२४ ऑक्टोबर, २०१२

डॉ.कैलास गायकवाड : पाच गझला




१.

राग लोभ मत्सरास दूर ठेवतो;
आजकाल मी असाच सूर ठेवतो.

वाटते भिती , कुणा कळेल यामुळे...
रक्त जाळतो... मनात धूर ठेवतो.

खुंटल्यात मानवी जगात जाणिवा;
व्यर्थ उंच मान,ताठ ऊर ठेवतो.

मांडतो प्रदर्शनात काच पांढरी;
आत कोळशात आबनूर ठेवतो.

वागतो निलाजरा दिगंबरापरी;
लाजण्या जगास चूर चूर ठेवतो.

विरहयातना नको जगामधे कुणा;
भावते मला तयास दूर ठेवतो.

२.

बेगडी दुनियेत सरसावेल एखादा तरी;
वाटले होते कुणी धावेल एखादा तरी.

आज देव्हार्‍यातले तेतीस कोटी मोजले;
वाटले होते कुणी पावेल एखादा तरी.

तेच ते सौंदर्य होते,पण जरा ढळला पदर;
वाटले होतेच वेडावेल एखादा तरी.

अंतरात्मे भ्रष्ट झाले भोगवादाने जरी;
अंतरात्म्यालाच खडसावेल एखादा तरी.

सद्गुणांचा फारसा मोठा जरी आकार पण
वाटले माझ्यात सामावेल एखादा तरी.

कोरडे ''कैलास'' चे आयुष्य गेले...शेवटी...
आज डोळा काय ओलावेल एखादा तरी?

३.

शुष्क वठलेले बिचारे झाड मी;
बहरल्या रानामधे ओसाड मी.

दु:ख दुनियेला कसे समजायचे;
लपविलेले पापण्यांच्या आड मी.

सांग दहशतवाद संपावा कसा?
वृत्त वाचुन हळहळे तो भ्याड मी.

आवरत आहे गुपित ओठांवरी;
लोक म्हणती सभ्य;आहे द्वाड मी.

ना कुणी आंजारले,गोंजारले;
पुरवितो हल्ली स्वतःचे लाड मी.

आज तोंडातून बरसाव्या शिव्या;
का? कितिंदा बाळगावी चाड मी.

कचकड्याच्या मोहमय दुनियेमधे;
टाकतो माझ्या मनावर धाड मी.

रक्त सळसळते पुन्हा थंडावते;
भावना शाबूत पण मुर्दाड मी.

दाखवू आश्चर्य अजुनी केवढे;
लाखदा उडलोय की तिनताड मी.

काव्य ''कचरा'' मानते दुनिया तिथे
खपविण्या आलो गझलचे बाड मी.

४..

तडफडताना हसणे सुद्धा यदाकदाचित;
जमेल खोटे रडणे सुद्धा यदाकदाचित.

शिकून झाले तिळतिळ मरणे या देहाचे;
जमेल आता जगणे सुद्धा यदाकदाचित.

तारस्वरातच ओरड केली आयुष्याची;
जमेलही कुजबुजणे सुद्धा यदाकदाचित.

रडले माझ्या प्रेतावरती कालच...त्यांना
रुचेल माझे नसणे सुद्धा यदाकदाचित.

अस्तित्वाची खूण तुझी ''कैलास''नसावी
जमेल मागे उरणे सुद्धा यदाकदाचित.

५.

समजुन येते ज्याचे त्याला, ”चुकले माझे”
धमक लागते म्हणावयाला ”चुकले माझे”

लाख चुका पदरात घ्यावया तयार आहे
फ़क्त एकदा बोल तयाला ,” चुकले माझे”

पश्चात्तापातील मजा का मिळेल त्याला?
चुकून जो ना कधी म्हणाला,''चुकले माझे''

भ्रमात राहू नकोस की हे जगत नासमज
कधी तरी समजेल जगाला,''चुकले माझे''

दिशादिशांनी दबाव ''कैलास'' येत आहे
निरपराध मी म्हणू कशाला? ''चुकले माझे''

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: