८ ऑक्टोबर, २०११

कमलाकर देसले : पाच गझला






१.


ऐ गझल



मी तुला वाचून घडलो ऐ गझल ;


मी तुझ्या प्रेमात पडलो ऐ गझल..



छिद्र का तू भावनेला पाडले ?


केवढा मी आज रडलो ऐ गझल..



मी तसा भित्राच होतो.आज पण-


तू सवे येताच लढलो ऐ गझल..



बोललो मी सत्य जेव्हाही इथे ;


बघ व्यवस्थेलाच नडलो ऐ गझल.



स्वच्छ झाला ,स्पष्ट झाला बोध अन ;


मी कुठे नाहीच अडलो ऐ गझल.



मी रसीकांच्या मनातिल बोललो ;


नम्रतेने उंच चढलो ऐ गझल



२.



संपदा



जीवघेणी ही तुझी आहे अदा ;


जीव मी ओवाळला हा सर्वदा .



तू अता आहे तिथे होवो सुखी ;


प्रेम तू मजला दिले हा फायदा .


.


कौरवांच्या भ्रष्ट हाती अर्जुना-


द्रौपदीला का बरे देतो सदा .


.


राम हा सत्तेत यावा म्हणुन ही-


मारुतीची चालवा आता गदा .



.

मोडण्यासाठीच केला का बरे -


मोठमोठ्यांनीच येथे वायदा .


.


सिद्ध केले रोज मोठ्यांनी इथे;


तोडण्यासाठीच असतो कायदा..




धावला दु:खात अपुल्या जो कुणी-


तेवढी अपुली खरी बघ संपदा





३.



दावा ...



गंध,माळा वा टिळा लावा कितीही ;


पावतो का "तो" ? करा दावा कितीही ..



तृप्त होतांना अशी अतृप्त का रे ?


वाजु दे कृष्णा तुझा पावा कितीही.. .



तो उद्याचा सिंह हे ध्यानी असू द्या ;


शांत हा वाटे जरी छावा कितीही ..



ताप शापाचा बरे उतरेल कैसा?


चंदनाचा लेप हा लावा कितीही ..



सत्य नाही झाकता येते कधीही ;


दाखवा खोटाच देखावा कितीही ..



४.



कळून गेले....



जे जे माझे झाले ते ते कळून गेले ;


माझे होता माझ्या पासुन ढळून गेले..



दु:खालाही असा लावला लळा तरीही ;



चार दिवस ते रजा मागुनी पळून गेले ..



कामावरती विजय लाभतो .म्हणे तापाने ;


चित्त तरी का दर्शन होता चळून गेले .



दुष्काळाने रण पेटणे नवीन नाही ;


पाण्यानेही पीक इथे हे जळून गेले..



वळण वयाचे सरणावर ;पण जगू वाटते


पिकल्यावरती पान छान हे गळून गेले ..



हात जोडुनी , पाय पडुनी हरामजादे


सत्तेवरती आले आणि छळून गेले ..



कुवार होते,निर्मळ होते,पवित्र होते


उच्चाराने सत्य खरोखर मळून गेले.



५.



गाथा बुडावा लागतो



जन्म सेवेने झरावा लागतो


प्रेमभावाने भरावा लागतो



गाठण्या उंची कुणालाही इथे


पायरीवर पाय द्यावा लागतो



बंडखोराला इथे केंव्हातरी


येथला हा मार खावा लागतो



मंदिराला बांधताना भक्त हो


केवढा पाया भरावा लागतो



या मनाला रिक्तता येतेच.पण-


आसवांना पूऱ यावा लागतो



कर्म भक्ती ज्ञान होतानाच हा


अर्जुनाचा मोह जावा लागतो



रे मिरा होणे तसे सोपेच ना


हा विषाचा घोट प्यावा लागतो



राहतो देहूत हे नाही पुरे


हा तुझा गाथा बुडावा लागतो



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: