६ जानेवारी, २०११

नव्या गझलविद्यापीठाला सलाम!


गझल या काव्यप्रकाराला वाहिलेल्या मुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा `जीवनगौरव पुरस्कार' जेष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांना अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय गझलोत्सवामध्ये मा. ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते रविवार दि. ९ जानेवारीला प्रदान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण राऊत यांच्याशी मुक्त पत्रकार नरेंद्र लांजेवार यांनी केलेला सहृदय पत्रसंवाद...

आदरणीय श्रीकृष्ण राऊत सर,
सविनय अभिनंदन आणि तुमच्या लेखणीला सलाम!
मुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठानतर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी जेष्ठ मराठी गझलकाराला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा जीवनगौरव पुरस्कार आपणांस जाहीर झाल्याचे समजले आणि मनापासून आनंद झाला. आपल्या गझल साधनेची दखल योग्यवेळी घेतल्या गेली याचा मनस्वी आनंद वाटला.
आज कोणीही उठतो आणि पुरस्कार जाहीर करतो. रोजच्या वर्तमानपत्रात समाजभूषण पुरस्कारापासून ते विश्वमित्र पुरस्कारापर्यंत प्रभातफेर्यांामध्ये एक-दोन रुपयांची चॉकलेट-बिस्किटे वाटावीत तसे पुरस्कारांचे वाटप ठिकठिकाणी सुरू असते. पुरस्कार घेणारे रांगेत उभे आहेत म्हणून वाटणारेही आहेत... अशा या उबग आणणार्या परिस्थितीमुळे सच्च्या पुरस्काराचेही मोल कमी होऊ लागले आहे. तरीही वाङ्‌मयीन अभिरूची जोपासत जीवननिष्ठेने साहित्याच्या क्षेत्रात आजही काही बोटावर मोजण्याइतपत चांगली माणसं-चांगल्या संस्था कार्यरत आहेत. या संस्था-संघटनांकडे बघून अजूनही चांगल्या कार्याची दखल घेणारे तटस्थ व्यक्ती आहेत. त्यामुळेच काही पुरस्कारांचे वलय निश्चितच बाकी आहे. यापैकीच बांधण जनप्रतिष्ठानचा हा गझलच्या क्षेत्रात कार्य करणार्याे सच्च्या साहित्यिकाला देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार आहे.
सर, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आणि एका अर्थाने बांधण जनप्रतिष्ठानचीही आजवरची निकोप निवडीची प्रतिष्ठा काकणभर वधारली. तसे तुम्ही आजच्या कोणत्याही साहित्यप्रवाहाच्या टोळीत न सामावणारे! आज साहित्यिकांच्या गावोगावी टोळ्या आहेत. त्यांचे वेगवेगळे कंपू आहेत... जो-तो आपापल्या कंपू आणि टोळीतीलच व्यक्तिला कसे पुरस्कार मिळतील, कोणत्या कमिट्या आणि समित्यांवर आपल्याच मित्रांची वर्णी लागेल, कोणत्या विापीठाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याच गोतावळ्यातील लेखकांची पुस्तके लागतील... इतरांसाठी तटबंदी! परंतु सर तुम्ही अशा कंपूशाहीपासून दूर राहिलात आणि लिहित गेलात... जनसामान्यांला आपली वाटेल अशी साधी, सरळ, सोपी कविता आणि गझल तुम्ही लिहिली... ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्यास तान्ह्या मुला' ही तुमची दीर्घ कविता मी जेव्हा पुन्हा पुन्हा वाचतो, तेव्हा मला तुमच्यातील अब्राहम लिंकनसारख्या तत्वचिंतनात्मक आधुनिक बापाचे दर्शन होते. जागतिकीकरणाच्या या अगतिकीकरणाच्या समाजव्यवस्थेत सर्वसामान्य कुटुंबातील मुलाच्या भविष्याचा प्रश्न तुम्हाला छळतो. पुढे हाच धागा पकडत माणूसपणाच्या सत्वाची आणि माणुसकीच्या तत्वाची पाठराखण तुम्ही ‘गुलाल आणि इतर गझला' या संग्रहातून मांडताना दिसता. तुमच्या या संग्रहातील गझलांना पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगांवकर अशा दिग्गजांनी उगाच नाही वाखाणले आहे. शारीरिक अपंगत्वाचे भांडवल न करता तुम्ही लिहित राहिलात... आदिवासी कोरकू बोली भाषेचा अभ्यास करून आचार्य पदवी प्राप्त केली. या काळातील तुमचा जीवनसंघर्ष जवळून बघता आला. कामाचा व्याप, कौटुंबिक जबाबदार्या , शारीरिक अपंगत्व यावर मात करत वाचन-मनन-चिंतन यात खंड नाही. कोणावरही चिडचिड नाही. गझल लेखनाचा घेतलेला वसा अशाही परिस्थितीत नित्यनियमाने आपण टिकवून ठेवला, नव्हे जीवनचिंतन नेमकेपणाने मांडत राहिलात. सामाजिक जीवनातील विसंगती शोधक वृत्तीने टिपत गेलात आणि रसिकांसाठी नवनवी गझल लिहित गेलात... सर आपण वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे धडे देत देत गझलची तंत्रशुद्धता की तंत्रशरणता? यावरही चिंतन करत गेलात आणि गझलचे सोपे व्याकरण आम्हा गझल अभ्यासकांसाठी तयार केले.
अभिजात वाङ्‌मयीन नियतकालिकांमधून, प्रतिष्ठित दिवाळी अंकांमधून आपली गझल दरवर्षी वाचकांच्या भेटीला आली. दशरथ पुजारी, सुरेश वाडकर, सुधाकर कदम, भीमराव पांचाळे, स्वाती पोहणकर, राजेश उमाळे, रफिक शेख, मदन काजळे, दिनेश अर्जुना इत्यादी गुणी गझल गायकांनी तुमच्या गझलांना स्वरसाज चढविला. इंटरनेटवर ‘माझी गझल मराठी' हा ब्लॉग तुम्ही सुरू केला. गझलबाबतची इत्यंभूत माहिती तुम्ही देशविदेशातील मराठी वाचकांपर्यंत पुरविली. ‘गझलकार' या ब्लॉगवर मराठी-हिंदी-उर्दुतील अनेक दिग्गज गझलकारांचे साहित्य स्वतः नोंदविले. या सायबर विश्वाच्या माध्यमातून हजारो गझलकारांना तुम्ही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आजच्या स्वमग्रतेच्या काळात कोणी कोणासाठी काहीच करावयास तयार नसतांना तुम्ही फक्त गझलच्या प्रेमापोटी हे सर्व केले. हे सर्व करीत असतांना याची वाच्यता स्वतःहून तुम्ही कुठे केली नाही. कदाचित याचीच दखल घेऊन रसिकराज ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हा तुमच्या एकट्याचा सन्मान नाही. तुमच्या गझलवर, तुमच्या कवितांवर, तुमच्या चारोळ्यांवर प्रेम करणार्या काव्यरसिकांचा हा सन्मान आहे.
ऋतु विषारी इथे असे की कळी अवेळी गळून जाते,
नवे बियाणे असे कसे हे उभ्या पिकाला छळून जाते...
असे म्हणत म्हणत तुम्ही-
परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची
मला सांगू नको रामा, तुझा वनवास थोडासा
-अशा शब्दांमधून स्त्री जातीच्या सनातन दुःखाला वाचा फोडली.
आत्महत्या पाप आहे खूप झाले सांगणे
पोट भरल्या चोचल्यांचे खूप झाले सांगणे
- अशा गझलांमधून शेतकर्‍याच्या आत्महत्येची खरी कारणमिमांसा तुम्ही केली. इश्क-शराब-प्रेम-मुहब्बत यापेक्षा तुम्ही रोजच्या जीवनमरणाचे प्रश्न गझलेमध्ये उभे केलेत. आता नव्याने गझल लिहू लागलेले अनेक गझलकार तुमच्याकडे हक्काने मार्गदर्शन मागतात. सुरेश भटांच्या गझल विद्यापीठानंतर अकोल्यात श्रीकृष्ण राऊत नावाचे एक नवे गझल विापीठ उभे राहते आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो...
भविष्यातील दिशादर्शक समृद्ध मराठी गझल तुमच्या लेखणीतून विकसित व्हावी या शुभेच्छांसह जीवनगौरव पुरस्काराबद्दल मनःपूर्वक पुनश्च अभिनंदन.
आपला चाहता...
नरेंद्र लांजेवार
ग्रंथपाल, भारत विद्यालय, बुलडाणा
भ्रमणध्वनी ९४२२१८०४५१
E-mail : l_narendra2001@yahoo.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: