गझल हा जसा कवितेचा सशक्त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्न.
२४ ऑक्टोबर, २०१२
क्रांति साडेकर : एक गझल
गुणाकार
कटू बोलला तो, तसे फार नाही;
जिव्हारी रुतावा, असा वार नाही.
जरी मागते मी, मला खंत नाही;
इथे सांग ना, कोण लाचार नाही?
उसासू नको तू, तुझ्या आठवांचा;
उदासीत माझ्या पुढाकार नाही!
करू काय मी या मुक्या पावसाचे?
तुझ्यासारखा तो धुवांधार नाही.
तुझे दु:ख आले तिच्या सोबतीला,
व्यथा आज माझी निराधार नाही.
दशांशात भागून शून्यात बाकी,
सुखाच्या नशीबी गुणाकार नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा