांपर्यंतच्या काव्यनिर्मितीची साक्ष देता येते. कवी तुकोबांच्या दु:खमुळांशी काव्यकुलाशी भिडला आहे. तुकोबांकडे पाहण्याची कवीची दृष्टी -

तुमच्या विज्ञानाने तर कमालच केली मंबाजी,

पूर्वी त्यानं भिंतीला मोटार काय लावलीन्‌

रेड्यामुखी स्पकर काय बसवला

अन्‌ आता बनवलं खास विमान

तुक्याचा देह उडविण्यासाठी ...

अशी विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ आहे. ज्ञानदेवे रचिला पाया I तुका झालासे कळस II ह्या परंपरेवरील उपरोक्त भाष्य त्याची साक्ष आहे. तुकोबा हे संतकवी आणि महाकवी होते, म्हणून जगाच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले. तुकोबांची महती पटो की न पटो, आता सर्व जगाला एकमुखाने बोsल तुकोsबाद्‌शाssकीsजय ssअसे म्हणणे भाग पडण्याची आजची परिस्थिती आहे. अणूरेणूया थोकडा I तुका आकाशाएवढा II याची प्रचिता आता जगाला आलेली आहे.

कवितेतील देशीयतेचे जिवंत उदाहरण म्हणून तुकोबांचा दाखला देता येतो. तुकोबांच्या देशीय काव्य परंपरेशी भिडण्याचा आजवर अनेक मराठी आणि मराठीभाषेतर कवींनी प्रयत्न केला. मधुकर केचे, दिलीप चित्रे आणि श्रीकृष्ण राऊत अशी मराठी भाषेतील कवींची उदाहरणे देता येतील. श्रीकृष्ण राऊतांची कविता म्हणजे तुकोबांच्या काव्यभिव्यक्तीचे आधुनिक काळातील पुनरुज्जीवन होय. तुकोबांची कविता समाजाच्या लौकिकालौकिक उध्दाराच्या थोर कळवळ्यातून निर्माण झाल्याचा इतिहास आहे. संतत्व आणि कवित्व यांचे अद्वैत म्हणजे तुकोबा.

न ये नेत्रा जळ I नाही अंतरी कळवळ II तो हे चावटीचे बोल I तुका म्हणे जन रंजवण फोल II तुकोबांनी जनरंजवणाची साहित्य परंपरा सतराव्या शतकातच नाकारली होती. जनरंजवणासाठी शब्दांची जोडजाड करणारे लेखक - कवी - कीर्तनकरी हे सालोमालो असतात. सालोमालोने केला अवघा नास I अवघे बचमंगळ केले II साहित्य, संस्कृती आणि भाषेचा व्यापार करणार्‍यांवर तुकोबांनी शब्दास्त्र डागले. अशा शब्दज्ञान्यांसाठी - सालोमालोंसाठी तुकोबांनी आचारसंहिताही सांगितली होती. आपुल्या पोटासाठी I करी लोकांचिया गोष्टी II तुका म्हणे सिंदळीच्या I व्यर्थ श्रमविली वाचा II स्वये आपणचि रिता I रडे पुढिलांच्या हिता II अंगी ज्ञानपणाची मस्ती I बोलणे तितुके वाया गेले II तुका म्हणे गाढव लेखा I जेथे भेटेल तेथे ठोका II दंभ आणि अहंकाराचे स्वत: निरसन करुनच तुकोबा समाजाशी संवाद साधत होते. बरा कुणबी केलो I नाही तरि दंभेचि असतो मेलो II भले केले देवराया I नाचे तुका लागे पाया II तुका म्हणे थोरपणे I नरक होती अभिमाने II


कवयित्री संजीवनी खोजे स्मृती काव्य पुरस्कार ख्यातनाम साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या कडून स्वीकारताना

सोबत कविवर्य फ.मु.शिंदे,रामदास फुटाणे,


तुकोबांची कवितेकडे पाहण्याची दृष्टी अनुभवाधिष्ठित होती. अनुभवाशिवाय आणि कळवळ्याशिवाय केलेली शब्दनिर्मिती त्यांच्य् ाा लेखी चावटीचे बोल होते. नका दंतकथा येथे सांगो कोणी I कोरडे ते मानी बोल कोण II अनुभव येथे व्हावा शिष्टाचार I न चलती चार आम्हांपुढे II निवडी वेगळे क्षीर आणि पाणी I राजहंस दोन्ही वेगळाली II तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे I येरागबाळाचे काम नोहे II अनुभव हा काव्यनिर्मितीचा शिष्टाचार होता. कविता लिहिणे जातिवंत कवीचे लक्षण तुकोबांनी मानले होते. सत्यासाठी तुकोबांची शब्दविवंचना होती. उजळावया आलो वाटा II खराखोटा निवाडा II पुढे व्हावयासी बरे I देतो तिक्ष्ण उत्तरे II ह्या बाण्याने तुकोबा, रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग II अंतबाह्य जग आणि मन II काव्यनिर्मिती करीत होते.

समाजाच्या कळवळ्याचे अनुभवामृत असलेल्या शब्दकळेचा स्वीकार करुनच, मराठीत श्रीकृष्ण राऊतांची कविता तुकोबांच्या अभंगशैलीचे अनुसरण करुन, तुकोबादशहा संग्रहातून प्रकटली आहे. गुलाल आणि इतर गझला या कवितसंग्रहातही गझल छंदात याच तोडीच्या औषधी आणि मंबाजी ह्या दोन गझला आहेत. औषधी या कवितेत कवी म्हणतो,

जसा तो बोलतो आहे तसा तो चालला नाही ;

तुकारामास नव्हता रे कुणीही पाठचा भाऊ....

तुकारामाचा एक अभंग आहे. बोले तैसा चाले I त्याची वंदावी पाऊले II अंगे झाडीन अंगण I त्याचे दास्यत्व करीन II त्याचा होईन किंकर II उभा ठाकेन जोडूनि कर II तुका म्हणे देव I त्याचे चरणी माझा भाव II एवढ्या उमाळ्याचा बोले तैसा चाले असा माणूस जगात एकटा तुकारामच होता काय ? असा प्रश्न कवीने उपस्थित केला आहे. तुकारामास नव्हता रे कुणीही पाठचा भाऊ. ही मानवी जीवनाची किती मोठी शोकांतिका म्हणावी ? जगाच्या आणि जीवनाच्या सर्व वाटाच जणू टाकाऊ निघाल्याची कवीची खंत कुणालाही अंतर्मुख करणारी आहे. जखमांना कवटाळून दुसर्‍यांच्या जखमांवर उपचार करणारे औषधी माणसं या या जगात विरळात आहेत. लांबून काडीने औषधी लावणार्‍यांची जनसंख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

मंबाजी ही जगातल्या सबंध दुष्टत्वाची प्रतिमा म्हणून कवीने विविध कवितांमध्ये वापरली आहे. तुकोबादशहा या कवितेतील मंबाजी आणि मंबाजी या कवितेतील मंबाजी साक्षात तुकारामाला छळणारा आणि बहिणाबाई सिऊरकरांनी आणि रामेश्वर भटांनी ज्याचे वर्णन, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांनी, या शब्दात केले तोच हा मंबाजी आहे. सतराव्या शतकात मंबाजी जन्मला परंतु त्याचा जन्म खरेतर जगाच्या उत्पत्तीपासूनच झालेला आहे. सज्जनांना छळणारा हा दुष्ट दानव मंबाजी ही एक सर्वसमावेशक दुष्टत्वाचा निर्देश करणारी मंबाजी - प्रवृत्ती आहे. मंबाजीच्या कपट कारस्थानांमुळे या दुष्ट प्रवृत्तीला मंबाजीनं आपलं नाव दिलं आणि जगानंही ते मान्य केलं. दुष्टाचा दाखला देताना मंबाजीची प्रतिमा सर्व स्तरात आता वापरली जाते. खरेतर मंबाजी ही गझल कवितेचा व्यापार करणार्‍यांच्या - तुका म्हणे तोचि वेडा I त्याचे हाणूनि थोबाड फोडा II या रुपात आली आहे.

मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी ;

खिशाच्या आत घालुनि विठू नेतात मंबाजी ...

मठाबाजी ही सुध्दा मंबाजी - प्रवृत्तीच. मग तो मठ गझलकारांचा असो. कवींचा अड्डा असो की लेखकांची शाळा चालवणार्‍या लेखकरावांचा असो. अहो ज्ञानेश्वरा टाका जुन्या ओव्या दुरुस्तीला; फुकाचा मारुनी रंधा इथे देतात मंबाजी ... सांकृतिक क्षेत्रात ही गुन्हेगारीच असते. हे लोक समाजाचं शुध्द पर्यावरणच नासवून टाकतात. मग मात्र;

मला भंडावती येथे, तुलाही गांजती तेथे;

पसरले दूरवर माझ्या - तुझ्या देशात मंबाजी ...

जगाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत हेच मंबाजी व्हायरस पसरवून विषाणूंची पेरणी करतात. मग अशा देशात - जगात, शुध्द बिजापोटी फळे विजापोटी फळे रसाळ गोमटी कशी निर्माण होणारा? जगाच्या जगाच्या कोण्त्याच क्षेत्रात आता काहीच शुध्द आणि निर्मळ राहिलेलं नाही काय? कवीच्याही शब्दांना मग शब्दास्त्राचे रुप प्राप्त होते. शब्दांना देव मानणारा कवी मग तुकोबांच्याच आवेशात शब्दास्त्र सोडतो,

तुकारामा, अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा;

मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी ...

मंबाजी हा दुष्ट दानव होता. तो सरळ दुष्टच वागला. विंचवाची नांगीच होता तो. आतबाहेर तो आयुष्यभर दुष्टच राहिला. आपलं दुष्टत्व त्यानं कधी ढळू दिलं नाही. दुष्टत्वानं का होईना तो अजरामर झाला. परंतु कवीच्या मते, मंबाजी एकदा परवडला. कारण तो समोरुन वार करणारा होता. दुष्टपणा हाच त्याच्या जगण्याचा धर्म होता. विंचू आणि सापाचा धर्म पाळणारा होता. परंतु तुकारामाच्या मुखोट्यात वावरणारे मंबाजी किती घातक? तुकारामाच्या पैजारा हाणण्यासाठी तर त्यांची ओळख पटायला हवी की नाही? तुकारामाजवळ तर दुष्टत्वाचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या मंबाजीच्या जखमांवरही औषधोपचार करण्याची वृत्ती होती. शेवटी तुकोबा संतवृत्तीचे. पाखंड खंडण करणार परंतू त्यांनाही सुधरण्याचा अवसर देणार. परंतु समाजातल्या सर्वच लोकांत ही वृत्ती असणे कसे शक्य आहे? म्हणूनच तुकोबांनी समाजाला पाखंड करणार्‍यांचे खंडण करण्याचा उपचार सांगितला होता. कारण त्यांचे पाप नाही ताडणाचे ! कवीही तेच म्हणतो आहे. समाजाला पाखंडही ओळखणे दुर्लभ झाले आहे. सुष्टाच्या मुखोट्यात दुष्टाचा चेहरा लपलेला असला तर तो मुखवटा जोवर फाडला जात नाही तोवर आपण काय करावे? कवीने यावरही उपाय शोधला आहे. तो साक्षात

तुकोबांशीच संवाद साधून, तुकारामा; अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा! असेच म्हणतो. तुकारामाला पाखंडांची ओळख पटली होती. मुखवट्यांच्या आतले चेहरे कळत होते. हाती बाण हरिनामाचे आणि वीर गर्जती विठ्ठलाचे. शेवटी, सत्यासाठी माझी शब्दविवंचना I न भे मी विठ्ठला कळीकाळीशी ... तुकोबा पराकोटीचे मऊ आणि तितकेच वज्रही होते. सर्वांना जर मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास I कठीण वज्रास भेदू ऐसे II ही तुकोबावृत्ती वारशात मिळाली तर जगात रामराज्यच येईल ...

गुलाल आणि इतर गझला या कविता संग्रहात समाविष्ट नसलेली परंतु कविता - रतीच्या दिवाळी अंक 2009 मध्ये प्रकाशित झालेली एक स्फुट गझल, मराठीतील तुकाराम - कवितेला श्रीमंत करणारी आहे.

तुकारामा


पुजार्‍यांच्या दिली हाती कुणी लाठी तुकारामा

विठोबाला हवी तुमची अता काठी तुकारामा


स्फुरे का शब्दकोशांना कधी वाणी अभंगाची

शिदोरी भोगण्याची ती हवी गाठी तुकारामा


किनारी चंद्गभागेच्या विकत घ्या प्लॉट मोक्याचे

तुम्हाला सांगतो तुमच्या भल्यासाठी तुकारामा


अहो काही खरे नाही मनी आनंद - डोहाचे

समाधानी कपाळावर दिसे आठी तुकारामा


कळाया चाल हेकोडी जगाशी द्या भिडू त्यांना

मुलांना घालता पाठी कशासाठी तुकारामा


नकोसे होत जाणारे मरु लागे हळू नाते

फुलांचे होउनी ओझे रुते पाठी तुकारामा


जिवांच्या लागले मागे तगादे सावकारांचे

किती मी सावडू हाडे नदी काठी तुकारामा


- श्रीकृष्ण राऊत (कविता - रती, दिवाळी अंक, धुळे 2009 )

पुजार्‍यांच्या दिली हाती कुणी लाठी तुकारामा, विठोबाला हवी तुमची अता काठी तुकारामा. तुकारामाला आवाहन करणे हा कवीचा छंद नाही. तुकारामाशी आत्मसंवाद करणे हा कवीच्या आनंदाचा डोह आहे. तुका म्हणे होय मनासी संवाद. आपुलाचि वाद आपणाशी. या अनुभूतीचाच हा पुनर्प्रत्यय आहे. तुकारामानं जीवनातल्या सर्वच जटील गुंतागुतीच्या प्रश्नांची सोडवण ूक केली आणि आपले अनुभव अभंगांतून लोकप्रबोधनासाठी मांडले. दृष्टांतांच्या मते बोलिलो बहुत कळावया. पुढे व्हावयासाठी बरे देतो तिक्ष्ण उत्तरे. हाती बाण हरिनामाचे वीर गर्जती विठ्ठलाचे. होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. तुका म्हणे देवा अंजन ते तुझी सेवा. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. सत्य आम्हा मनी नव्हो गबाळाचे धनी ... तुकोबांचं जीवन जगण्याचं हे भांडवल होतं. तेच भांडवल कवीलाही आपलंसं वाटतं. म्हणूनच तो तुकोबांशी आत्मसंवाद साधून तुकारामालाच जगाच्या उध्दारासाठी आवाहन करतो.

तुकोबा आपल्या शब्दभांडवलाला देववाणी मानत होते. हीच तुकोबांची काठी कवीला आजच्या समाजकंटकांवर अगारावीशी वाटते. खलप्रवृत्ती ही अनादिकाळापासूनची आहे. खलप्रवृत्तीला संतांनी उत्तरे दिली परंतु तुकारामांच्या शब्दांना जी धार प्राप्त झाली त्यासाठी काळाला सतराव्या शतकाची वाट पाहावी लागली. विठ्ठलाच्या ह्या वीराची शब्दशस्त्र पारजणारी तलवार सतराव्या शतकात चालली आणि पुढच्या पिढीला तिने अभयदान दिले. शब्दधन दिले. शब्दभांडवल दिले. शब्दास्त्रेही दिली. तुकोबांचे अभंग हे आजही कवीला तुकोबांच्या असण्याची साक्ष वाटतात. तुकोबा आपल्यातच आहेत. आपलं बोलणं बोलणं ते ऐकत आहोत. कुणी ऐको न ऐको, तुकोबा आपलं बोलणं हक्कानं ऐकतील. तुकोबाच आता आपले वाली. जगाचेही तारक. कवी श्रीकृष्ण राऊतही तुकोबांच्याच कविकुलातले कवी आहेत. तुकोबांच्या शब्दांना आजच्या काळात धार देण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी, तुकारामांच्याच वारसदारांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. तुकारामा ह्या कवितेत तुकोबा कुलीन उत्तरदायित्व कवीनं जोखलं आहे. ही कविता त्याची साक्ष आहे.

पुजार्‍यांच्या दिली हाती कुणी लाठी तुकारामा, विठोबाला हवी तुमची अता काठी तुकारामा... वारकर्‍यांचं तीर्थक्षेत्र पंढरपूर. विठ्ठलाची भक्तिपेठ. परंतु पंढरपूरच्या पुजार्‍यांचा काळा इतिहास जर लक्षात घेतला तर विठ्ठल हा भक्तांचा बाजार कसा काय सहन करु शकतो? पुजार्‍यांना विठ्ठलाचा व्यापार करण्याचा अधिकार कुणी दिला? भक्तांचे गळे कसे कापले जातात? पंढरपूर आणि चंद्गभागेच्या पवित्र्याचा विनाश करणार्‍या व्यापार्‍यांचा बंदोबस्त आजवर कुणीही करु शकले नाही. कोर्टकज्जे झाले परंतु विठ्ठलालाच प्रत्येक वेळी पराभूत व्हावे लागले. दोन शब्द बोलत नाही, चार पावलं चालत नाही, नारळाप्रमाणे मस्तक फोडले तरी, जागचा हालत नाही... अशी शंका तुकोबांनाही आली होती. तुकोबांनी विठ्ठलाला बैल, कुत्रा, भिकारी, चोरटा, शिंदळ, निलाजरा अशा अस्सल शिव्या त्यामुळेच दिल्या होत्या. सगुणोपासना सोडून निर्गुणोपासना तुकोबांनी म्हणूनच मौलिक मानली. कवी सुध्दा तुकोबांनाच आपली काठी विठूच्या हाती देण्याची विनवणी करतो. किमानतुकारामाच्या काठीने तरी सावळ्या विठोबाला जाग येईल. दोन्ही हात कमरेवर ठेवून केवळ जगाचा तमाशा पाहणे विठोबाने सोडले पाहिजे, ही कवीची अपेक्षा आहे.

तुकारामाचा जीव विठोबात आणि विठोबाचा जीव तुकारामांत असे हे अद्वैत आहे. मीच मज व्यालो पोटी आपुल्या आलो. दोहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे.... भक्त-भागवताची ही अनुभूती तुकोबांनी घेतली होती म्हणून कवीलाही त्यामुळेच तुकारामाकडून अशा आहे. तुकोबा बोले तैसा चाले होते म्हणून कवीला विठोबाच्या तुकोबांशीच साक्षात आत्मसंवाद करायला आवडतो.

स्फुरे का शब्दकोशांना कधी वाणी अभंगाची, शिदोरी भोगण्याची ती हवी गाठी तुकारामा. तुकोबा अनुभवप्रामाण्यवादी होते. नाही आले अनुभवा कैसे नाचू मी देवा... ही त्यांची भूमिका होती. तुकोबांच्या शब्दांना अनुभवाचे पाठबळ होते म्हण् ाूनच त्यांच्या अभंगांना-शब्दांना सळसळते चैतन्य प्राप्त झाले. तुकोबा अस्सल कवी होते. त्यांचे शब्दही कवीकुलोत्पन्न होते. परंतु सर्वच कवी कवी नसतात. सर्वच कविता कविताही नसतात. शब्दकोशातल्या शब्दांनी कविता निर्माण होत नाही. कवीचे शब्द त्याच्या अंतर्मनातल्या शब्दकोशातून कवितेत येतात. कवी शब्दांना जन्म देतो. सृजनाच्या वेणा त्याला भोगाव्या लागतात. कवीचे शब्द अनुभवण्यासाठी श्रोत्यालाही कवीच्या दु:खवेणांच्या स्थितीतच सादर व्हावे लागते. शिदोरी भोगण्याची ती हवी गाठी तुकारामा, असे जेव्हा कवी म्हणतो तेव्हा तो तुकोबांशी आत्मसंवाद करीत श्रोत्यांशीही बोलू लागतो.

अहो काही खरे नाही मनी आनंद-डोहाचे समाधानी कपाळावर दिसे आठी तुकारामा. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. नित्य नवा दिस जागृतीचा. तरच आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदचि अंग आनंदाचे, ही अनुभूती आपल्याला घेता येईल. मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण आहे. मग वढाय वढाय जसं पिकातलं ढोर... मनाला आवर तरच मनात आनंदाचा डोह तुडूंब. आनंदाचंच साम्राज्य. परंतु डोहाचं वरवर शांतगूढ असणं आणि आतून खळबळ तर मात्र समाधानी कपाळावर दिसे आठी तुकारामा. कवी तुकारामाशी बोलतो तेव्हा त्यांच्या मनात तुकोबांच्या आड उभा असलेला श्रोताही असतो. कवी-तुकाराम संवाद हा खरेतर आपल्यासाठीच असतो. आपल्याला शहाणं करण्यासाठी असतो.

किनारी चंद्गभागेच्या विकत घ्या प्लॉट मोक्याचे, तुम्हाला सांगतो तुमच्या भल्यासाठी तुकारामा... कळाया चाल हेकोडी जगाशी ह्या भिडू त्यांना, मुलांना घालता पाठी कशासाठी तुकारामा.... नकोसे होत जाणारे मरु लागे हळू नाते, फुलांचे होऊनि ओझे रुते पाठी तुकारामा... एकविसाव्या शतकात नात्यागोत्यांतला ओलावा संपला. माणसं आतून बंद बेटांसारखी झाली. रोबोट संस्कृती आली. विज्ञान तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी माणसं दुरावली. माणसामाणसामधला संवादही अबोल झाला. आपल्यापेक्षा आपल्या मुलांची चिंता भेडसावू लागली. पुत्रमोहाची जागा घेतली. नाजूक फुलांचेही ओझे पाठी रुतू लागले. नात्यातलं पाल्य आणि पालकत्व गेलं. मायबापांनी कुबड्यांची सोय लावली. मुलांना अपंग करण्याचा चंग बांधला. जगाशी भिडण्याचं सामर्थ्यच नष्ट झालं. जनरेशन गॅपमुळे मुलंही मायबापांपेक्षाही पुढे जाणारी आणि नात्यांच्या - जिव्हाळ्याच्या व्यवहारात निष्णात झाली. आधुनिक चंगळवादी संस्कृतीवर कवीने कठोर प्रहार केले आहेत. तुकोबा - गाडगेबांबानी अपत्यमृत्यृचं दु:ख मुकपणे सहन केलं तसं कुणाला करता येईल? जिकडे तिकडे दावा आणि चढाओढ. तुकारामाच्या आडून तुकोबांचे अपहासशस्त्र कवी समाजाच्या ह्या दुषित प्रवृत्तीवर सोडू पाहातो. कारण माणसाचं जगणंच हिरावून घेणारी ही नवप्रवृत्ती जगातल्या प्रेम आणि सदाचाराचा विनाश घडवून आणायला उत्सुक असल्याचं कवीला जाणवतं. म्हणून कवी आपले काव्यस्त्र घेवून परिवर्तनाच्या सद्‌भावनेनं सज्ज होवून पाहातो आहे.

जिवांच्या लागले मागे तगादे सावकारांचे, किती मी सावडू हाडे नदी काठी तुकारामा ..... महात्मा फुल्यांनी तुकोबांना शेतकर्‍यांचे संत म्हटले होते. तुकोबा खुद्द शेतकरी होते. तुकोबांनी जशी भक्तीची शेती केली तशीच विठ्ठलभाव जपून शेतीचीही मशागत केली. शेती ही विठ्ठल चरणी अर्पून कुणबिकीचा सृष्टीच्या पालनहार्‍याचा धर्म कर्म म्हणून मानला. शेती बुडाली ही विठ्‌ठालाची मर्जी मानली. तुकोबांनी त्यासाठी कधी दु:ख केले नाही. मढे झाकुनि करती पेरणी I कुणबियांचे वाणी लवलाहे II तयापरी करी स्वहित आपले I जयासी फावले नरदेह II ओटीच्या परिस मुठीचे ते वाढे I यापरि कैवाडे स्वहिताचे II ना ही काळसत्ता आपले हाती I जाणतो हे गुंती उगविती II तुका म्हणे पाहे आपुली सूचना I करितो शहाणा मृत्यूलोकी II ही तुकोबांची धोरण होती. काळाची सत्ता आपल्या हाती नाही. हा गुंता ज्याने जाणला तो कधी आत्महत्या करीत नाही. परंतु आधुनिक युगात देशभर लाख्खो शेतकर्‍यांनी शेतीपायी आत्महत्या केल्या. सृष्टीचा पालनहारा गळफास लावून मोकळा व्हायला लागला. दु:खमुक्तीचा हा मार्ग तुकोबांनी नाकारला होता. जगणे आणि जगविणे हाच खरेतर शेतकर्‍यांचा धर्म. परंतु शेतकर्‍यांना जीवापेक्षा मृत्यू गोड वाटू लागला. कवीला शेतकर्‍यांच्या मृत्यूलोकी जाण्याचा अधर्म वाटू लागला. सावरकारांच्या पाशत शेतकर्‍यांच्या माना अडकल्या. मुक्तीचा मार्ग म्हणून त्यांनी गळफास कवटाळला. यासाठी कोण दोषी ? हा प्रश्न अलाहिदा. परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं तणकट वाढू लागलं याची कवीला अधिक चिंता वाटते. यावर उपाय काय? कोणता ? याची उत्तरं कवी तुकारामाशी आत्मसंवाद करीत मागू पाहातो.

तुकारामानं उत्तरं दिलेली आहेत. ती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कुणाची? कवीला ती आपली वाटते. वाटायलाही हवी. शेवटी शेतकरी हाच आपला बाप. तोच आपली माऊली. तोच आपला विठ्ठल. तुका म्हणे तोचि देव त्याच्या चरणी माझा भाव .... भक्तभागवत तोच वारकरी. तोच तुकोबा ही वृत्ती वाढीस लागावी म्हणून तुकोबांनी सबंध जगाला भक्तिभाव वाढला. अखिल मानवजातीच्या उध्दाराचा मंत्र म्हणून तुकोबांनी भक्तिमार्गाचा उपाय सतराव्या शतकात सांगितला होता. भक्ती ही समाजक्रांतीची कालातीत जननी आहे. जगातील सर्वच समस्यांचे मूळ दु:ख आहे. दु:खमुक्तीचा सर्वश्रेष्ठ उपाय म्हणूनच भक्तीकडे पाहावे लागते. अशांत जगाला शांत करण्याचे साधन म्हणून भक्तीकडे पाहाता येते. आजच्याही काळात जगातल्या सर्वच समस्यांचे समाधान भक्तीतून शोधता येते. हा उदंड आत्मविश्वास जसा तुकारामाला होता तसाच तो तुकारामाच्या रचनाकारातही आहे.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगातील दु:खाचा कोलाहल पाहून कवी थकला आहे. एकविसाव्या शतकातील दु:खे आणखी विद्गुप रुपात जगासमोर आली. धार्मिक उन्माद आणि त्यातून पालवीसारखा फुटलेला, सबंध जगाला हादरे देणारा दहशतवाद भारतासह जगाच्या परिघात केंद्गवर्ती जगण्याचे दु:खमूल म्हणून स्थिरावला. वीज, पाणी, अन्न, निवारा ह्या मूलभूत समस्यांच्या व्हायरसमध्ये समाजाला जगणे भाग पडत आहे. जगाच्या भल्यासाठी आयुष्यभर राबणार्‍या आणि अखेरीस, बसे एका जागी थकलेले ढोर, नाही अंगी जोर उठावया-निकामी झाल्यावर दु:खाच्या सागरात दम टाकणार्‍या वृषभासारखा असहाय होऊन कवी तुकोबा माऊलीस भागलेल्या जीवांर्तें दु:खमुक्तीसाठी प्रार्थना करतो. तसा झाला माझा भागलेला जीव, करी त्याची कीव विठाई वो ! हा आर्त टाहो तुकोबादशहामधून प्रकटला तोच तुकारामा या कवितेचा प्राण आहे. आत्मा आहे. तुकोबांशी कवीने आजच्या दु:खमुलाबाबत केलेला आत्मसंवाद आहे.

___________________________________________________________

डॉ.किशोर सानप

कमला नेहरु शाळेजवळ, रामनगर, वर्धा - 442001

दुरध्वनी - 07152-241759, 9326880523, 3422894205, 9422894303

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: