९ ऑक्टोबर, २०११

मनीषा साधू : अकरा गझला






१.




रोज रोज मज हवेत भास का तुझे


सांग ना तरंगतात श्वास का तुझे।



बोललो कुठे अनंत काळ लोटला


अजुनही कणाकणात भास का तुझे।



सांग काय माखलेस पाकळीस तू


जाळती मरंदही फुलास का तुझे।



येऊनी समोर आज मौन तू जरी


बोलतात शब्द शब्द श्वास का तुझे।



लावता सुगंध तूच घेरतो मला


गंधही दिलेस अत्तरास का तुझे।



ओढतो मिठीत, लाज;लाज वाटते


कल्पनेतही खट्याळ भास का तुझे।





२.





तिने पाहिले? पाहू दे!


नको म्हणाली? राहू दे!



विनाकारणे फुलारली?


गाते म्हटली? गाऊ दे!



कशास धावत जातो रे?


विरह तिलाही, साहू दे!



उधाण आले दोहिकडे?


आटपत नाही? वाहू दे!



जात-पात ये सब झूठ है!


येते म्हणते? बाहू दे!





३.





इथे अनंत घाव मी जपून ठेवले


प्रचंड आज दाह मी जपून ठेवले!



विखुरलेस चांदणे इथे तिथे तुझे


कितीक चंद्र हाय मी जपून ठेवले।



मागतेस काय आज मागची फुले


तसे कुठे गं काय मी जपून ठेवले?



काल तू जिथे हळूच ओठ टेकले


अर्धचंद्र लाल मी जपून ठेवले।



आपुलेच यार दोस्त भेटले तरी


मैफलीत पाय मी जपून ठेवले।



काय व्यर्थ वाटतसे प्रीत ही अता?


हाय रे! कुणास मी जपून ठेवले!



झेलले कितीक कष्ट काल मायने


खरखरीत हात मी जपून ठेवले!



पोचतो कधी मधी स्वत:स भेटण्या


मनात एक गाव मी जपून ठेवले!





४.




आलीस पावसाची भिजवीत पावसाला


ग्लानीत भर दुपारी जाळीत पावसाला।



भर पावसात पडले; ऊन कोवळे जरासे


आले जसे किरण हे, माळीत पावसाला।



पदरात झाकले तू लावण्य मुक्त जैसे


हळुवारश्या रुपेरी कल्हईत पावसाला।



घोटात राख वाटा तू कोरड्या गळ्यांचा


कवितेत काय बसला पोशीत पावसाला।



चिक्कार झाली शहरे, चिक्कार मेली झाडे


प्रगतीस ओघ आला,विझवीत पावसाला।



थंडी गुलाब झाली; भिजला दवात वारा


चल ये मिटून घेऊ; दुलईत पावसाला।



है हिम्मते खुदा तो’, पिकवून दाव बागा


वाचीत काय बसला राशीत पावसाला।





५.






चंद्र तारे ये म्हणाले


पोर्णिमेला ’ने’ म्हणाले



काळजाने काळजाला


द्यायचे जे; ’दे!’ म्हणाले



डुंबणाऱ्या पाखरांचे


रंग सारे; ’घे म्हणाले



मी दवाचे थेंब होता


फुल होवुनी ;’ये’ म्हणाले



हे हृदय की ते हृदय


कोण कोणा; ’ने’ म्हणाले?




६.





मिठीत येते,रंग मिसळते, म्हणते नाही


हात लावता,डोळे मिटते,म्हणते नाही।



नकोच म्हणते शब्द तुझे रे तू असतांना


गीत चोरते, वर गुनगुणते,म्हणते नाही।



विरह कधी जर नशिबी आला म्हणाय जाता


ओठावरती बोट ठेवते, म्हणते नाही।



कैक ऋतुंची तहान घेऊन कुशीत शिरतो


मायेने ती मनास भरते, म्हणते नाही।



तिला म्हणावे थांब जरा तर,’उशीर झाला!


उगा फुकाची ऐट दावते, म्हणते नाही।



निरोप घेतो,तिजला म्हणतो,’रडू नको गे’


हसून रडते,डोळे पुसते, म्हणते ’नाही!’





७.





आटुनी गेले जिव्हाळे,जाग आली


कातडीवर आळ आले, जाग आली!



वास्तवाशी तह नव्याने आज केला


आणि पुन्हा युद्ध झाले ,जाग आली।



वाटले मज तू कुणी नाही निराळा


पण तुझे सारे निराळे! जाग आली!



का नव्याने शोधिली कृष्णात भक्ती


का मिरेचे विष प्याले, जाग आली।



भावनेच्या मखमली गुंगीत जाता


स्वप्न कासाविस झाले, जाग आली।



आठवांनी खरवडे जखमा पुराण्या


तरुण सारे घाव झाले, जाग आली।



मी तुला मझ्यातुनी ’चल जा!’म्हणाले


आणि माझे प्रेत झाले, जाग आली।




८.




तुझ्या आठवांना क्षणी ना विसावे


कसे सांग माझ्या मना आवरावे।



तुझे श्वास नसता इथे आस पास


दिव्याने असे वांझ का फडफडावे?



पुन्हा कात टाकोनी आली नव्याने


नव्या या शरीरी तुला गोंदवावे।



सख्या सांग झाला गुन्हा कोणता रे


तुझे मौन आता कसे साहवावे।



कुठे मागते मी सुखातील वाटा


तुझ्या आतले फक्त तू घाव द्यावे।





९.





स्मार्ट झाली आसवे दु:खातही नाही गळत


कोणिही मागे कुणाच्याही फुका नाही पळत।



दौलतीचे बोल आहे छान सारे वाटते


एरवी सांगा कुणाला वावगे नाही कळत?



रात सारी त्या छळछावणीत आम्ही काढली


आणि ते म्हणतात जन्नत काफिरा नाही कळत!



मी म्हणाले थांब आणि थांबला की काय तू?


काय पुन्हा पेटण्या इतुकाही तू नाही जळत?



कातडीचा रोब सारा कातडीचा सोहळा


गळुन जाती माणसे पण कातडी नाही गळत!



आज का बरे वाटली बेकैफ वा मग्रूरशी


की तुला रे मी कालच्या सारखी नाही कळत?



काय मी सांगू नको’राखेस फुंकर घालु तू’


कालची ती तीच दु:खे मी कुठे नाही दळत?






१०.





दुखले किती मनाला,सांगू कसे कुणाला?


कल्लोळ भावनांचे,बांधू कसे कुणाला।



अंदाज यातनांचे होते कुठे तसेही


चुकले म्हणून आता सांगू कसे कुणाला।



ते देखणे सरोवर तडकून काल गेले


शकले हजार झाली,सांधू कसे कुणाला।



वाटेत धोंड बनूनी असली उभी तरीही


माझीच माणसे ती लांघू कसे कुणाला?



दुर्वास भोवताली दररोज ही परीक्षा


शित एक संयमाचा रांधू कसे कुणाला।





११.





कशाला पुन्हा वेगळाला हवा


तुलाही थवा अन मलाही थवा?



चला घेऊया ग्लास भरुनी पुन्हा


तुलाही दवा! अन मलाही दवा!



तुझे गीत म्हणजे जसा सापळा


तुलाही हवा अन मलाही हवा!



कसा काय हा उभ्याने शहारा?


तुलाही नवा? अन मलाही नवा?



चल लाच घे अन कंत्राट दे रे!


तुलाही खवा! अन मलाही खवा!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: