बत्तीस तारखेला
भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला
जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला
सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?
नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला
समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला
त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?
राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला
२.
अस्तित्व दान केले
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले
हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले
चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले
वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले
इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला दैदिप्यमान केले
जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा "अभय" भुकेला, धारिष्ट्यवान केले
३.
माझी ललाटरेषा
धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली
माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली
तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे
जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली
ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला
औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली?
घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे
भासे असे जसे की, दमछाक दूर झाली
घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली
४.
पांढरा किडा
तुझी सांग येथे दखल कोण घेतो
कशाला घशाला उगा त्रास देतो
असामान्य विश्लेषकांच्या भितीने
गझल घप्प कपड्यात झाकून नेतो
नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो
पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
नव्या यमांची नवीन भाषा
मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्या, नव्या बियांची नवीन भाषा
पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा
नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा
नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्या, नव्या मुळांची नवीन भाषा
अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा
कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा
कान पकडू नये
आता कुणी कुणाचे कान पकडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये
ते दान का मिळाले? जे टाळले सदा
असले पुन्हा नव्याने सहसा घडू नये
शोधेन मीच माझा, रस्ता पुन्हा नवा
त्या मूक दर्शकांनी सहसा रडू नये
निद्रिस्त मीच केल्या माझ्याच जाणिवा
संवेदनेवरी या मीठ रगडू नये
कोणास कोण प्याले, कळतेच ना कधी
नातेच बाटलीशी सहसा जडू नये
म्हणतात वाहवा, व्वा! स्त्रीरम्य वेड ते
सच्चा विचार सहसा का आवडू नये?
सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली
कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये?
झाले अता पुरेसे, ते बोलले बहू
बाळंत होत ना ती, चर्चा झडू नये
सोसून ऊन वारा, अंकूरतो अता
कोंबेजण्याच आधी सहसा सडू नये
आता कुठे जरासा झालोय मुक्त मी
पायास साखळ्यांनी परत जखडू नये
माझ्याकडे मुळीही किल्ल्या न शिल्लकी
माझ्याविना कुणाचे सहसा अडू नये
हे अन्न सात्त्विकाचे ये ’अभय’ भोजना
मंगल अशा प्रसंगी सहसा दडू नये
७.
’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला?
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला
उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला
कांदा पुसे रडूनी, कांद्यास अक्कलेच्या
तो ’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला?
चेचून वेदनांना, पायात गाडले; पण
स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळते उशाला
दचकून जाग येते, निद्रा लयास जाते
ते घाव प्राक्तनाचे, छळती क्षणाक्षणाला
सोडून भूतळाला, ती दैत्य जात गेली
देऊन दान वृत्ती, या सभ्य माणसाला
ना झाकते कधी ती, वस्त्रात अंग सारे
मिळणार भाव कैसा, शेतीत कापसाला?
समजून घे “अभय” तू नाहीत भ्याड सारे
निपजेल शूर येथे, विश्वास दे उद्याला
८.
भारी पडली जात
पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात
तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात
बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार
जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात
वाटेवरती काटे बोचरे, पसरून होते दाट
आता पोचलो कसाबसा मी, कित्येक खस्ता खात
एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात
आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत
सूर बोबडे ऐकून माझे, मुरडून घेती नाक
नसेल जर का आवड माझी, मी बसू कशाला गात?
नारळ फुटला, प्रसाद वाटू, बोलून गेलेत काल
वाट पाहतोय इथे अजूनी, घासून बसलो दात
गुणवत्तेचा गळा दाबुनी, हा निकाल आला आज
कर्तृत्वाचा बोर्या वाजला, नि भारी पडली जात
भिती मनातील आता तरी तू, पुरुनी दे वा जाळ
अभय जगावे,कसे जगावे, तू घ्यावे करुनी ज्ञात
९.
सोकावलेल्या अंधाराला इशारा
सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे
आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे?
डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे
गाय इकडे आणि कास तिकडे, चारा मी घालायचा कुठवर?
कधीतरी इकडे; या बाजूस, दुधाचा थेंब वळला पाहिजे
प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा ठाकला आहेस तू?
माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे
आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे
हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे
निर्भीडतेने ‘अभय’ असा तू, यज्ञकार्य असेच चालू ठेव
ग्रहणापायी झाकोळलेला, चंद्र आता उजळला पाहिजे
gangadharmute@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा