८ ऑक्टोबर, २०११

डॉ.कैलास गायकवाड : सात गझला





१.



कुणाशी बोललो नाही कधी संवादण्यासाठी


अताशा ढोल वाजवतो जरासा गाजण्यासाठी



फ़ुकाचा शोधतो कागद,जिणे संपून गेल्यावर,


पुन्हा आलेख जगण्याचे ,नव्याने आखण्यासाठी



प्रकाशाने गरीबी जाहली उघडी, बघावे का


जरा जाळून सूर्याला,पुन्हा अंधारण्यासाठी?



सदा लाथाडले आहे जगाने दु:ख देऊनी


कधी भेटेल संधी हे जगत झिडकारण्यासाठी



नियम पाळून कोणीही कुठे जिंकायचा नाही


जगाचे कायदे पाळू,सुखाने हारण्यासाठी



जगाने जाणली ”कैलास”ची नुकतीच श्रीमंती


जरासा संकुचित झालो ,इथे विस्तारण्यासाठी



२.




संशया करु नकोस आक्रमण


मी तुझा,तुझा असेन आमरण



सांगतो मनास, ”विसरलो तुला”


हीच तर तुझी मुळात आठवण



फ़ुंकणे,पिणे असभ्य वाटले


आजकाल हेच सभ्य आचरण



हासण्यास माझिया फसू नका


हासणे मुखावरील आवरण



बोलवे कुणी,तिथे न जायचो


पोचलो तिथे,जिथे न आवतण.



३.




आज जाहले तुझे मनात नूतनीकरण


तीच ती जखम जुनीच्,तेच ते अनावरण



लाख फाडशील पत्र्,खोडशील ओळही


आठवेल तोच शब्द्,आठवेल ''अवतरण''



वाचलेस पत्र वापरुन चाळिशी जरी


मी कसा दिसेन जर तपासशील व्याकरण?



वीज्,नोकरी,निवास्,रोजगार्,भाकरी


त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण



व्यक्तिमत्व अन स्वभाव ,जाणण्या चुकू नका


रावणाकडून जाहलेच जानकीहरण



दाद वाहवा मिळे सुमार शायरीसही


आपलेच लोक आपलेच सादरीकरण.



४.




प्रेमभावना न रोखली कधी मनात मी


सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी



बांधला महाल मी तुला सुखात ठेवण्या


घर कधी करेन गे तुझ्याच काळजात मी?



साथ लाभता तुझी,कसे तरूण वाटते


केस पांढरे तरी अजून यौवनात मी



मीच येत राहिलो नि मीच जात राहिलो


तू न भेटलीस शोधले कणाकणात मी



घेवुनी हजार मुखवटे जगायचे इथे


का स्वतःस शोधतो उगाच आरशात मी?



जीवनात पोकळी, तुझ्या उपस्थितीविना


जिंदगी भरीव ''त्वा'' मुळे,तुझ्या ऋणात मी



काळ-वेळ विसरलोय गुंतुनी तुझ्यात की,


लख्ख कोरडा असेन ऐन श्रावणात मी



लाख लोक मानती,मला अधार आपुला


शोधतो सदा तुझा अधार संकटात मी



५.




एक ओठी,एक पोटी,जाणल्यागत वाटते


हात ते फैलावणे,आता न स्वागत वाटते



गोड वाणी मागचे अनुभव कडू आल्यावरी,


बोलणे सामोपचाराचे ''कलागत'' वाटते.



दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,


(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )



सावली माझी मला मोठी दिसाया लागली


जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते



भांडला ''कैलास'' इतुका कडकडा सार्‍यांसवे,


मूक माझे राहणेही भांडल्यागत वाटते.



६.




वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,


दु:ख साचलेय आत भरभरुन



झाकले उघड कसे करायचे?


ठेवले बरेच आज आवरुन



जिंकली असंख्य सौख्यसाधने


डाव जीवनात सारखे हरुन



धूम अश्व दौडतो मनातला


मी तसाच बांधतो पुन्हा धरुन



पोहणे न ज्ञात जाहले मला


जीवनात मी तरी असे तरुन



शुष्क भावना......... तरी तुझ्या सवे,


घाम का फुटे उगाच दरदरुन?



गंध काय आज जाणले जरी,


दु:ख जाहले फुलास कुस्करुन



काळ यायची अवेळ जाहली


वाट पाहतो स्वतःस सावरुन







चेहर्‍याची चांगली ही रीत नाही


अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही



साहिल्या इतक्या झळा या जीवनाच्या


हाय ! आता आगही जाळीत नाही



वाटण्या आलो जगाला मोद किंतू


सौख्य इतुके माझिया झोळीत नाही



चालतो मी आजही नाकासमोरी


पण इथे रस्ते सरळ ओळीत नाही



सौख्य अज्ञाना मधे ही गोष्ट सच्ची


का तुला ”कैलास” हे माहीत नाही?



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: