२४ ऑक्टोबर, २०१२

गंगाधर मुटे : तीन गझला




१.

पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

घमासान आधी महायुद्ध होते;
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते.

प्रणयवासनेला सिमा ना वयाची;
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते.

जुने देत जावे, नवे घेत यावे;
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते.

किती साचुदे गाळ-कचरा तळाशी;
तरी धार नाहीच अवरुद्ध होते.

जसा बाज गझलेस येतो मराठी;
तशी मायबोलीच समृद्ध होते.

कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे;
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते.


रेखाचित्र : प्रकाश बाल जोशी


२.

जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले;
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले.

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा;
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले.

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू;
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले.

दुखवू नये कधीही मनभावना कुणाची;
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले.

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू;
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले.

मतला, रदीफ, यमके, शब्दात गुंफताना;
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले.

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले.

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे;
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

३.

सुप्तनाते
.
तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना;
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना!

तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा;
तुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना.

तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना.

चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा;
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते 'मेड इन चायना'!

किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे;
जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना.

कसा आज रस्ता दिशाभूल झालो, निघालो कुठे अन् कुठे पोचलो;
कसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, "अभय" व्यर्थ गेली तुझी साधना.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: