८ ऑक्टोबर, २०११

ज्ञानेश वाकुडकर : दोन गझला










१.



तू सवे येणार होती ,सूखही येणार होते;
जे तुला कळलेच नाही तेच माझे दार होते.

या घराला भिंत नाही हे कितीदा बोललो मी
तू पुन्हा 'कन्फ्यूज' झाली,ठोकताळे फार होते.

ऐनवेळी का तुझे हे पंखही थांबून जाती;
भाबडे आभाळ माझे केवढे हळुवार होते.

कोणत्या शाळेतली तू ही गणिते पाठ केली;
फुंकरीने का कधीही नाव दर्यापार होते?

हाय या काठावरी मी थांबलो आहे अजुनी;
हे मला ठाऊक नाही जिंकतो की हार होते.

२.



जेवढे बोललो तेवढेही पुरे;
प्रेम वाटूनही प्रेम बाकी ऊरे.

घे म्हणालो तुला मीच दाही दिशा
तू कशाला मधे ओढशी हे धुरे?

मौन पाळूनही जीव घेतात ते
तू कशाला उगा घासतो हे सुरे?

जन्म आले किती जन्म गेले किती;
जीव माझा तुला भेटण्याला झुरे.

हे तुझ्या सारखे गाव आहे तुझे;
सत्य बोलूनही मीच खोटा ठरे.

माणसा सारखे वागू या का जरा;
माणसांच्या मनी बांधुयाना घरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: