८ ऑक्टोबर, २०११

सुधीर मुळीक : पाच गझला











१.



शब्द माझे ऎकताना, त्रास होतो माणसांना


वाटले मी श्वास माझे, फाटलेल्या कागदांना !



एक वेडा रोज लिहितो, साठलेले तेच गाणे


दाटलेल्या पापण्यांनी, लेखणीच्या वेदनांना.



सूर माझे ताल माझे, ओठ माझे बोल माझे


एक टाळी दे तुझीही, घे समेवर हुंदक्यांना !



ऐकताना मारवा हा, का तुझा मल्हार झाला ?


सावरा आता सुरांनो, आवरा त्या पापण्यांना.



खोल होते दुःख माझे, मोजताना तोल गेला


दोर केला आसवांचा, पार केले आठवांना.



आज या गझलेत माझ्या, पूर आले आसवांचे


घाव ओले भाव ओले, ऊर आले अक्षरांना.



काल होती बाग माझी, आज मी 'निवडुंग' झालो


पेरले काटे कुणी हे, काय सांगू कुंपणांना ?




२.



लिहिले अभंग ज्याने, का तोच संत होतो ?


गझले तुझ्यात माझा, अश्रू जिवंत होतो !



दे रोज पानगळती नाही कधी म्हणालो ?


गळण्यात खंत त्यांना माझा वसंत होतो.



तो एक रंग होता रक्तात लाल त्यांच्या


हिरव्यात मौलवी का भगवा महंत होतो ?



दे तारखा मला तू मोजून सांग वेळा


तू सांग ना तुला मी केव्हां पसंत होतो ?



कोणा उसंत नाही असता जिवंत कोणी


प्रत्येक माणसाचा पुतळा दिगंत होतो ?



मी मागता न काही मज ह्या व्यथा मिळाल्या


मज खेद खंत नाही मी भाग्यवंत होतो.



अपराध लोकहो ते झाले अनंत माझे


'निवडुंग' हा मवाली गझलेत संत होतो.




३.





अशीच माळ तू मला फ़ुलेन मी हळू हळू


तुझ्या मनात एकदा रूजेन मी हळू हळू !



पळू नको उगाच तू, छळेन का तुला कधी ?


मिठीत ये कळेन मी, जमेन मी हळू हळू !



कुशीत रात्र थांबली दिवा नकोस मालवू


तुझ्याच दे विजा मला विझेन मी हळू हळू



उगाच माळ मोगरा, उगाच मृगजळी तर्‍हा


असाच लाव पिंजरा, फसेन मी हळू हळू !



असेच ओठ दे तुझे असाच घोट घोट घे


नसा नसात वाहता चढेन मी हळू हळू !



अखंड रान सांगते, तुझेच पान पान हे


हळूच वाच तू मला, सरेन मी हळू हळू !



मला खरेच पारखा, बघा असेन आरसा


तुला तुझ्याच सारखा दिसेन मी हळू हळू !



उगाच काळजात मी, तुझ्या सखे अजूनही


अशीच खोड तू मला, मिटेन मी हळू हळू !




४.





मी आभाळावर लिहिले पाण्यावर लिहिले नाही;


लिहिताना या मातीवर दगडावर लिहिले नाही !



वेडे कागद भिजून गेले का लिहिले मी रडगाणे


या हसण्या-या दुनियेवर झाडावर लिहिले नाही !



पाषाणावर पुजणा-या सांगा मी काय लिहावे ?


त्या चौकातिल कुजणा-या पुतळ्यावर लिहिले नाही !




लढता लढता हरलो मी हा दोष कुणाचा होता ?


मी नियतीवर लिहिताना कर्मावर लिहिले नाही.



अंगण कुंपण दर्पण सा-या घर-दारावर लिहिले


आईवर लिहिले पण मी बापावर लिहिले नाही ?



हिरव्या भगव्या रंगांनी झाला सारा देश खुळा


देशावर लिहिले इथल्या धर्मावर लिहिले नाही .



ते झळकत जाती फोटो वापर होतो रस्त्यांचा


बॅनरने सांगा कुठल्या नेत्यावर लिहिले नाही ?



त्या आभाळी का वसतो तो बहिरा देव जगाचा ?


या नरकावर लिहिले त्या स्वर्गावर लिहिले नाही



मी पेनाच्या शाईवर पेनावर लिहिले होते


हे लिहिणा-या माझ्या या हातावर लिहिले नाही !



लिहिण्यासाठी लिहित गेलो हे आयूष्याचे गाणे


ते हिशोब पैशांचे मी नोटांवर लिहिले नाही



मी खोल तळाशी गेलो लाटेवर तरलो नाही


मी पार बुडालो गझले काठावर लिहिले नाही




५.



बुडालो मी असा तरलोच नाही


असा सरलो पुन्हा उरलोच नाही.



तुला ना फ़ायदा उरण्यात माझ्या


असाही मी तुला पुरलोच नाही.



कितीदा तोलतो काळीज माझे


तिच्या वजनात मी भरलोच नाही.



लढाया जिंकण्या आधी बढाया


खरे हे युद्ध मी हरलोच नाही.



नकाशे पाहिले डोळे भरून मी


दिशांनी त्या कधी फिरलोच नाही.



खुला बाजार हा झालो जगाचा


तुझा आजार बघ ठरलोच नाही.



असा त्या कुंतलांनी वार केला


पुन्हा गुंत्यात मी शिरलोच नाही.



नको तू उगाळू 'निवडुंग' आता


किती झुरलो तरी झरलोच नाही.



sudhirkavyalay@gmail.com

https://mail.google.com/mail/images/cleardot.gif

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: