२३ ऑक्टोबर, २०१२

कमलाकर देसले : तीन गझला




१.

प्रेमामध्ये वार

प्रेमामध्ये वार कधी का दिसतो सांगा?
मनातला स्वीकार, कधी का दिसतो सांगा?

कान मनाचे करून ऐकत जावे गाणे;
गळ्यातला गंधार, कधी का दिसतो सांगा?

तिला होऊ द्या मुले ,मुलांना मुले .कथेतुन;
वांझेचा संसार, कधी का दिसतो सांगा?

कानाला बहिरे करणारी वाद्य ऐकली;
मौनाचा झंकार, कधी का दिसतो सांगा?

उरात ज्याच्या पृथ्वी ,पाणी,अग्नी, वारा;
नभास त्या आकार ,कधी का दिसतो सांगा?

महाभारताच्या युद्धाहुन खूपच मोठा-
मनातला संहार, कधी का दिसतो सांगा?

हिमालयाच्या महागुहेतुन फिरवुन आणा;
सूर्याला अंधार, कधी का दिसतो सांगा?




रेखाचित्र : प्रकाश बाल जोशी

२.

पोरी

कशाला नाचते पोरी?
किती तू हासते पोरी.

किती घायाळ मी व्हावे;
मला का जाचते पोरी?

तिथे कोजागिरी. आणि-
इथे आरासते पोरी.

कधी हाती न ये पारा-
तशी तू भासते पोरी. ..

समाजाच्या भल्यासाठी-
स्वत:ला तासते पोरी.

नभाला रंग खोटे ते;
कशाला फासते पोरी?

३.

आभास आहे ..

भोवताली का तुझा आभास होतो?
की मला हा आठवांचा त्रास होतो.

मृत्युने दाढेत घेता वाटते की,
देह काळाचा जरासा घास होतो.

बंधनाचा अर्थ नाही जाणला की;
मुक्तिचाही जीवघेणा फास होतो.

आढ्यता का वाकते कोणापुढे ही?
नम्र झाला तोच येथे दास होतो.

वापरा ना वापरा केव्हातरी पण-
या शरीराचा खरे तर -हास होतो.

मोकळे सोडू नको तू केस राणी;
कळत नाही का तुला...मज त्रास होतो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: