६ जानेवारी, २०११

गझलयात्री श्रीकृष्ण राऊत : वसंत केशव पाटील


श्रीकृष्ण राऊत हे कथाकार, कवी, एकांकिकाकार आणि मुख्यत्वे उत्तम गझलकार म्हणून सुपरिचित आहेत. गझल हा काव्यप्रकार अभिव्यक्तीचा व शिल्परचनेचा एक शिस्तबद्ध प्रवास आहे, त्यामुळे आपल्या कवित्वाचा कस सिद्ध केलेल्या कोणाही कवीला तो हाताळणे तसे सहज सोपे नसते, ही गोष्ट अनेकदा प्रमाणित झाली आहे. म्हणूनच शुद्ध कविता आणि गझल अशा दोन्ही प्रांतांमध्ये श्रीकृष्ण राऊत आपल्या प्रतिभेच्या प्रसन्न असा प्रत्यय देतात, ही बाब विशेषत्वाने अधोरेखित करण्यासारखी आहे.
’गुलाल आणि इतर गझला’ हा राऊतांचा गझल-संग्रह १९८९ चा. सुरेश भटांनंतरच्या पिढीतील बिनीचे गझलकार म्हणून त्यांचे स्थान उल्लेखनीय आहे. हे निर्विवाद. ’प्रेम’ हे गझलेचे प्राणतत्त्व असले तरी राऊत त्यालाच कवटाळून बसले नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीयादी क्षेत्रांतील वास्तवामधली विसंगती व विषमता, अन्याय-अत्याचार नि वैर-विरोध अशा विविध गोष्टींचा गझलेच्या माध्यमातून ते धारदार आविष्कारही करताना दिसतात. त्यांची रचना निर्दोष नि गोळीबंद आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे ते आपल्या अनुभवाचे अनुभूतीमधे संपूर्ण संक्रमण होईतो अभिव्यक्तीच्या मागे लागत नाहीत आणि हा कलात्मक संयम हे त्यांचे खरे मर्मस्थान आहे.
राऊतच काय, पण कोणाही गझलकाराविषयी लिहिताना मोठी अडचण होते ती ही की गझलेत अनेक शेर असतात आणि त्यांचे आशय-विषयही पुन्हा वेगवेगळे असतात. एखाद्या कवितेत आद्योपांत असे अंतःसूत्र असते; तसे ते गझलेत नसते. प्रत्येक शेराचा पैस आणि प्रभाव, त्यातील प्रतिपाद्य आणि शेवटी त्याचा होणारा परिणाम संपृक्त असत नाही. असो.


यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचेकडून स्वीकारताना

रचना-शिल्पाच्या आणि प्रभावान्वितीच्या दृष्टीने राऊतांची गझल अतिशय प्रभावशाली व सफाईदार आहे. काही ठिकाणी ती loud किंवा rhetorical झाली आहे, पण अशा जागा तुलनेने खूप कमी आहेत. असो. आता, काही उदाहरणांच्या साक्षींनी राऊतांच्या गझलांचा आस्वाद घेणे उचित होईल.
जिंकून हारलो मी सारेच डाव तेथे;
निद्रिस्त प्राक्तनाचा जेथे निकाल होता. (गुलाल)
प्रस्तुत शेरामध्ये कवी नियतीने केलेल्या क्रूर चेष्टेला अगदी सहजतेने भिडतो आहे; तेही एकदम थेट.
अर्ध्यात संपलेल्या समजून घ्या कहाण्या;
मध्येच फाडलेल्या आहेत खूप गोष्टी. (निर्माल्य)
यातील सूचकता मोठीच मार्मिक आहे.
गर्भार दूर हेले, गोठ्यात वांझ गाई;
चालेल दूध गेले, शाबूत ताक ठेवा. (शिकार)
सध्याच्या विपरीत वास्तवावर केलेली ही व्यंगात्मक मल्लिनाथी अंतर्मुख करणारी आहे. अस्सल कवीच्या शब्दांची ही उपहासात्मक, बोचरी धार अत्यंत उत्कट आहे. असाच आणखी एक शेर ’बियाणे’ या गझलेत आहे-
आहे तसाच आणा काळा चहा गडे हो;
येथील दूध सारे बोके पिऊन गेले.
सदर शेरातील अर्थाशयाची संप्रेषणीयता खूपच पल्लेदार आहे.
भूक पत्रावळी चाटते रे पुन्हा;
थुंक तोंडातला घास नाही खरा.(घास)
या शेरातील विदारकता काळजाला कशी आरपार भेदून जाते, हे वेगळे सांगावे लागत नाही.
जे मान्य पावले ते संपूर्ण सत्य नाही;
बाहेर येत आहे त्यातील पोल काही (तोल)
तोंडास काय टाळे लावून बैसला तू;
सोसू नको मुक्याने तू आज बोल काही. (तोल)
सौंदर्य आपले ती सांभाळते असे की;
नाहीच लेकराला पाजीत माय आता. (अंदाज)
यातील वास्तव सर्वज्ञात आहे, म्हणूनच कवीचा रोखठोकपणा विशेष भावस्पर्शी वाटतो.
स्पर्शात मोर आले, अंगांग फूल झाले;
नाजूक पाकळ्यांचा फुलतो हळू पिसारा. (रासलीला)
राऊतांच्या अनेक शेरांपैकी मला सर्वाधिक आवडलेला हा शेर आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. प्रणयातील सहजोस्फूर्त साकारली आहे, ते पाहण्यासारखे आहे. सवंगतेच्या लवलेशही इथे नाही. त्यामुळे कवीचे खरे ’कूळ’ नि त्याची कुलीनता आपसूकच अधोरेखीत होते.
नाहीत शिष्य भोळे ते एकलव्य आता;
द्रोणास शक्य नाही शास्त्रोक्त भव्य डाका. (पहाट)
हा हमखास टाळ्या घेणारा शेर आहे, हे खरेच. पण ’भव्य’ या शब्दाचे इथे तसे काहीच प्रयोजन नाही. त्याऐवजी वेगळा समर्पक शब्द योजायला हवा होता.
दुःख माझे देव झाले; शब्द झाले प्रार्थना;
आरती जी गात आहे तीच माझी वेदना (दिंडी)
हा शेर असाच मनात रुतून बसणारा आहे.
दुःख माझे एक राधा, एक मीरा आणखी;
व्याकुळांच्या गोकुळी मी करु कशाची वंचना? (दिंडी)
हे दुःख झेलताना झाले विराट इतका;
पृथ्वीस तोलतो मी आता खुशाल हाती (वसा)
या शेरातील तत्त्वचिंतनांची धार थेट तुकारामाची आठवण करून देते.
फाटून नष्ट झाला मागे कधीच झेंडा;
हा उंच भीकमाग्या नुसताच हात आहे. (झेंडा)
प्रस्तुत शेरातील आवेश खासच मननीय आहे.
जी जाळते मला ती माझीच आहे;
आता कवेत घेणे कवितेस भाग आहे. (डाग)
सर्जनातील दाहकता आणि निर्मिती-प्रक्रियेतील पेच सहजपणे उलगडणारा हा शेर साधाच पण अर्थपूर्ण आहे. यातील शृंगारिक छटाही धिटाईची आहे.
होता जहाल मागे केव्हा तरी विषारी;
तो दंतहीन सध्या पाळीव नाग आहे (डाग)
यातील अर्थाशयाचा डंख नि तिरकसपणा चांगलाच जहाल आहे. सध्याच्या स्वार्थी राजकारणावरील हे नेमके भाष्य नि त्यातील पोटतिडीक न लपणारी आहे.
जनतेस भाकरीने खाऊन टाकले;
खुर्चीत खात आहे पण केक भामटा. (भामटा)
सेतू तसा नवा पण हा कोसळेल केव्हा-
याचा अचूक, पक्का बांधा कसाय राजे. (शुभेच्छा)
या दोन्ही शेरांमध्ये कवीची समकालीन जाणीव फार मोठ्या ताकदीने प्रगटली आहे.
आता, खर्‍याखुर्‍या कलंदराच्या जगण्याची नेमकी कुंडली मांडणारा खालील शेर किती मार्मिक आहे, हे पाहण्यासारखे आहे-
जन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे;
एक प्याला अंगुराचा; एक ही साली गझल. (खंत)
भरल्या पोटी उपदेशाचे डोस देणा‍‍‍‍र्या.कडून जगण्याची कोडी सुटत नाहीत, हा रोखठोक संदेश देणारा खालील शेर मोठाच लक्षणीय आहे-
आत्महत्त्या पाप आहे खूप झाले सांगणे;
पोट भरल्या चोचल्यांचे खूप झाले सांगणे. (आत्महत्त्या)
प्रणयामधील लाजरेपणा आणि आढेवेढे यांवर कवी केवढ्या नजाकतीने उपाय सुचवितो, ते पाहण्यासारखे आहे-
लाजते फार कोजागरी;
तो दिवा मालवा शेवटी.(शेवटी)
असेच आणखी एक झकास उदाहरण-
बोलण्याचा पुरे गोडवा;
ओठ कर आपले गोड तू. (भिंत)
सध्याच्या व्यवहार-व्यापारातील एक निर्विवाद असे विदारक सत्य सांगताना राऊत सहजपणे लिहून जातात.
त्यांचा बुडेल धंदा विकती न जे स्वतःला;
तोट्यात चालणारे माझे दुकान नाही. (दुकान)
अशा कितीतरी उदाहरणांतून राऊतांच्या गझलेचा प्रदेश आणि भावार्थाची भूमी केवढी प्रमाथी तसेच प्रभावी आहे, हे वेगळे सांगावे लागत नाही. शेवटी, एक गोष्ट आवर्जून नोंदवावीशी वाटते. ती म्हणजे राऊतांच्या गझलांमध्ये ठायीठायी अन्याय-अत्याचाराविषयीचा जो आकांत आला आहे, त्याबद्दल. ही काही कवीची स्वतःची एकट्याची व्यक्तिगत कैफियत आहे असे न समजता, तो व्यापक जनसमूहाचा पुकार आहे, हे ध्यानात घेतले की कवीच्या अनुभूतीचा आसमंत किती अपार आहे. हेच मनावर ठसते. हा गझलयात्री आजही नवनव्या गोष्टींना स्वागतशीलपणे भिडतो आहे, हे प्रसादचिन्ह मला फार मोलाचे वाटते.
__________________________________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: