गझल हा जसा कवितेचा सशक्त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्न.
२३ ऑक्टोबर, २०१२
बदीऊज्जमा बिराजदार : तीन गझला
१.
स्वप्ने किती गुलाबी
स्वप्ने किती गुलाबी, सजवून रात गेली;
या फाटक्या जिवाला, फसवून रात गेली.
संमेलने स्मृतींची, आरास वेदनांची;
जळता अतीत माझे, उजळून रात गेली.
मिळते उसंत तेव्हा, शिवतो तमाम जखमा;
एकेक जखम माझी, उसवून रात गेली.
अख्खी सकाळ जाते, मी आवरीत बसलो;
क्षण विस्मृतीतलेही, पसरून रात गेली.
चुकते हरेक व्यक्ती, अपवाद कोण त्याला;
पण बोध त्यातुनी घे, वदवून रात गेली.
करतोस केवढी तू चिंता उगा उद्याची;
झोपेविनाच "साबिर" उलटून रात गेली.
२.
प्रेतास चूड नुसती
प्रेतास चूड नुसती लावून लोक गेले;
कर्तव्य पार त्यांचे पाडून लोक गेले.
भुरटेच चोर आता होवून साव आले;
त्यांची चुणूक मजला दावून लोक गेले.
केले न माफ माझ्या प्रेतासही जगाने;
टाळूवरील लोणी खाऊन लोक गेले.
माझ्यासमान नव्हता कोणीच कानफाटा;
आरोप नेहमीचे ठेवून लोक गेले.
रेंगाळला परंतू, ना थांबलाच “साबिर”;
दारास काल टाळा ठोकून लोक गेले.
३.
शब्द झाले दागिने
शब्द झाले दागिने, शृंगारली माझी गझल;
मैफिलींमध्ये पहा संचारली माझी गझल.
का मुखवट्यांनाच मानू लागलो मी चेहरे?
वाचताना चेहरे अंधारली माझी गझल.
शुष्क झाली माणसे अन् कोरड्या झाल्या दिशा;
याच दृष्याने किती ओसाडली माझी गझल.
पाहिले अश्रू, कधी तर, ऎकले मी हुंदके;
ते टिपायाला पुढे झेपावली माझी गझल.
कागदी गझला परंतू बोलबाला केवढा!
सांगतो इतकेच की, बेजारली माझी गझल.
पैंजणे घालून माझी गझल नाचू लागली;
तोच त्यांनी का अशी धुत्कारली माझी गझल?
स्वप्न गझलेचे पहाता प्राण “साबिर” सोडला;
ते समाधी बांधता, साकारली माझी गझल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा