७ जुलै २०११ ...अचानक फेसबुक वर एक परिचयाचं...खूप परिचयाचं...पण आजवर त्या नावापर्यंत मला न पोहोचता आलेलं...असं नाव डॉ. श्रीकृष्ण राऊत नजरेस पडलं आणि एखादी अप्राप्य गोष्ट हाती लागावी तसा आनंद झाला मला. आणि त्याहूनही जास्त आनंद झाला जेंव्हा फोनवर पहिल्यांदा बोलणं झालं आमचं. एक मिनिट... एक मिनिट...आधी मला या मागचं कारण नीट सांगायला हवं की नेमकं मी सरांना का शोधत होते आणि मला झालेल्या आनंदाचं नेमकं कारण काय होतं.
मला जेंव्हा पासून आठवतंय...तेंव्हा पासून आईच्या तोंडी...मी अनेक गझला...अनेक शेर...अनेक कविता...अनेक ओव्या...अनेक भजन...खूप काही ऐकत आले. सुरेश भटांच्या गझल...आणि प्रत्यक्ष सुरेश भट यांना भेटायचा योग ही आला. पण आईच्याच तोंडी ऐकलेला एक शेर...जो बोलताना मला अजूनही तिच्या आवाजात कुठेतरी एक कापरा स्वर जाणवतो...एक चीड जाणवते आणि एक उद्विग्नता जाणवते तो जीवघेणा प्रसिद्ध शेर श्रीकृष्ण राऊत यांचा-
सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तो ही गुलाल होता.
आईला मी खूप वेळा विचारलं की हे कोण आहेत..? कुठे असतात..?तू कधी भेटली होतीस...? पण ती सगळी उत्तरे मिळूनही माझी मात्र त्या नावाविषयीची उत्सुकता कमी व्हायला तयार नव्हती,...आणि अचानक फेसबुक च्या माध्यमातून आमची ओळख झाल्यावर मी इतकी वर्ष साठून राहिलेलं किती आणि काय काय राऊत सरांशी बोलले..ते मलाही आता नीट आठवत नाही. एनी वे..पुन्हा एकदा त्या फेसबुक चे आभार.
मला वाटत गझलेचा परिचय मला मी डोळ्यांनी वाचलेल्या अक्षरांपेक्षा..आईच्या तोंडून ऐकलेल्या शब्दांमधून आधी झाला. तिचं संपूर्ण आयुष्य किती खडतर आणि
किती संकटातून गेल हे इथे लिहिण्याच मी नक्कीच टाळणार..पण हे मात्र निश्चितनमूद करावस वाटतय की तीला या शब्दांनीच खूप बळ दिल. जणु स्वत:चंच प्रतिबिंब समोर दिसावं आणि अचानक आपल्या एकटे पणात कुणीतरी भागीदार म्हणून याव असं काहीतरी झालं असावं तिच्या बाबतीत. सुरेश भटांच्या शेरात सांगायचं म्हटलं तर-
‘घेतला मी श्वास जेंव्हा कंठ होता कापलेला..
पोळलेला प्राण माझा बोलण्या अधिक गेला.
किंवा
‘ जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेंव्हा स्मशानी
घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसानी.’
हे आणि असेच कित्येक शेर तिला जणु उभारी देत गेले आणि ' तू एकटी नाहीस..हे काय आम्ही आहोत ना तुझ्या सोबतीला..तुझं दु:ख कुणाला कळो वा न कळो..आम्ही ते तंतोतंत व्यक्त करतोय ना...' असा विश्वास हे शब्द देत गेले.आणि ती अधिकाधिक समृद्ध होत गेली.
कधीतरी एकदा रेडिओवर मी गुलाम अलींची मुलाखत ऐकत होते. त्यात प्रश्न विचारला गेला होता ‘ गझल म्हणजे नेमक काय’ मी ही कान टवकारून बसले. कारण मलाही उत्तर हवच होत. आणि मग गुलाम अली साहेबांनी जे उत्तर दिलं ते..ते ऐकूनच मी कितीतरी वेळ शांत बसून राहिले होते. त्यांनी जे चित्र डोळ्यासमोर उभ केलं ते असं होतं की एकदा एका हरिणाची शिकार होते. नेमका बाण त्याच्या कंठात रुतलेला असतो ... ज्याने शिकार केली तो शिकारीही समोरच उभा. आणि जीव जाण्याच्या सीमारेषेवर ते हरीण शेवटचे काही उरलेले आचके देतंय...त्याचे प्राण त्याच्या डोळ्यात गोळा झालेत...अन एक शेवटचा आचका देताना त्याच्या तोंडून जी " आह.." बाहेर पडते आणि जीव सुटतो..ती शेवटाची आह म्हणजे गझल. गझलच्या अनेक व्याख्या असतील; पण मग आईला जी गझल आपली वाटते..तिची सोबती वाटते..तेंव्हा गझलेचा हा अर्थ आणि तिचं स्वत:चं आयुष्य यात काही साधर्म्य जाणवत असेल का तिला? नियतीच्या जात्यात स्वत:चं पीठ करून घेताना असेच काही जीवघेणे क्षण आले असतील ना..की जेंव्हा तिच्या मनाने ‘ त्या ’ शेवटच्या आचक्याची वाट पहिली असेल. कदाचित त्यावेळी ‘सुटका’ हा एकच अर्थ असेल तिच्यासमोर. पण तो क्षण जो त्या टोकापर्यंत घेऊन येतो..आणि पुन्हा जिथे आहोत तिथेच नेऊन सोडतो...असे कितीक मरण सोहळे असेच अनुभवले असतील ना तिने...? कितीही प्रयत्न केला तरी आई या विषयावर लिहिताना माझ्याकडून असंच काहीतरी लिहिलं जात.आणि आजतर आई आणि गझल असा दुहेरी योग आहे.
१९८५ साली ‘माहेर’ दिवाळी अंकात व. पुं.नी आईची मुलाखत घेतली आहे . जेवढा म्हणून तिचा प्रवास मांडता येईल तो सारा व. पुं च्या लेखणीतून अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटला गेलाय. पण त्यातली एक उल्लेखनीय गोष्ट ही सांगावीशी वाटतीये की तेंव्हाच्या मुलाखतीत सुद्धा आईच्या तोंडी श्रीकृष्ण राऊत यांची गझल आहे-‘माझी भकास शिल्पे’. संपूर्ण गझल मुलाखतीत दिली आहे. आज पंचवीस वर्षे उलटून गेलीत या गोष्टीला. आणि म्हणूनच की काय मागच्यावर्षी प्रदर्शित झालेला सिनेमा ‘मी सिंधुताई सपकाळ’. त्यात सुद्धा सिनेमाचे निर्माता आणि दिग्दर्शक यांना तिचं सोसणं-भोगणं जसंच्या तसं मांडणार्या गझलांना घेण्यावाचून राहावलं नाही
खूप काही आहे सांगण्यासारखं...ऐकण्यासारख. ते पुन्हा कधीतरी. तूर्तास या लेखाचा शेवट करताना मला पुन्हा राऊत सरांचीच गझल आठवतीये-
माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
कोण्यातरी व्यथेचा ऐने महाल होता.
ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन
मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता.
1 टिप्पणी:
सुंदर आठवणी !....
टिप्पणी पोस्ट करा