Related Posts Plugin for WordPress, Blogger...

६ जानेवारी, २०११

सुभाषितांचे सामर्थ्य लाभलेली श्रीकृष्ण राऊतांची गझल : डॉ.मधुकर वाकोडे

‘गझल’ हा असा अनोखा रचनाप्रकार आहे; तसाच तरल छंदोबद्ध काव्यप्रकारही आहे. या रचनाप्रकाराचा मी कुणी अभ्यासक नाही; रसिक मात्र आहे. गझल विषयी रसिकता निर्माण व्हायला कारण ठरले. श्रेष्ठकवी सुरेश भट. एकदा एका विशेष कामानिमित्त सुरेश भट माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘मधुss, तू रंग माझा वेगळाया माझ्या कार्यक्रमाचं सूत्र संचालन करावं अशी माझी इच्छा आहे! सुरेशदादांशी संबंध जिव्हाळ्याचे असल्याने माझी पात्रता नसतांनाही मी होकार दिला. त्या काळात मी ग्रामीण-वर्‍हाडी कवी संमेलनाचं सूत्र संचालन करीत असे आणि मी त्यांच्या रंग माझा वेगळा’ - ‘एल्गारया कार्यक्रमांचे काही काळ सूत्रसंचालन केले आणि स्वाभाविकच गझलविषयी जिव्हाळा निर्माण झाला. सुरेश भटांच्या तोडीचा मराठीत गझलकार आजतागायत निर्माण झाला नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे; कारण त्यांनी इष्काला चटावलेल्या गझलला सामाजिकतेचं मध चाटवलं आणि गझलची प्रकृतीच बदलली. सामाजिक आशयाचा लळा आणि सामान्य माणसांच्या व्यथा वेदनांचा कळवळा असलेली गझल मला भावली आणि मराठी रसिकांच्या काळजाला भिडली. सुरेश भटांच्या नंतर सामाजिक जाणिवेतून गझल लिहिणार्‍या मोजक्या गझलकारांपैकी श्रीकृष्ण राऊत हे एक सशक्त गझलकार आहेत आणि त्यांच्या कितीतरी गझलांचा मी चाहता आहे; म्हणून हे चार शब्द लिहिण्याचं धाडस करीत आहे.

तीव्र वेदनांच्या आकांताला आर्ततेचं अस्तर असते आणि मानवी जीवनातील दु:ख टिपकागदासारखं शोषून; त्या दु:खाचा गहिरेपणा कमी करून त्यास सौम्य पातळीवर आणण्याची शिकस्त करणारी संवेदनशीलता भक्तीला अधोरेखित करणारं मखर असते. श्रीकृष्ण राऊत जेव्हा-

दु:ख माझे देव झाले; शब्द झाले प्रार्थना

आरती जी गात आहे तीच माझी वेदना.

मी पुजारी माणसांचा, दु:खितांचा भक्त मी

आंधळ्यांना वाट दावी तीच माझी अर्चना.

अशी आरती गातात तेव्हा पंढरीपेक्षा पांढरीलाजपणार्‍या ‘दिंडी’ला काळाजावर कोरतांना दिसतात. राधा आणि मीरा यांनी कृष्णरुपात स्वत:ला विसर्जित केले आणि म्हणून राधा भक्तीच्या पेठेतील ‘धारा’; तर मीरा ‘मंजिरी’ झाली. आणि इथे तर श्री कृष्ण राऊतच दु:खाची ‘मीराधारा’ बनतात... ह्या मीराधारेत न्हालेल्या त्यांच्या कितीतरी गझला काळाच्या झुल्यावर झुलतांना रसिकांच्या काळजाला झुलवत राहतील या तोडीच्या आहेत. गुलाल, आषाढ, तेरवी, निर्माल्य, बियाणे, वस्ती, घास, तोल, दिंडी, सत्य, गंगा, जाण, मंबाजी या सारख्या कितीतरी ‘गझल’काळीज कळ्यांना उन्मिलित करण्याचे कौशल्य लीलया पार पाडण्याचा प्रत्ययच देतात.

आज मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये गझल लिहिली जात आहे. आणि सामाजिक जाणिवांनी तिचे आशय क्षेत्र विस्तारित होत आहे, ही बाब महत्वाची वाटते. काल सुरेश भटांनी नवोदितांना गझलचे तंत्र सांगितले, तर आज भीमराव पांचाळे गझलचे मर्म विशद करणारे मंत्र सांगून गझल लेखनास चालना देण्याचे कार्य करताहेत; त्यामुळे गझल बहरास येत आहे. पण कित्येक गझला वीटांच्या साच्यातून वीटा बाहेर पडाव्या तशा ठोकळेबाज गझलांची संख्याही कमी नाही. श्रीकृष्ण राऊतांना याचे भान आहे; म्हणून-

दोह्यात जीव नाही, गझलेत जान नाही;

शायर जगात दुसरा माझ्या समान नाही.

असा स्वनामधन्य गझलकारांना चिमटा काढतात. मराठी माणसांचे उर्दूचे वाचन फारसे नसल्याने उर्दू गझल मधील कल्पनांच्या मराठीत भडीमार करणारे साहित्य क्षेत्रातील चिडीमारच आहेत; कारण त्यांना मराठी संस्कृतीच्या पारदर्शी पापुद्ग्यांचे भान नसते; याची जाणीव श्रीकृष्ण राऊतांना आहे.

चोरून रोज खातो उर्दूमधील लोणी

सायीवरी मराठी माझे इमान नाही.

या वास्तवाचे भान त्यांना असल्याने स्वत:चा लिलाव त्यांना टाळता आला आणि आपली निर्मिती शाबूत ठेवता आली.

वि.सा.संघाचा कवी शरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार डॉ.मधुकर वाकोडे यांच्याकडून स्वीकारताना

आज भौतिक श्रीमंती जरी वाढत असली तरी मानसिक गरिबी आणि आत्मिक मानगीही वाढत आहे आणि यावर उपचार करणार्‍या हायफाय मंबाजींची रोज नवी पलटण तयार होत आहे. कालपर्यंत संतांची कविता सामान्यांना जगण्याचे बळ देत होती आणि ते स्वत: मंबाजींचे बळी ठरत होते. आजच्या काळातील तथाकथित अनेक संत ह्या मंबाजींचे कात टाकलेले प्रतिनिधी आहेत. काळ कोणताही असो-

मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी

हे वास्तव हेरण्याची प्रगल्भ जाणीव असणे खर्‍या सर्जनशीलतेची पावती आहे. भागवत कथांच्या नावाखाली सामान्यांच्या भावनेला हात घालणार्‍या ह्या मंबाजींचा

कुमारी पाहिजे कन्या, तशी चालेल प्रौढाही;

असे कंत्राट सौख्याचे सदा घेतात मंबाजी.

श्रीकृष्ण राऊत असा खमठोकपणे समाचार घेतात आणि आपण बहुजनांचे... शोषितांचे प्रतिनिधी असल्याची स्पष्ट भूमिका घेतात, ही गोष्ट अतिशय अभिमानास्पद वाटते. लेखन अनेक कलावंत करतात पण आपण कुणासाठी लेखन करीत आहोत आणि आपण कुणाचे प्रतिनिधीत्व करीत आहोत; या बाबत कलावंताची निश्चित भूमिका असावी लागते. बिनबुडाचे गाडगे बेभरवशाचे असते.

तुकाराम, अरे ह्यांना जरा हाण पैजारा

असे आवाहन करणार्‍या राऊतांची घोडसवारीकरतांना मांडमजबूत असल्याची ही साक्ष आहे. सामाजिक आशय बुलंद करणारा हा कलंदर असा समष्टीचा पाईक आहे.

संतांचे अभंग असोत किंवा पंडितांचे श्लोक असोत. कविची कविता असो किंवा शायरची गझल असो... कालातीत असण्याचा एक मोठा मापदंड म्हणजे ह्या रचनांना लाभलेले सुभाषितांचे सामर्थ्य! श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेतील कितीतरी शेर, कितीतरी चरण सुभाषितांच्या पातळीवर वावरतात.

-रे दु:ख माणसांचे अंतिम सत्य आहे.

-पापे धुवून अमुची झाली गढूळ गंगा.

-अनुभव शिक्षक असे खरा.

-स्वर्ग छान कल्पना, मोक्ष फालतूपणा.

-राहिला न आपला कुठेच देश चांगला.

-सोबतीचे जरी सर्व झाले पशू,

तू तरी वाग ना माणसासारखा.

-आत्मकेंद्गी फार झाले खानदानी आरसे.

-सेंन्टेड माणसांची भलतीच घाण वस्ती.

-खुनी देव झाले पुजारी मवाली.

-दिसलेत मानभावी होते कसाब सारे

-माणसात पाहतो तुला, शोधतो न मंदिरात मी.

अशा सारख्या कितीतरी चरणांना सुभाषितांचा गंध नि वास्तवाचा रंग लाभलेला आहे. मानवी जीवनातील चढ-उतार, व्यथा वेदना आणि सुरूपांच्या मागे दडलेल्या विरूपांचे अस्सल अनुभव श्रीकृष्ण राऊतांच्या गाठी असल्याने समकालीन बाजारूप्रवृत्तींचा बुरखा फाडून त्वचा आणि कातडीमधील... स्कीन आणि लेदर मधील संवदेना ... बधीरपणा जोखतात.

स्वस्तात फार ज्याने विकले मला अवेळी;

तो गौर कातडीचा कोणी दलाल होता.

कातडी सोलता सोलता बोथट झालेले दलाल त्वचा आणि कातडी मधील अंतर ते काय जाणणार? तरल प्रतिमांच्या माध्यमातून मानवी जीवनातील भेसूरवृत्तीवर प्रकाश टाकून त्या वृत्तीप्रवृत्तींची लीलया शल्यक्रिया पार पाडण्यात त्यांची प्रतिभा फार चपखलखणा दाखविते.

ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्‌

मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता.

रुमालया प्रतिमेने इसापकथेच्या आशयालाच छेद देवून एका तिरकस शैलीचा प्रत्यय दिला आहे.

दिसलेत मानभावी, होते कसाब सारे;’

इथे श्रीकृष्ण राऊतांची व्यथा दोन दशकाआधी भविष्यात घडणार्‍या कथेचे जेव्हा संसूचन करुन जाते, तेव्हा कवीच्या व्हिजनचा एक साक्षात्कार ठरतो.

श्रीकृष्ण राऊत सामाजिक जाणिवांचे शिलेदार आहेत. पण त्याच बरोबर वेळ प्रसंगी प्रेमभावनांचा पाणीदारपणाही अभिव्यक्त करतांना कसूर ठेवत नाहीत.

सांगू कशी फुलाचा देठास भार झाला;

हा बहर यौवनाचा देहास फार झाला.

हा सूर कमालीचा कमनीय आहे... कामसू आहे. ते यौवनाने पुलकित झालेले सौंदर्य असं काही मखरतात की यौवनाची प्रभा आणि सौंदर्याची आभा एका दिप्तीत सामावतात.

सामान्यांचे दु:ख तेव्हाच जाणवते जेव्हा कवी- कलावंत त्या आघातांची दाहकता भोगून असतात. दु:खाला पर्याय नसे, उगाच शोधत फिरू नको. इतका त्यांचा आत्मानुभाव वास्तवाला भिडणारा आहे. श्रीकृष्ण राऊतांच्या वाढत्या वयाबरोबर आणि चढत्या अनुभवांबरोबर अधिकाधिक प्रगल्भ झालेली त्यांची गझल गहिरी होत जाणार अशी अपेक्षा व्यक्त करतो; कारण त्यांचा डोळसपणा-

अनुभव शिक्षक असे खरा

दुसरा कोणी गुरू नको.

___________________________________________________________________

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP