९ ऑक्टोबर, २०११

क्रांति : दोन गझला







१.



काफिला



काफिला लागला किनाऱ्याला


वादळाच्या भिडून माऱ्याला



ओघळू दे, खुशाल सांडू दे


सोड, बांधू नकोस पाऱ्याला



आसरा दे, न दे, तुझी मर्जी


थांबले मी तुझ्या सहाऱ्याला



झेप घे उंच, ठेव हे ध्यानी

एक घरटे हवे उबाऱ्याला



दैव घेते कशी परिक्षा ही,


घेरते का तुझ्याच ताऱ्याला?



चूक होती तुझ्या बटांचीही,


बोल लावू नकोस वाऱ्याला!



२.



बनाव



जुने सवंगडी तरी नवीन डाव रंगला


नवी विटी, जुनेच राज्य, बेबनाव रंगला



न मंदिरात राहिला, न भव्य मंडपामध्ये


प्रभू तिथे, जिथे खरा मनात भाव रंगला



कधी न उत्सवात अन्य रंग सांडले इथे,


रुधीररंग खेळण्यात नित्य गाव रंगला



सुकेल आज ना उद्या, म्हणून पाहिले न मी


टपोरते कळी तसा फिरून घाव रंगला



असेल चूक एवढी, तिथेच तो विसावला


विघातकी कृतींमध्ये जिथे जमाव रंगला



कधीच तू न जाणले तुझ्याच काळजामध्ये


तुझ्याविरुद्ध केवढा छुपा बनाव रंगला!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: