९ ऑक्टोबर, २०११

गझलनवाज दिनेश अर्जुना : श्रीकृष्ण राऊत





परवा मुंबईच्या दैनिकात एक लेख वाचत होतो. ‘श्रद्धा इन दि नेम ऑफ गॉड’ ह्या हिन्दी चित्रपटाला संगीत देणार्‍या मराठी संगीतकाराविषयी तो लेख होता. आघाडीचे गायक कलावंत कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांना गाणं समजावून सांगताना तो मराठी तरुण संगीतकार फोटोत दिसत होता. मी स्वत:शीच म्हणालो, अरे, हा तर आपल्या अकोल्याचा दिनेश. शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी. आणि हे चक्क दाक्षिणात्य वाटावं असं नाव काय घेतलं त्यानं- दिनेश अर्जुना. मग लक्षात आलं याचं पूर्ण नाव दिनेश अर्जुन निंबाळकर. हल्ली मुक्काम मुंबई. जिना मरना संगीत के लिए अशी प्रतिज्ञा करून हा तरुण मुंबईत गेला. केवळ संगीताच्या भरवशावर पोट भरायचं ही त्याची जिद्द.


मुंबई कोणाला काहीही फुकट देत नाही. प्रत्येक कलावंताला संघर्ष अटळ. मग तो अमिताभ बच्चन असो की दिनेश अर्जुना. एक मात्र खरे की ज्यांची कला सच्ची असते आणि हिम्मत पक्की, अशा कुठल्याही कलावंताला; जिच्यावरुन मुंबई हे नाव पडलं ती मुंब्रा देवी उपाशी मरु देत नाही. हिन्दी सिनेमासारख्या मायावी दुनियेत आज दिनेश अर्जुना घट्ट पाय रोवून उभा आहे. उदित नारायण, कैलास खेर , रुपकुमार राठोड, विनोद राठोड, हरिहरण, सुखविंदरसिंग, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, श्रेया घोषाल, वसुंधरा दास, रिचा शर्मा, हरजित कौर, मधुश्री, हिमानी अशा प्रख्यात गायक कलावंतानी त्याच्या संगीत दिग्दर्शनात गाणी गायिली आहेत. दिलखुलासपणे त्याच्या चालींना वाखाणले आहे. ‘माय हजबण्डस्‌ वाईफ’ त्याने संगीत दिलेला दुसरा हिन्दी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. रवींद्र नाथ टागोराच्या कथेवर आधारित ‘अर्धांगिनी - एक अर्ध सत्य’ हा त्यानं संगीत दिलेला तिसरा हिन्दी सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. जयपूरच्या फिल्म फेस्टिवल करिता आणि फ्रान्सच्या कान्स फिल्म फेस्टिवलसाठी ‘श्रद्धा’ चित्रपटाची निवड झाली आहे. थोडक्यात काय की दिनेश अर्जुना अकोल्याचा झेंडा नुसता फ्रान्सच काय जगभर फडकविणार आहे. याचा आनंद व अभिमान अकोलेकर म्हणून आपण मिरवलाच पाहिजे.


दिनेश अर्जुनाच्या स्टोरीचा फ्लॅश बॅक असा - साधारणत:1983-84 तो काळ असेल. मी तेव्हा मोरेश्वर कॉलनीत राहत होतो. एक दिवस माझ्या घराचा शोध घेत एक कॉलेजकुमार आला. कॉलेजच्या वेगवेगळ्या भावगीत स्पर्धेतून हमखास पहिला नंबर पटकावणारा हा युवक माझ्या थोडाफार परिचयाचा होता. चहापाण्याची औपचारिकता झाल्यावर तो युवक म्हणाला, सर मला तुमची गझल द्या. मी कंपोझ करतो. मनात म्हटलं, अजून मिसरुड नीट फुटली नाही. हे पोरंग काय कंपोझ करणार ? कॅसेट-रेकॉर्ड ऐकून त्याप्रमाणे भावगीतं-सिनेमातली गाणी म्हणणं वेगळं आणि एखाद्या गझलला चाल लावणं वेगळं. पण त्याच्या डोळ्यात मला कमालीचा आत्मविश्वास दिसला. म्हटलं ठिक आहे. सध्याचा हा दोन ओळीचा एक मतला देतो. मला त्याची चाल ऐकव. मग पुढे पाहू. दुसर्‍याच दिवशी तो पोरगा चाल लावून ऐकवायला हजर. त्याला म्हणालो मला संगीतातलं फारसं काही कळत नाही. पण गेली अनेक वर्षे गझल गायन ऐकून माझा कान तयार झाला आहे. तुझी चाल गोड वाटते. गुणगुणाविशी वाटते. ही पूर्ण गझल घे. आण कंपोझ करून. त्यानं कंपोझ केलेली तीच माझी पाहिली गझल


तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली ;


अजूनही तशीच तू तनामनात राहिली.





तो कॉलेजकुमार म्हणजेच आजचा हिन्दी सिनेमाचा संगीतकार दिनेश अर्जुना. आज सत्तावीस वर्षानंतरही ती गझल दिनेश अर्जुनाच्या स्वरात ऐकली की माझी गझल मलाच प्रत्येकवेळी नवी वाटते.


गझल गायनासाठी लागणारा भारदस्त आवाज त्याला देवानं दिला आहे. गझल या काव्यप्रकाराची उत्तम जाण त्याला आहे. प्रत्येक भाषेचा मूळ लहेजा सांभाळत मराठी-हिंदी-उर्दूचे शुद्ध उच्चार करण्याची साधना त्यानं केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावगीत - गायन, गझल गायन आणि चित्रपट संगीत यातल्या सीमारेषा त्याला चांगल्या तर्‍हेने कळतात. त्याचं गझल गायन केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतल्या रसिकांनी जेव्हा ऐकलं तेव्हा त्याला गझलनवाझ दिनेश अर्जुना म्हणून सन्मानानं आपल्या ह्रदयसिंहासनावर विराजमान केलं आहे.


अकोल्यात असताना सुरुवातीला पं. एकनाथ पंत कुळकर्णी यांच्याकडे दिनेशने शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. तंबोरा विकत घेण्याची ऐपत नव्हती म्हणून तो हार्मोनियमवरच रिवाज करायचा. माझ्या मनाला ते खटकायचे. मी आमचे मित्र प्रा. सुरेश ठाकरे यांच्याकडे ते बोलून दाखविले. ठाकरे सर त्याकाळात विद्यार्थ्यांतल्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ज्ञानवर्धिनी’ ही संस्था चालवायचे. या संस्थेतर्फे दिनेशने चाली लावलेल्या माझ्या गझलांचा एक कार्यक्रम करण्याचे आम्ही ठरवले. खर्च वजा जाता मिळणार्‍या देणगीमूल्यातून दिनेशला तंबोरा विकत घेऊन द्यायचा होता. 1985 मध्ये ‘काफिया’ शीर्षकाचा हा कार्यक्रम प्रमिलाताई ओक हॉलमध्ये झाला. त्यांचे सूत्र संचालन प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी केले होते. अकोलेकर रसिकांच्या मनात अजून त्या कार्यक्रमाच्या खट्‌ट्या-मिठ्या आठवणी ताज्या असतील.


नंतर दिनेश नागपूरला गेला. पं. प्रभाकर धाकडेंचा शिष्य झाला. तिथं गाणं शिकला. गाण्याच्या अनेक मैफिली केल्या. आणि धाकडेसरांच्या ग्रुपसोबतच त्याने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियात त्यानं त्याचं गाणं ऐकवलं. पुढे त्यानं स्वतंत्रपणे उर्दू मराठी गझल गायनाच्या मैफिली केल्या. अशा मैफिलीच्या निमित्ताने तो दक्षिण आफ्रिकेतही जाऊन आला. तिथेही त्यानं मराठी गझलचा झेंडा रोवला. आज दिनेश अर्जुना हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गझलनवाझ आहे. ‘शबनशी’ हा उर्दू गझलांचा त्याचा अल्बम टी-सीरीजने मागच्या वर्षीच प्रकाशित केला. त्याचं कौतुकही खूप झालं. त्या अगोदर ‘मौज-ए-सदा’, ‘साईनाम सुखदायी’ आणि ‘जय श्री चक्रधरा’ अशा कॅसेटस्‌ त्याच्या नावावर जमा आहेत. ‘श्रद्धा’ हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मल्टिप्लेक्समध्ये शंभर दिवस पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांचा ‘तसा न चंद्र राहिला’ ह्या अल्बमसह मराठी-उर्दू गझलांचे त्याचे अनेक अल्बम लवकरच प्रकाशित होणार आहेत. मागच्या महिन्यात 14 एप्रिल 2011 ला अमिताभ बच्चन, धर्मेंद्ग, सुभाष घई यासारख्या दिग्गजांसोबत त्याला भारत रत्न डॉ. आंबेडकर अवार्ड देऊन त्याचा गौरव करण्यात आला. नुकत्याच सुरु झालेल्या ‘अनुवाद’ ह्या टी. व्ही. चॅनलचे टायटल साँग त्याने केले आहे. थोडक्यात काय की, गुलशन में बहार आयी है.


असं म्हणतात की, वक्त से पहले और तकदीर से ज्यादा किसीको कुछ नही मिलता. आज वक्त आणि तकदीर दोन्ही दिनेश अर्जुनावर मेहरबान आहेत. यशाची आणखी नवनवी शिखरं जिंकण्यासाठी तमाम अकोलेकरांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. त्यानं फक्त ‘सोने चांदी की डगर’ असणार्‍या मुंबईतही आपल्यातला अकोलेकर जपला पाहिजे. प्रामाणिकपणानं पडेल ती मेहनत केली पाहिजे. संघर्षाचा पहाड छातीनं लोटला पाहिजे आणि गातच राहिलं पाहिजे -



ओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल;


हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: