फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर?
दानही करशील तू, पण मी असा आहे कलंदर.
आपल्या कलंदरपणाची प्रांजळ कबुली देणारे कविश्रेष्ठ सुरेश भट ! उषःकाल होता, होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशालीङ्ख अशा शब्दांनी निद्रीस्त समाजमनाला चेतविणारे, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधीके जरा जपून जा तुझ्या घरीङ्ख हा नटखट भाव व्यक्त करणारे, मालवून टाक दीप चेतवून अंग अंग, मेंदीच्या पानावर.....ङ्ख ही मलमली आणि नादमधुर गीते लिहिणार्या सुरेश भटांनी आपल्या काव्याने संपूर्ण मराठी मनाला मोहिनी घातली. जवळपास पाच दशके ते मराठी मनावर अधिराज्य करीत आहेत. सात दशकांच्या त्यांच्या जीवन प्रवासात आयुष्याचे अनेक रंग पाहत रंग माझा वेगळाङ्ख सांगणार्या भटांच्या व्यक्त्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. प्रतिभासंपन्न कवी, जिंदादिल मित्र, बेधडक व्यक्ती आणि आपल्याच कैफात जगणारी ती वल्ली होती.
डॉ. श्रीधर भट यांच्या सुखवस्तु कुटुंबात सुरेश भटांचा जन्म झाला. वडील फॉरेन रीटर्न डॉक्टर, आई स्व. शांताबाई या त्या काळातल्या पुणेरी पदवीधर! अशी प्रतिष्ठित कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या घरात कवी सुरेश भट हे तसे मिसफिटच व्यक्त्तिमत्व होते. कारण त्यांच्या प्रतिष्ठेच्या चौकटी वेगळ्या आणि या मुशाफिराची जिंदादिली वेगळीच. त्यामुळे घराशी फारकत घेऊन -
आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे!
चालू दे वक्षांत माझ्या वादळांचे येरझारे!
हा दुर्दम्य आत्मविश्वास बाळगून, या कलंदराने आपल्याच नव्या वाटा निर्माण केल्या. अमरावतीच्या रस्त्यावरुन आपल्याच धुंदीत अनवाणी पायाने फिरणारा हा प्रतिभासंपन्न कवी अमरावतीच्या राजकमल चौकाने, खापर्डे बगीच्यातील ढवळे पाटलांच्या बंगल्याने पुरेपूर अनुभवला. स्व. अरविंद ढवळे, डॉ. मोतीलाल राठी, स्व. वली सिद्दीकी, डॉ. विजय मोवाडकर, स्व. दादा इंगळे, स्व. राम शेवाळकर, रामदासभाई श्रॉफ, बालकिसन चांडक, स्व. भीकमचंद भुतडा, यशवंतराव खापर्डे, प्राचार्य अण्णासाहेब वै, बबनराव मेटकर, वामन तेलंग यासारख्या मित्रांनी हा कवी आपल्या अंतःकरणाच्या कुपीत जपला आणि संबंध महाराष्ट्राला दिला. स्व. अरविंद ढवळे, स्व. वली सिद्दीकी, स्व. दादा इंगळे या मित्रांनी पार्यासारखी अस्थिर आणि पसरट सुरेश भट ही व्यक्ती त्यांच्या प्रचलित दोषांसह आणि कवित्त्वाच्या अलौकिक गुणांसह स्वीकारली होती.
अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिकत असतांना सुरेश भट विार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा एक दरारा होता. विद्यार्थ्यांचा घोळका आणि सुरेश भट असे समीकरणच होते. कारण वर्गखोलीत बसणे त्यांच्या सिलॅबसमध्येच नव्हते आणि दुसरे म्हणजे कॉलेजच्या परिसरातील झाडाखाली झडणारी त्यांची इन्स्टंट कवितांची मैफिल. मराठी वाङ्मय मंडळाचे ते अध्यक्ष होते. वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात त्यांचे सवाल जवाब चालायचे. त्या काळात अमरावती शहरात खाजगी मथुरादास बस सर्व्हिस होती. कॉलेजची मुले-मुली या बसने जायचे-यायचे. एकदा पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाशात काळे ढग भरून आले होते. बसमध्ये मुली बसल्या होत्या. भटांच्या भोवती मित्रांचा घोळका. मुलिंकडे पाहून मित्रांनी कवीवर्याच्या कवित्त्वालाच आव्हान दिले.
खरा कवी असशील, तर या सिच्युएशनवर कविता करून दाखव ! आणि -
काळ्या, काळ्या मेघांमधुनी ऐसी चमकली बिजली,
जशी काळ्या केसांमधुनी पाठ तुझी मज गोरी दिसली !
ही कविता अवतीर्ण झाली आणि बसमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. या मनोरंजक आणि तात्काळ सेवेसारख्या तात्काळ कविता करतांनाच -
हरवले आयुष्य माझे राहिले हे भास
झगमगे शून्यात माझी आंधळी आरास
व्यर्थ हा रसरुपगंधाचा तुझा अभिसार
वेचूनि घे तू वार्यावरी माझे अभागी श्वास.
किंवा
पाठ दाखवून अशी दुःख कधी टळते का?
अन् डोळे मिटल्यावर दैव दूर पळते का?
दाण्याचे रडणे कधी या जात्याला कळते का?
असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणार्या दर्जेदार कवितांची आरासही ते लावीत असत. महाविालयीन जीवनापासून सुरू झालेली ही काव्याची आराधना त्यांनी आयुष्यभर सुरू ठेवली.
कवितेसाठी त्यांनी आपल्या जगण्याचे मोल चुकविले.
आयुष्यातील हाल-अपेष्टा, कुचंबणा यासह ते कवीता जगले, ती जगवली. अनेक नवोदित कवींना त्यांनी लिहिते केले. त्यांच्या कवितांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यांचे भरभरून कौतुक केले. प्रसंगी आपली कविता मागे ठेऊन त्यांच्या प्रसिद्धीसाठी शब्द टाकला. मनाचा मोठेपणा आणि वृत्तीचा दिलदारपणा दाखवणारा हा कवी जाणून घेतला पहिजे. भल्याभल्यांना हे जमत नाही.
सहज, सोप्या, सुंदर काव्यरचना करणार्या या कवीवर रसिकांनी आणि सामान्य माणसांनी भरभरून प्रेम केले. आपल्या काव्याचा श्रोता हा ‘व्हाईट कॉलर्ड’ असला पाहिजे असा अट्टाहास त्यांनी कधीही बाळगला नाही. उलट साध्या-साध्या माणसांना त्यांनी आपले मानले. त्यांना कवीता ऐकविल्या,
साधीसुधी ही माणसे
माझ्या कवीत्त्वाची धनी
यांच्यात मी पाही तुका
यांच्यात नामयाची जनी.
असेच ते म्हणत. अमरावतीच्या राजकमल, रेल्वे स्टेशन चौकातील दुकानांचे कट्टे हे त्यांचे रात्रीही सुरू असणारे ऑफिस होते आणि रिक्षेवाल्यांपासून तो कारवाल्यापर्यंत सर्वांचे हक्काचे व्यासपीठ. १९८० साली अमरावतीला रंग माझा वेगळाङ्ख हा कार्यक्रम साहित्य संगमङ्खने आयोजित केला होता. स्व. अरविंद ढवळे, डॉ. मोतीलाल राठी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन झाले. आम्ही अकरावी, बारावीतील पोरसवदा वयाची मुले तिकिट फाडण्यापासून तो सतरंज्या टाकेपर्यंतच्या कामात आघाडीवर होतो. प्रा. नरेशचंद्र काठोळे आमचे गटप्रमुख होते. हा कार्यक्रम म्हणजे काव्य गायनाच्या क्षेत्रातील कार्यक्रमांचा एक मानदंडच होता. कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन, प्रसिद्धी, मांडणी, आयोजकांची तळमळ सारेच दृष्ट लागण्यासारखे होते. कार्यक्रमाची सर्व तिकीटे संपली. नगर वाचनालयाचे सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले. पाय ठेवायलाही जागा नव्हती. शेवटी, सभागृहाची दारे बंद करण्यात आली. पण, रसिकांची गर्दी कमी होत नव्हती. दोन-तीन महिला व चार-पाच माणसे असे एक मित्रांचे कुटुंब काही वेळाने आले. दारावरचा कार्यकर्ता त्यांना तिकीट नसल्याने आत जाऊ देईना. त्या प्रतिष्ठित माणसाने चक्क त्यावेळी भांडण केले. अरे तिकिटाची काय गोष्ट करता?ङ्ख शंभराचे दोनशे घ्या. पण, आमच्या आवडत्या कवीला आम्हाला ऐकू ा. नाहीतर, कार्यक्रम नेहरू मैदानात घ्या!ङ्ख रसिकांचे इतके उदंड आणि अस्सल प्रेम त्यांना लाभले. हे प्रेम फार थोड्यांच्या वाट्याला येते. सुरेश भटांच्या ते आले. कारण प्रत्येक सामान्य माणसाला त्यांच्या कवीतेत स्वतःच्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसते. हे दुःख, ही वेदना आपलीही आहे असे वाटते. कारण कुंथून-कुंथून कवीता त्यांनी कधी केल्या नाहीत. जे आतून आले तेच कागदावर उतरविले. त्यांनी अनेक रचना महिनोगणती अपूर्ण ठेवल्या.
साहित्यातील गटबाजीने म्हणण्यापेक्षा मठबाजीने साहित्याला उणेपणा आणला. साहित्यिकांच्या टोळ्यांनी स्वतःची लेबले तयार केली. प्रतवारीची सारी कंत्राटे वाटल्या गेली. भटांच्या काव्यालाही ही सोयीस्कर लेबले लावल्या गेली. जे कोणालाच, प्रत्यक्ष कविलाही आयुष्यभर कळत नाही ते साहित्य, काव्य दर्जेदार नि सामान्य माणसाच्या अंतःकरणाला जाऊन भिडणारे, विचारी माणसाला अंतर्मुख करणारे साहित्य हे दुय्यम ही मखलाशी आणि ढोंगबाजी केल्या गेली. खोट्या विद्वत्तेचा बुरखा पांघरून भट कधी कोणत्या ट्रांसमध्येङ्ख गेले नाहीत. लंडनच्या अल्बर्ट हॉलमधे कवीता पोहचल्यावर, सिनेमात आल्यावर किंवा मानमान्यता मिळाल्यावरही यशाने ते हुरळून गेले नाहीत. दुर्बोध शब्दांची कल्हई भटांनी आपल्या काव्याला केली नाही. त्यांनी सदैव सोप्या भाषेत काव्यनिर्मिती केली. सत्य व सोपे लिहिणे कठीण असते. भटांनी कोणत्याही मठाची कधीही तमा बाळगली नाही, त्यामुळे -
खुराड्यात रचती जे जे षंढ दंभगाथा;
का तयासं इंद्रायणी ही तारणार आहे?
मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या,
विठू काय बेमानांना पावणार आहे?
असे भविष्य भट वर्तवितात.
भट जगले ते आपल्या मिजाशीतच. स्व. अरविंद ढवळे यांनी सुरेश भट या आपल्या कविमित्राची प्रत्येक मिजास पूर्ण केली. ते उत्तमोत्तम कसे लिहितील, त्याला अनुकूल वातावरण कसे लाभेल, याचा त्यांनी प्रत्येकवेळी विचार केला. भटांना त्यांनी खूप सांभाळले. स्व. अरविंद ढवळेंचे घर म्हणजे भटांसाठी हक्काचे घर होते. श्रीमती मीनावहिनींनी अनेकदा रात्री बारा वाजताही स्वयंपाक करून त्यांना जेऊ घातले. भटांनी आपला काव्यसंग्रह या मित्राला अर्पण केला. अरविंद ढवळेंच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्यावर तो गात-गात गेलाङ्ख हा लेख लिहिला. तो त्यांचा अखेरचा लेखा ठरला. १५ मार्च, २००३ ला सुरेश भटांचे दुःखद निधन झाले. भटांच्या अंत्यसंस्काराची बातमी आणि स्व. अरविंद ढवळेंवरील लेख १६ मार्च, २००३ च्या लोकमत मध्ये एकाच दिवशी प्रसिद्ध झाले. दोस्ताना अजरामर झाला. एक दिवस रात्री दहा-साडे दहा वाजता ए देख अरविंद मुखडाङ्ख म्हणून भटांनी -
जय जन्मभू ! जय पुण्यभू !
जय स्वर्गभू सुखदायिनी !
जय धर्मभू! जय कर्मभू !
जय वीरभू जयशालिनी !
हा मुखडा लिहिलेला कागद दाखविला. त्यावर अरविंद ढवळे म्हणाले, व्वा सुरेश, मुखडा फारच जबरदस्त आहे. पण फक्त तू मुखडेच लिहिशील काय? कधी तर ते पूर्ण कर!ङ्घ हे म्हणजे भटांच्या प्रतिभेलाच आव्हान होते. तू मले काय समजत्ं बे! मी काय लिहू शकत नाही ? चल एक स्पेशल खोली, एक थर्मास चहा, तंबाखू-चुन्याची सोय कर अन् मग पाहाङ्ख
सर्व व्यवस्था झाली. अकरा वाजता त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि सकाळी साडे पाचला त्यांनी खोलीचे दार उघडले ते भारतमातेचे जयगानङ्ख घेऊनच. खोलीचे स्वरूप पालटले होते मात्र कवितेने आकार घेतला होता.
एकेक इथला कण म्हणे,
जय जय सचेत महानता।
हे गगनमंडल गुंजते,
जय एकता! जय एकता!
उसळून सागर गर्जतो,
जय भारतीय स्वतंत्रता!
अंधारल्या जगतामध्ये झळके तुझी सौदामिनी !
या अजरामर ओळी जन्माला आल्या. मराठी भाषेतील इतके सोपे, साधे व देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले भारतमातेचे जयगानङ्ख विरळेच म्हटले पाहिजे.
सुरेश भटांनी वृत्तपत्रात कॉलम लिहून ग लिखाण केले. त्यात त्यांनी समाजातल्या दंभावर आसूड ओढले. पण हे लिहित असतांना खबर्यांनीङ्ख दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे किंवा पूर्वग्रहदूषीत असल्यामुहे काही लोकांवर अन्यायही झाला. म्हणून मी त्यांना एकदा म्हटले, दादा, तुम्ही हे असे का लिहिता? त्यामुळे तुमच्या काव्यावर प्रेम करणारी माणसे दुखावतात. तुमच्याविषयीही गैरसमज निर्माण होतो?ङ्ख त्यावर एकदम उसळून ते म्हणाले, हा लालित्यपूर्ण सल्ला काही तू मले देऊ नको. माणसं मरून राह्यली अन् मी त्या सॉफिस्टीकेटेड साहित्यिकांसारखा चूप बसू काय? मला वाटेल ते मी लिहिणारच. मले कोणाची भीती नाही. आता मसनात गोवर्या गेल्यावर मी माहा स्वभाव बदलू शकत नाही.ङ्घ त्यावर काय बोलणार? पण, एक खरे की, कोणावर आपल्याकडून अन्याय झाला हे कळल्यावर ते अस्वस्थ व्हायचे. सुरेश भटांचे व्यक्तिमत्त्व स्फटीकासारखे आरपार होते. जे मनात-ते ओठात. कधीही त्यांनी कुणाची भिडमूर्वत ठेवली नाही. सारे कसे रोखठोक. त्यातून आपण कोणाला दुःखावत आहोत हे त्यांच्या गावीही नसायचे. अनेकदा एखादा निरागस मुलासारखे ते वागायचे. एका कार्यक्रमात दहा हजार रुपयाचे मानधन मिळ्यावर सहा हजाराचा फिलीप्सचा डबल डेकर टेपरेकॉर्डर घेतला आणि गादीत गुंडाळून तो आपल्या मित्रांना दाखवायला अमरावतीला आणला. ढवळेंच्या सुशांतला रेमंडचा सुट शिवून दिला. पैसे संपवले नी उधारी करून नागपूरला परतले.
हजरजबाबीपणा ही सुरेश भटांच्या व्यक्तीत्वाची खासीयत होती. आपला हिसाब किताबङ्ख तोंडावर करुनच ते मोकळे व्हायचे. त्यावेळी सुरेश भट दै. हिंदुस्थानङ्ख मध्ये काम करीत असत. जोशी मार्केटमधील रहाटगावकर पांडे लॉजच्या खाली दै. हिंदुस्थानङ्ख चे कार्यालय होते. रात्रपाळीत काम केल्यावर तिथेच प्रेसच्या बाहेर झोपण्याचा त्यांचा शिरस्ता होता. उन्हाळ्याचे दिवस होते. नेहमीप्रमाणे रात्रपाळी करून सुरेश भट प्रेसबाहेर खाट टाकून झोपले. सकाळी सात-साडेसातला झोपेतून उठत असतांना त्यांच्या परिचित एक महिला प्राध्यापिका रिक्षाने कॉलेजमध्ये जात होत्या. भटांना पाहून हिणवायच्या दृष्टीने त्या म्हणाल्या, काहो भट, तुम्ही, इथे झोपता?ङ्ख त्यावर कमरेवर हात ठेऊनङ्ख हो, मी इथेच झोपतो, तुम्ही कुठे झोपता?ङ्खअसे उत्तर देऊन त्यांनी हिसाब चुकता केला. बाईने पुढे भटांच्या झोपण्याकडे तर सोडाच पण प्रेसकडेही कधी वळून पाहिले नाही.
अमरावतीला आल्यावर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात अनेकदा त्यांचा मुक्काम असायचा. त्यावेळी त्या परिसराला दोन बॉस असत. एक प्रभाकरराव वै आणि दुसरे सुरेश भट ! कारण, कोणतेही काम कोणालाही सांगण्याची त्यांना मुभा असे. हव्याप्र मंडळाच्या परिसरात प्रभाकरराव वै बोलतात आणि बाकी सारे ऐकतात, असे चित्र. पण सुरेश भट असतांना भट बोलत आणि वै ऐकत, अशी स्थिती असे. ओ ऽऽऽ प्रभाकरङ्ख ही खेळाच्या शिट्टीपेक्षाही वरच्या पट्टीत येणारी हाक तिथे फक्त सुरेश भटच देऊ शकत.
महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा सुरेश भटांना आत्यंतिक अभिमान होता, लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी .......... एवढ्या जगात माय मानतो मराठीङ्ख या त्यांच्या कवीतेच्या ओळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा मंत्र ठरल्या होत्या. शाहीर अमरशेखांच्या खड्या आवाजात प्रचाराच्या फडात त्या गायल्या जात. स्वतः सुरेश भटांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तीन महिने तुरुंगवास भोगला याची अनेकांना कल्पना नसेल. गरीब आणि सामान्य माणसाची कणव त्यांच्या अंतःकरणात सदैव असायची. जात-पात, धर्म, भाषा या पलिकडे जाऊन त्यांचा आचार होता. जातीयतेच्या विपवल्लींनी माणूस पोखरला आहे. याची त्यांना सतत बोच असे. श्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना खूप आनंद झाला. दलित समाजातला एक रसिक माणूस मुख्यमंत्री झाला या आनंदात त्यांनी श्री सुशीलकुमारजींना कवीला लिहून पाठविली.
सांग मला दळणार्या जात्या जात कोणती माझी
झाले ज्यांचे पीठ मघा ते कुठले दाणे होते.
सुरेश भटांच्या दुःखद निधनानंतर सुरेश भट एक झंझावातङ्ख हे पुस्तक आम्ही सुरेश भट प्रतिष्ठानतर्फे अमरावतीत प्रसिद्ध केले. त्याचे प्रकाशन श्री सुशिलकुमारजींनी केले. त्यावेळी त्यांनी ह्या ओळी म्हणून दाखविल्या तेव्हा त्यांना हुंदका आवरता आला नाही. सुरेश भट नावाचा जिंदादील माणूस आणि प्रतिभावान कवी असा प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे.
सात दशकांच्या आयुष्याच्या प्रवासात हा कवी सप्तरंगी आयुष्य जगला. खिश्यात दमडी नव्हती तेव्हा रस्त्यांवरून अनवाणी फिरला. बरे दिवस आले तेव्हा मोटारीतूनही हिंडला. खिश्यात पैसे असतांना दहा-वीस लोकांना सोबत घेऊन खिलवले, तर पैसे नसतांना मित्रांकडून हक्काने खाल्ले. जाडा-भरडा पैजामा घातला तसा मखमलीचा शर्टही वापरला. पंचतारांकित ताजमहाल हॉटेलही पाहिले नी नानकरमच्या गाडीवर, पाटलीवर असून पाणीपुरीही खाल्ली. त्यांचे खाणे चवीचे आणि वागणे अस्ताव्यस्त मनस्वी कवीचे होते. सुख-दुःखाचे अनेक रंग त्यांनी अनुभवले. पण सामान्य माणूस, मराठी भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दैवतांशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. आपल्या भुवया विशिष्ट विभ्रमांसह उडवत, चष्म्याच्यावरून पाहत, गालावर खळी उमटवत जीवना तू तसा-मी असा!ङ्ख हे प्रांजळपणे सांगत-
मी चुका केल्या तरीही काय हे नाही पुरेसे
मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो,
जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो.
अशी आपल्या चुकांची जाहीर कबुलीही त्यांनी दिली. ही कबुली द्यायला सुरेश भटांचीच छाती लागते.
त्यांच्या खाण्यापेक्षाही त्यांच्या अंतरंगातील वेदना आणि त्यांचे जगणे समजून घेणे महत्वाचे आहे.
कारण सुरेशभट पुन्हा पुन्हा होत नसतो.
- डॉ. किशोर फुले
देवांगणङ्ख, योगीराज नगर, तपोवन,
अमरावती - ४४४ ६०२
भ्रमणध्वनी - ९४२३१२४६०८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा