Related Posts Plugin for WordPress, Blogger...

६ जानेवारी, २०११

जिंदादिल प्रा. श्रीकृष्ण राऊत-डॉ. किशोर फुले


जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने-मराठी गझलेचे खलिफा सुरेश भट यांच्या स्मृतिनिमित्त बांधण जनप्रतिष्ठान, मुंबई आणि सुरेश भट स्मृति प्रतिष्ठान,अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गझलोत्सव२०११चे आयोजन जानेवारीला अमरावतीला, सुरेश भटांच्या जन्मगावी होत आहे. सुरेश भटांवर, त्यांच्या कवितेवर, गझलांवर प्रेम करणा‍‍‍र्‍या तव्दतच प्रत्येक अमरावतीकरांसाठी ही एक अभिमानाचीच बाब म्हटली पाहिजे. या अभिमानात आणि आनंदात भर घालणार्‍या काही विशेष बाबी या गझलोत्सवात होत असून त्यातली पहिली बाब म्हणजे एकूणच मराठी गझलेचे, हिंदी- उर्दू शायरीचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. राम पंडित यांनी संपादित केलेल्या सुरेश भट गौरव ग्रंथाचे, `गझलोत्सव २०११ स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री श्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या हस्ते होत आहे. आणि दुसरा दुग्धशर्करा योग म्हणजे विदर्भातील, महाराष्ट्रातील ख्यातनाम गझलकार,कवी

प्रा. श्रीकृष्ण राऊत यांना जीवनगौरव पुरस्कार, गझलेवर फिदा असणारे, रसिक मा. श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या जीवन गौरवाचे निमित्ताने प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचे मन:पूर्वक अभिनंदन.


कविश्रेष्ठ सुरेश भटांची गझल जेव्हा महाराष्ट्रात झंझावातासारखी पसरत होती त्यावेळी त्या झंझावातात झपाटलेल्यापैकी प्रा. श्रीकृष्ण राऊत आहेत. सुरेश भटांच्या प्रभावळीत परंतु आपला स्वत:चा एक वेगळा ठसा निर्माण करणार्‍या गझलकारांमध्ये प्रा. श्रीकृष्ण राऊत हे एक होत. अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विषयाचा प्राध्यापक असणारा हा माणूस आकडेमोड करता-करता वृत्त आणि छंदाच्या प्रेमात पडून आयुष्याचे गणित आपल्या गझलेच्या शेरातून मांडू लागला. मुक्तछंदाचा प्रभाव मराठी कवितेवर असणार्‍या काळात मराठी गझल सुरेश भटांनी मराठी मातीत आणि मराठी मनात रुजविली, फुलविली आणि त्या गझलेला प्रा. श्रीकृष्ण राऊत, अरुण सांगोळे, श्रीराम पचिंद्गे, गंगाधर पुसदकर, म. भा. चव्हाणांसारखे अनेक धुमारे फुटले. सुरेश भटांच्या गझल प्रवासाला पुढे नेण्याचे काम या पिढीने केले. प्रा श्रीकृष्ण राऊत हे त्यातील बीनीचे नाव म्हटले पाहिजे.

जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकीन्स म्हणजे प्रज्ञा-प्रतिभेचे अदभूत रसायन आहे. व्हीलचेअरवर बसून या वैज्ञानिकाच्या प्रज्ञेने ब्रम्हांडाला गवसणी घातली आहे;अपंगत्वावर मात करून! प्रा. श्रीकृष्ण राऊत यांची शारीरिक स्थिती ही तितकी वाईट नसली तरी बरीही नाही. पण स्वत:च्या शारीरिक अपंगत्त्वावर मात करून या कवीच्या प्रतिभेने आपल्या कवितेतून दंभाविरुद्ध उठून उभे राहण्याची जी जिद्द दाखवली आहे त्या जिद्दीला सलामच केला पाहिजे. प्रा. राऊत यांनी आपला ‘गुलाल आणि इतर गझला’हा गझलसंग्रह ‘जीवनाशी सतत झुंज देत जगणार्‍या जगातील त्या तमाम अपंगाच्या जिद्दीला’अर्पण केला आहे. यावरूनच या कवीची मनोभूमिका स्पष्ट होते.

स्वत:च्या आयुष्यातील उणीवांवर रडत न बसता‘ज्याला जमले हसणे त्याचे सुंदर झाले जगणे,


आले नाही हसता त्यांचे जगणे फसते भाई.’असे जीवनातील आनंदाचे तत्त्वज्ञान हा कवी सांगतो.यापुढेही जाऊन‘लाख होउदे सभोवताली उजाड बागबगीचे,


गाव फुलांचे मनात हसर्‍या अमुच्या वसते भाई.’असा दुर्दम्य आत्मविश्वास या कवीच्या अंतरंगातून प्रकट होतो.

व्यक्तिगत जीवनातील सुख -दु:खाचे सूर या कवीने आपल्या कवितेत आळवले नाहीत असे नाही ;ते आळवले आहेतच पण जीवनातील आनंदही प्रा. श्रीकृष्ण राऊतांनी कवितेत तर मांडलाच पण आपल्या प्रत्यक्ष जगण्यातूनही तो अधोरेखीत केला आहे. म्हणून प्रा. राऊत सरांशी भेट म्हणजे एका जिंदादिल माणसासोबत रंगलेली मैफिल असते. चेहर्‍यावर सदैव प्रसन्न भाव, मनापासून प्रगट होण्याची मनस्वी वृत्ती आणि कोणत्याही दंभाला जवळ फिरकू न देण्याचा स्वभाव यामुळे श्रीकृष्ण राऊत हा कवी आणि माणूस वाचणार्‍याला आणि भेटणार्‍याला मनापासून भावतो.

प्रा. राऊतसरांनी ‘कोरकू आदिवासींच्या पारंपरिक मौखिक गीतांचा लोकतत्त्वीय अभ्यास’ या विषयावर आचार्य पदवी प्राप्त केली. वाणिज्यातील पदव्युत्तर पदवी मिळविली. एम.फील केले यावरून त्यांची धडपड आणि ज्ञानसाधना दिसून येते. कवितेच्या आणि गझलेच्या प्रांतात मुशाफिरी करणार्‍या प्रा. राऊतांचा १९८९ला ‘गुलाल’ हा पहिला गझलसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर २००१ ला ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा‍र्‍या तान्ह्या मुला’ हा कवितासंग्रह, २००३

साली ‘गुलाल आणि इतर गझला’ हा गझलसंग्रह २००३

मध्येच ‘चार ओळी तुझ्यासाठी’हा गाथासंग्रह प्रसिद्ध झाला.

‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा‍र्‍या तान्ह्या मुला’ या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पद्‌मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार कवयित्री संजीवनी खोजे स्मृती पुरस्कार, तुका म्हणे पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा शरच्चंद्ग मुक्तिबोध पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी यशवंत पुरस्कार असे अनेक पुरस्कार श्रीकृष्ण राऊतांच्या खाती जमा आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. अंतिम वर्षाला त्यांची ‘जो जो रे’ ही कविता अभ्यासाला असून हैद्राबाद विद्यापीठात त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद झाला आहे. साहित्य अकादमीच्या चर्चासत्रातही त्यांनी शोधनिबंध सादर केला. या शिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून त्यांचे लिखाण सतत प्रसिद्ध होत असते.

पु.ल.देशपांडे,ना.घ.देशपांडे,कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर यासारख्या महान साहित्यिकांनी प्रा.श्रीकृष्ण राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे. ‘राघूमैना’ या चित्रपटातूनही त्यांनी गीतलेखन केले आहे. कवितेच्या, गझलेच्या प्रांतात चिरकाल टिकण्यासाठी लागणारी प्रगल्भता प्रा.राऊतांमध्ये आहे. शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्यावर प्रा.राऊतांनी लिहिलेले ‘तू ज्ञानाचे गाणे भाऊ, तु सूर्याची भाषा...’हे गौरवगीत म्हणजे तर भाऊसाहेबांचे शब्दशिल्पच म्हटले पाहिजे. साहित्य विचाराला त्यातही गझलेला वाहून घेणारे प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचे व्यक्तिमत्व हे जीवनगौरवासाठी गझलोत्सवात सर्वार्थाने योग्य आहे.

जीवन गौरव पुरस्काराने प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचा आशावाद दुणावणारच आहे. कारण परिवर्तनावर या कवीचा प्रचंड विश्वास आहे. ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी’ची भाषा हा कवी वेगळ्या शब्दात व्यक्त करतो ती आपल्या ‘बियाणे’ या गझलेत-‘वाफ्यातले जुने हे बदलू जरा बियाणे


तेव्हा कुठे इथेही उगवेवे पेरलेले.’कविश्रेष्ठ सुरेश भटांच्या पिढीने जे पेरले ते प्रा. श्रीकृष्ण राऊत यांच्या रूपाने उगवले आहे त्या फलश्रुतीचाच हा जीवनगौरव आहे. प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचे पुनश्च अभिनंदन आणि यापेक्षाही कसदार लिखाणासाठी शुभेच्छा.

_______________________________________________

डॉ. किशोर फुले,

श्री शिवाजी कला व वाणिज्य

महाविद्यालय, अमरावती

9423124608

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP