१.
लढाई
जिंकण्याची एवढी केली तयारी
हारणे झाले मग खूप भारी
का विठोबा पावला नाही मला तू
सोडली नाही तुझी मी एक वारी
आजही आकाश बघ तेथेच आहे
ये जरा तू चार भिंतीतून दारी
पाखरांची शेवटी रे हार झाली
माणसांनी घेतली जेव्हा भरारी
साप जेव्हा विष विकाया लागले मग
तेवढे ते राहिले नाही विषारी
एकदा जवळून बघ जळती चिता तू
शेवटी ही आग नसते संपणारी
जिंकला तू ज्या भरोशावर लढाया
ती तुला झाली अता तलवार भारी
२.
वस्ती
वागणे माझे खरे होते
हे जगासाठी बरे होते
भाळलो मी फक्त पाण्यावर
भोवताली भोवरे होते
सांगणे मी सोडले देवा
देव सारे घाबरे होते
जाळली ज्यांनी उभी वस्ती
शांत त्यांचे चेहरे होते
पाळले नाही कधी साधे
श्वान घरचे चावरे होते
वारही केले असे त्यांनी
हात दोन्ही पांढरे होते
कोरडे जमले न काहीही
अंतरी माझ्या झरे
३.
भास
नुस्ताच भास होतो
त्याचाच त्रास होतो
तू लाख घे परीक्षा
मी सहज पास होतो
खेळू नको फुलांशी
बदनाम श्वास होतो
काही कठीण नाही
जेथे प्रयास होतो
प्रेमाशिवाय कोठे
मुक्काम खास होतो
तू एक सोबतीला
सोपा प्रवास होतो
४.
स्पर्श
मला अचानक भेटणारी तूच होती
मनात माझ्या पेटणारी तूच होती
टाळून तुला गेलो जरी गर्दीमध्ये
चार भिंतीत खेटणारी तूच होती
कधी सकाळी भांडली तू रागामध्ये
संध्याकाळी बोलणारी तूच होती
केला न स्पर्श देहास तू माझ्या कधी
फोटो माझा चुंबणारी तूच होती
जीव लावला लाड केला अन् कधी मग
हक्कानेही मारणारी तूच होती
आयुष्याशी लढतांना मधेच तुटलो
पुन्हा नव्याने जोडणारी तूच होती
तुझ्याचसाठी सोडली मी सर्व दुनिया
दुनियेसाठी सोडणारी तूच होती
५.
हेले
वेगळे तू आज येथे काय केले
कालचे तर लोक हे विसरून गेले
टाळतो आहे तुला मी यामुळे की
चौकशी करतील काही भेटलेले
जे तुला सांगायचे ते खोड थोडे
वाचतो मुद्दाम मी ते खोडलेले
ज्ञानदेवा सारखा झाला न कोणी
आजही घेतात त्याचे नाव हेले
हे विचारा त्या स्मशानाला जरासे
जाळल्यावर माणसाने काय नेले
यात काही वाद नाही कोणताही
जन्मले जे लोक येथे तेच मेले
पाहिजे तर जीव हा मागा गुरूजी
वेळ आल्यावर तशी पळतील चेले
छान केले पांडुरंगा देव झाला
माणसा मागे किती आहे झमेले
६.
ताजमहल
जे जे केले होते दावे
खोटे ठरले सर्व पुरावे
गोड गळ्यांनी टाळ कुटा अन्
बेसूर्यांनी गीत म्हणावे
दिवसा ढवळ्या सक्त पहारा
रात्रीला मोकाट फिरावे
बोल जराशी तू प्रेमाने
सहज येतील जवळ दुरावे
ताज महल मी आज बांधतो
आधी तू मुमताज बनावे
सांग नशीबा मला एवढे
फुकट तुला मी का पोसावे
देव अचानक पेटुन उठला
मी म्हटले तू काम करावे
abudawant@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा