गझल हा जसा कवितेचा सशक्त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्न.
सीमोल्लंघन विशेषांक ०८ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

८ ऑक्टोबर, २००८
संपादकीय

गझलप्रेमी मित्रांनो केवळ कवितेसंबधी
आणि त्यातही विशेष काव्यप्रकारासंबधी
एखादा ब्लॉग नियमित लिहिणे किती जिकिरीचे आहे,
हे मराठी ब्लॉगविश्वाला एव्हाना चांगले परिचित आहे.
गझल
हया विशेष काव्यप्रकाराला वाहिलेला हा ब्लॉग ‘गझलकार’.
दिनांक १ मार्च २००८ ला
हया सुदर्शन फ़ाकिर यांच्या वरील लेखाने ‘गझलकार’ची सुरूवात झाली.
आणि अवघ्या सहा महिन्याच्या अल्पावधीत
त्याची साडे पाच हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचली गेली.
या प्रतिसादाने आमचा उत्साह आणि आत्मविश्वास अधिक दांडगा झाला.
अनेक गझलकार मित्रांच्या सहकार्याने
हया ब्लॉगचा विशेषांक काढण्याची कल्पना
आज मुर्तरूप घेत आहे. याचा आनंद हा सर्जनाचा आनंद आहे.
एखादी भट्टी छान जमावी
तसे अनेक कलावंत एकत्र आले
त्यात छायाचित्रकार अशोक वानखडे ‘प्रवीण’
यांचे योगदान फार मोलाचे आहे.
एखादी नितांत सुंदर कविता वाचताना
मनात अनेक भावतरंग उमटतात,
आशयाचे अनेक पदर आपल्या संज्ञेत उलगडतात
आणि त्या प्रतिमा आपल्या नेणीवेत कायम रेंगाळतात
तसे ‘प्रवीण’ यांचे छायाचित्र आहे.
सीमोल्लंघनाच्या अर्थाचे सौंदर्यात्मक संसूचन करणारे
छायाचित्र त्यांनी मुखपृष्ठासाठी उपलब्ध करून दिले.
श्रीधर अंभोरे, प्राजक्ता,उमेशा आणि अभि
या रेखाचित्रकारांच्या योगदानाला सजावट म्हणणं
हा त्यांच्या कलानिष्ठेचा उपमर्द होईल.
गझल आणि लेखांमधील आशय अधिक सघन करण्यासाठी
त्यांचा लाभलेला सहभाग सार्थआहे.
या सर्व दोस्त - मित्रांचे औपचारिक आभार मानणं
त्यांनाही आवडणार नाही
आणि आम्हालाही ते मानवणार नाही.
महागाई, बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार अशा तिहेरी दहशतीने
सामान्य माणूस होरपळून निघत आहे,
त्याची जीवननिष्ठा डळमळीत झाली आहे.
आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातला हा ‘कॉमन मॅन’
आमच्या कल्पनाचित्रात नाउमेद झालेला दिसतो आहे,
हताश वाटतो आहे.
‘सत्या-असत्याची’ ग्वाही देणारे
त्याचे मन विकल झाले आहे.
म्हणूनच मनोज सोनोने यांच्या गझलेत हे जनमानस अभिव्यक्त होते-
‘गांधी तुम्हीच सांगा मिळतात शस्त्र कोठे?
हिंसाच सत्य आहे, बकतात लोक सारे.’
हिंसेने कोणतेही प्रश्न कधीही सुटत नाही
हेच खरे, बाकी सर्व ‘बकवास’ आहे.
अमावस्येच्या घनघोर अंधारात
एखादी इवली पणती
आपल्यापरीने प्रकाशदान करते.
तशी ही उमेद आहे.
ती कायम राहण्यासाठी
हया पणतीत आपल्या शुभेच्छांचा स्नेह घालणे
हेच कोणत्याही
चित्रकाराचे, छायाचित्रकाराचे, गझलकाराचे, कलावंताचे
इतिहासदत्त कर्तव्य आहे.
असे आम्ही मानतो.
आणि हया‘सीमोल्लंघनाच्या’ प्रकाशवाटेवर
आमच्या शुभेच्छांचा एक किरण अंथरतो-
‘इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार,
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.’
-संपादक
माझी मराठी गझल-गायकी : सुधाकर कदम
मराठी गझल-गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही. माझ्या अगोदर मराठी गझल, गझलसारखी गाण्याचा फारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गायन हे माझ्यासाठी आव्हान होते. मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली. तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली. माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहंदी हसन, फरीदा खानम, गुलामअली व आपले जगजितसिंग हयांच्या गायकीवरून तयार झाला आहे. त्या काळात यवतमाळ सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका व कॅसेट सुद्धा मिळत नव्हत्या. पाकिस्तान रेडिओवरून जेवढे काही ऐकायला मिळायचे त्यावरून मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो. पुढे स्व. सुरेश भटांनी मला मेहंदी हसन व फरीदा खानमच्या कॅसेट दिल्या. हळूहळू गुलामअली, जगजितसिंग, बेगम अख्तर यांच्या कॅसेट जमा करून माझा गझल गायकीचा अभ्यास सुरू झाला. मराठी गझल गायची म्हणजे वरील मंडळीचे नुसते अंधानुकरण करून भागणार नव्हते, तर प्रत्येकाची गझल गाण्याची पद्धत, बंदिशीची बांधणी, शब्दानुरूप वेगवेगळया स्वरगुच्छांची पखरण, शब्द फेक, शेर सादर करण्याची पद्धत, श्रोत्यांना आपलेसे करण्याची हातोटी, सादरीकरणातील जोरकसपणा व हळुवारपणातील बारकावे, या सगळयाला साजेसे व्यक्तिमत्व आणि योग्य साथीदारांची योग्य संगत म्हणजेच गझल गायकीची रंगत होय. हया सगळया बाबी कठोर साधना व आत्मपरीक्षण करून मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोठे मला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही रसिकांकडून प्रचंड दाद मिळत गेली. पहिल्याच बैठकीत सादर केलेल्या गझलेला व सुरावटीला दाद मिळवणे यात सारे काही आले. असे मला वाटते. माझी स्वत:ची वेगळी अशी गायनशैली तयार व्हावी म्हणून आवडत असूनही मराठीतील लोकप्रिय व प्रसिद्ध गायकांची भावगीते,नाट्यगीते मी अभ्यासली नाहीत. वारंवार ऐकली सुद्धा नाहीत. १९५८ मध्ये मी तबला शिकायला सुरूवात केली. वडील आदरणीय पांडुरंगजी कदम हे वारकरी संप्रदायाचे विदर्भातील प्रसिद्ध गायक व हार्मोनियम वादक. गायनाचे व हार्मोनियम वादनाचे प्रारंभिक धडे त्यांनीच गिरवून घेतले. यवतमाळलाच शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू असतांना १९६५ मध्ये ‘शिवरंजन’ ऑर्केस्ट्रामध्ये संगीत संयोजन, एकॉर्डियन वादन व गायन असे अनेक व्याप सांभाळता सांभाळता चाली बसविण्याचा छंद जडला. लहान मुलांसाठी बालगीते विद्यार्थ्यांसाठी समुहगीते, नाटकांसाठी नाट्यगीते अशा विविध प्रकारच्या गाण्यांना स्वरबद्ध करीत गेलो. ऑर्केस्ट्राच्या प्रत्येक कार्यक्रमात मी स्वरबद्ध केलेले एकतरी प्रेमगीत किंवा भक्तिगीत सादर केल्या जात असे. ऑर्केस्ट्राच्या १० वर्षाच्या कालावधीत एकॉर्डियन, हार्मोनियम, तबला, मेंडोलिन, आर्गन, गिटार व इतर तालवाद्य हाताळता प्राविण्य मिळत गेले. त्यासाठी या दहा वर्षातील दिवसाचे रोज दहा ते बारा तास ऑर्केस्ट्राच्या खोलीतच सतत रियाज करावा लागला. याचा फायदा म्हणजे मी आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा उत्तीर्ण होऊन आकाशवाणीचा मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झालो. त्या काळात आकाशवाणी कलावंत म्हणून मिरवण्यात मजा यायची. १९७२ मध्ये यवतमाळ जिल्हयातील आर्णी या वीस हजार लोकवस्तीच्या गावात इच्छा नसतांनाही आर्थिक तडजोडीसाठी संगीत शिक्षक म्हणून रूजू झालो. तेथे सरोद व संतूर वाद्ये आणून मनसोक्त रियाज केला. काही सरोदवादनाचे तर काही संतूरवादनाचे जाहीर कार्यक्रमही केले. या वेळी गायन की वादन अशा द्विधा मनस्थितीत असतांना स्व. छोटा गंधर्व व स्व. जितेंद्र अभिषेकी यांनी मला मोलाचे मार्गदर्शन करून गायन कायम ठेवले. जितेंद्र अभिषेकी यांचा स्वत:चा असा बाज होता तर छोटा गंधर्व यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. गायनातील मुर्च्छना पद्धतीबद्दल शास्त्रीय ज्ञान विशारदच्या परीक्षेच्या वेळी माहीत झाले होते. प्रात्यक्षिकाचे धडे मात्र स्वत:छोटा गंधर्वांनी मला दिले. याचा उपयोग मला गझल गाताना नेहमीच होत गेला. माझ्या गझल-गायकीवर या दोन थोर कलावंतांचे फार मोठे ऋण आहे. यवतमाळचे कवी मित्र शंकर बडे यांनी लिहीलेली- ‘आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही आम्ही घरोघरी अन् आम्हास गाव नाही’ ही १९७५ मध्ये स्वरबद्ध केलेली माझी पहिली गझल होय. नागपूरच्या विदर्भ साहित्य संगीत विभागाच्या उदघाटनप्रसंगी माझा कार्यक्रम गडकरी सभागृहात झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कविवर्य सुरेश भट होते. या कार्यक्रमात वरील गझल ऐकून त्यांनी त्यांच्या काही गझला मला स्वरबद्ध करायला दिल्या. आर्णी मुक्कामी त्या स्वरबद्ध करून दुस-या नागपूर वारीत त्यांना ऐकविल्या. त्यांना आवडल्या व आमची कुंडली जुळली. दोघेही मनस्वी स्वभावाचे असल्यामुळे मनाने ही एकत्र आलो १९८० पासून आम्ही दोघांनी एकत्र कार्यक्रम करायला सुरूवात केली. सुरूवातीला ते काही गझला त्यांच्या पद्धतीने ऐकवायचे. मध्यंतरानंतर मी हार्मोनियम व तबल्याची साथ घेऊन स्वरबद्ध गझल ऐकवायचो. १९८० ते १९८२ या दोन वर्षात गझल व गझल-गायकी लोकापर्यंत पोचविण्याकरीता आम्ही दोघे प्रसंगी पदराला खार लावून महाराष्ट्रभर‘वणवणलो’ हळुहळू माझा पूर्णपणे तीन तासांचा फक्त मराठी गझल गायनाचा कार्यक्रम तयार झाला. या कार्यक्रमाला ‘अशी गावी मराठी गझल’ हे शीर्षक सुरेश भटांनीच दिले. विदर्भ, मराठवाडा, दक्षीण महाराष्ट्र असा प्रवास करत करत १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहातील कार्यक्रमाने ‘अशी गावी मराठी गझल’ चा झेंडा पुण्यात रोवला. या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गाण्याचा तीन तासांचा कार्यक्रम करणारा एकही गायक महाराष्ट्रात नव्हता, ‘अशी गावी मराठी गझल’ हा मराठी गझलगायनाचा महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम होता याचा पुरावे म्हणजे त्यावेळच्या वर्तमानपत्रातील बातम्या. म. सा. प. च्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण व आकाशवाणी पुणे केंद्राने निमंत्रितांसमोरील कार्यक्रमाचे एक तासाचे केलेले ध्वनिमुद्रण. या कार्यक्रमाचे निवेदन स्वत: सुरेश भटांनी केले होते.
या कार्यक्रमाला रमण रणदिवे, प्रदीप निफाडकर, अनिल कांबळे, संगीता जोशी, वगैरे त्यावेळच्या नवोदित व आताच्या प्रस्थापित गझलकारांसोबतच ‘सोबत’कार ग. वा. बेहरेसारख्या अनेक मान्यवर व्यक्ति उपस्थित होत्या. पुण्यातील रमण रणदिवे, प्रदिप निफाडकर, व अनिल कांबळे यांच्या गझला कार्यक्रमामधून सर्वप्रथम मी गायिल्या. गझलगायनाच्या कार्यक्रमात गझलांची निवड अतिशय महत्वाची असते. गझलांचा मतला जर श्रोत्यांच्या हृदयात घुसणारा असला तर पुढील शेर ते मनापासून ऐकतात. तसेच गझलची बंदिश तयार करतानाही अनेक अवधाने ठेवावी लागतात. गझलचे शब्द व भाव स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोचतील अशी बंदिश व गायकीची पद्धत असायला हवी. तसेच एखाद्या शेरातील विशिष्ट शब्द खुलवायचा असेल तर त्याला स्वरांची वेगळी ट्रिटमेंट द्यावी लागते. नुसत्या बंदिशीने हे कामभागत नाही. खरे तर बंदिश तयार करणे हा शब्दप्रयोगच माझ्या दृष्ट्रीने चुकीचा आहे. गझल वाचता वाचता आतल्या आत खळबळ सुरू होवून एखादी सुरावट उफाळून बाहेर येते. ती खरी बंदिश होय. ती आपली नसते पण आपण फक्त माध्यम असतो. आलेल्या चाली आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते. तसेच जाणकार श्रोतेही काही प्रमाणात ओळखू शकतात. शेराची सजावट मात्र अविर्भाव, तिरोभाव आणि मुर्च्छना पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे करता येते. पण त्यासाठी शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरते. बंदिश बांधतांनाही याचा उपयोग होतो. शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर दाद हमखास मिळतेच. उदाहरणेच द्यायची झाली तर अनेक देता येतील पण जागेअभावी काही मोजकी उदाहरणे देत आहे. आर्णी(जि.यवतमाळ) मुक्कामी माझे घरी सुरेश भटांना ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची, तापलेल्या अधीर पाण्याची’ ही गझल सुचली. लगेच मला देऊन चाल बसवायला सांगितले. मी हार्मोनियम घेऊन बसलो. गझल वाचता वाचता भुपाळीचे स्वर मनात रूंजी घालायला लागले. बंदिश तयार झाली. पण त्यातील ‘अधीर’ या शब्दाला दिलेली सुरावट मनात ठसत नव्हती.अख्खी रात्र जागून झाल्यानंतर भुपाळीत नसलेला ‘शुद्ध निषाद’ सहाय्याला आला व ‘अधीर’ला आधार देता झाला ;तेव्हा कुठे समाधान झाले. रात्रभराची माझी तगमग सुरेश भट बघत होते. पण बोलले काहीच नाही. सकाळी मात्र मनापासून दाद देऊन त्यांनी माझा रात्रभरचा शीण घालविला. पुढे प्रत्येक कार्यक्रमात या गझलेने दाद घेतली. ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’, ‘या फुलांनी छेडली रानात गाणी’, ‘मी असा त्या बासरीचा सूर होतो’, ‘दिशा गातात गीते श्रावणाची’ अशा अनेक उत्तमोत्तम रचना आम्ही एकत्र असताना तयार झाल्या. कार्यक्रमात गझल गाताना एखाद्या शब्दाला स्वरांनी कुरवाळण्याची किंवा शब्दार्थ नेमकेपणाने श्रोत्यांना कळावा म्हणून काही तरी वेगळे करण्याची उर्मी ऐनवेळी दाटून येते. अशा वेळी जर योग्य प्रकारचे स्वर लावल्या गेले तर तो शब्द परिणाम कारक ठरतो. ‘कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता.यातील ‘वेगळा’ या शब्दाचा वेगळेपणा दाखविण्यासाठी मूळ बंदिश ‘कल्याण’ थाटातील असूनही मी ‘कोमल रिषभा’चा प्रयोग करून ‘वेगळे’पण सिद्ध करून रसिकांची दाद घ्यायचो.ऐका तर गझल : हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही :
|
तसेच उ. रा. गिरीच्या ‘या एकलेपणाचा छेडीत मी पियानो’ या गझल मधील ‘तिमीरात हरवलेली निद्रा अनाथ माझी’ या ओळीतील ‘हरवलेली’ या शब्दाला स्वरांद्वारे ‘हरविल्याचा’ आभास निर्माण करण्याचा माझा प्रयत्न नेहमी दाद घ्यायचा. या गझलेची मूळ बंदिश ‘मालकंस’ रागात आहे. दुसरी ओळ आहे ‘ओठास भैरवीच्या दंशून जा स्वरांनो’यातील ‘भैरवी’शब्दाला ‘भैरवी’तच नेऊन पुन्हा ‘मालकंसा’त येणे म्हणजे तयारीचे काम. पण याचा जो काही ‘परिणाम’ ऐकणा-यांवर होतो तो कायम लक्षात राहणारा असतो.
ऐका तर गझल : या एकलेपणाचा छेडीत मी पियानो :
|
१९७५ पासून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर जवळ जवळ हजार कार्यक्रम मी केले. भटांच्या साठ टक्के गझला स्वरबद्ध करून गायिलो. सोबतच विदर्भातील श्रीकृष्ण राऊत, उ. रा. गिरी, ललित सोनोने, शंकर बडे, गंगाधर पुसतकर, अनिल पाटील, पश्चिम महाराष्ट्रातील संगीता जोशी, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, अनिल कांबळे, म. भा. चव्हाण, रमण रणदिवे, सतीश डुंबरे, मंगेश पाडगांवकर, सदानंद डबीर, मनोहर रणपिसे, ए. के. शेख, घनश्याम धेंडे, दिलीप पांढरपट्टे, शिवाजी जवरे, प्रमोद खराडे ते समीर चव्हाण पर्यंतच्या जुन्या नव्या गझलकारांच्या रचना मी स्वरबद्ध केल्या आहेत. माझा गझलगायकीचा वारसा माझ्या कन्या कु. भैरवी व कु. रेणू समर्थपणे चालवित आहेत. प्रसिद्धी माध्यमे व कॅसेट कंपन्या मला आर्णीसारख्या लहानशा गावात वास्तव्य असल्यामुळे वश झाल्या नाहीत. तसेच स्वाभिमानी स्वभावामुळे लाळघोटेपणा व पायचाटूपणाही जमला नाही. त्यामुळे ख-या अर्थाने मराठी गझलगायकीची सुरूवात करून आणि शेकडो कार्यक्रम करूनही आजच्या पिढीला मी अपरिचित आहे. पण माझ्या जवळचा मराठी गझलांच्या बंदिशीचा खजिना पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे. यात वाद नाही. सध्या मी पुण्यात स्थायिक झालो असून माझ्यापरीने मराठी गझलगायकी करिता जे काही करता येईल ते करण्याच्या प्रयत्नात आहे. माझ्या बंदिशींवर आधारित ‘सरगम तुझयाचसाठी’ हा मराठी गझलांचा कार्यक्रम माझ्या मुली महाराष्ट्रभर करीत आहे. गझलगायकी शिकणा-या नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, बंदिशींवर सतत नवीन प्रयोग करीत आहे. मराठी गझल माझा प्राण आहे. ‘गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी आयुष्य राहिलेले जाळून मोहरू या’ असे म्हणून माझी मराठी गझलगायकीची साधना सुरूच ठेवणार आहे. बस! - ॥ सुधाकर कदम । सी १ सी । १३, गिरिधर नगर । वारजे माळवाडी, पुणे -५२ । मो.९८२२४००५०९ ॥ ****************************************************
मराठी गझलेची वादस्थळे : डॉ.श्रीकृष्ण राऊत

गझल ‘तो’ की ‘ती’?
गझल हा शब्द स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी? विंदा करंदीकरांसारखे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी ‘साठीचा गझल’ असे पुल्लिंगी संबोधतात. तर खावर सारखे उर्दूचे मातब्बर कवी माझिया गझला मराठी’ असे स्त्रीलिंगी शीर्षक आपल्या गझलसंग्रहाला देतात. एकूण काय तर गझल ‘ती’ आहे की ‘तो’ इथ पासूनच हया काव्यप्रकारविषयी सुरू असलेला वाद उत्तरोत्तर चढत्या क्रमानेच प्रवास करताना दिसतो. मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकरांच्या रचना हया गझलच नव्हेत इथपर्यंत या वादाची मजल गेली. नवोदित गझलकार तर स्वत: आपण जे लिहितो तीच फक्त गझल असे एकमेकांना स्पष्ट सांगून स्वयंघोषित ‘गालिब’ झालेले आहेत. सगळयांना ‘गालिब’च व्हायला पाहिजे आहे. कुणालाही जौक, इकबाल, साहीर, दुष्यंतकुमार असं होणे कमी पणाचं वाटते. इथे मराठीचिये नगरी संकुचित वृत्ती दुसरं काय?
वृत्तीवरून बरं आठवलं गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे हे वाचून चोथा झालेलं एकच वाक्य आम्ही चघळत असतो आणि पु. लं. च्या हया वाक्याचा उत्तरार्ध सोयीस्कर विसरतो. ‘गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे. एवढेच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्तीही आहे.’ पु. लं. च्या या वाक्यातील ‘सूक्ष्म आणि सुंदर निवृत्ती’ अंगी बाणविणे म्हणजे ‘लोखंडाचे चणे खाण्याचं’ काम सोडून आम्ही आमच्या गझलेला गझल न मानण्या-यांवर दातओठ खात असतो. आमच्या समकालिनांपैकी एखाद्याचं मोठेपण कबूल करण्याइतकही आमचं हृदय मोठं नाही. तर ‘सूक्ष्म आणि सुंदर निवृत्ती’ तर फार दुरच्या गोष्टी. ज्ञानेश्वरांचं नाव दिवसातून शंभरवेळा घेऊ पण त्यांची ‘एक तरी ओवी अनुभवणं’ आम्हाला सोयीचं नाही .परवा काव्यचर्चेच्या वेळी पुरूषोत्तम पाटीलांशी गप्पा मारतांना ते फार मार्मिक बोलले. म्हणाले, "आजकालच्या कवींची प्रसिद्धी जास्त पण सिद्धी कमी.
गझल दशक
१९८० ते १९९० हे दशक मराठी कवितेत ख-या अर्थाने ‘गझल दशक’ होते. असं म्हणावयाला हरकत नाही. मेनका, लोकमत, लोकसत्ता इ. नियतकालिकात गझलची चालविलेली सदरे, सुरेश भटांचे ’रंग माझा वेगळा’, ’एल्गार’ हे कार्यक्रम, अमरावतीच्या साहित्य संमेलनात त्यांचीच प्रगट मुलाखत, ठाण्याच्या साहित्य संमेलनात ’गझलचे मराठी कवितेवर आक्रमण’ असा परिसंवाद, लोकमतची १९८५ दिवाळी अंकातली ‘गझलस्पर्धा’ सुधाकर कदम,भीमराव पांचाळे यांच्या गझल- गायनाच्या मैफिली, सुरेश भट, मंगेश पाडगावकर, खावर, श्रीकृष्ण राऊत इत्यादी कवींचे गझलसंग्रह असे भरगच्च उपक्रम या दशकात पार पडले.
गोंडस भ्रम
पण एवढं सगळं होऊनही मिळवले काय तर स्वत:ची ओळ्ख गमावणांर आंधळ अनुकरण. उदाहरणार्थ गझलची व्याख्या ‘गझलेतील एका शेराचा दुस-या ‘शेराशी संबंध असतोच असे नाही.’ अशी गझलची मूळ व्याख्या. पण तिची आग्रही मांडणी ‘एका शेराचा दुस-या शेराशी संबंध नसलाच पाहिजे’ अशी संपूर्ण नकारात्मक करण्यात आली. आणि असा संबध असेल तर ती ‘गझल’ नव्हे तर गझलच्या फॉर्ममधली ‘कविता’ अशी पुस्तीही त्या व्याख्येला जोडण्यात आली. गझलची क्रेझ असल्यानं आपण ’गझल’ लिहून ’गझलकार’च व्हावे. असे प्रत्येक कवीला वाटे. सहजपणे अनेक शेर एकाच विषयावर सुचले तर ती गझलच्या फॉर्ममधील कविता होईल. असे नव्याने लिहिणा-य़ांच्या ‘जमिनीत’ रुजवण्यात आले.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते फ़िराक गोरखपुरी म्हणतात. ‘पुराने जमाने में गजल का एक और रूप प्रचलीत था, जिसे ‘गजले-मुसलसल्’ कहते है. इस में शेर अलग-अलग स्वतंत्र विषयों पर नही होते बल्की एकही विषय पर कहे हुए होते है बल्की उनमें परस्पर संबंध भी होता है. वर्तमान समय में नज्मों (कविता) के कारण इस प्रकार की गजल की जरूरत ही नही रहीं’ पूर्वीच्या काळी एकाच विषयावरची ’मुसलसल् गझल’ अस्तित्वात होती. या गझलेत एकच विषय सर्व शेरांमध्ये असायचा. आता ’नज्म’ मध्ये एकच विषय मांडता येत असल्यानं ’मुसलसल्’ म्हणजे एकाच विषयावरच्या गझलची आवश्यकता राहिली नाही. असा फ़िराकसाहेबांच्या वरील विधानाचा अर्थ.फ़िराक गोरखपुरींबद्दल आदर असूनही त्यांच्या या मताशी मला सहमत होता येत नाही. कारण ‘गझल’ आणि ‘नज्म’ हे दोन कवितेचे प्रकार एकमेकांचे पर्याय ठरविणे कसे शक्य आहे? आणि काव्यप्रकार हे त्या काव्यात वर्णन केलेल्या विषयानुसार ठरतात की आकृतीबंधातील घटकांनुसार हे आधी स्पष्ट व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याकडे भक्तिगीतात भक्ती हा विषय येत असल्याने आता ओवी, अभंग, गौळण, भारूड इ. भक्ती विषयाच्या काव्यप्रकाराची आता आपल्याला काही आवश्यकता राहिली नाही असं कुणी म्हटलं तर आपल्याला चालेल का? आणि त्याहीपुढे जाऊन असे म्हणता येईल की संतांनी त्यांच्या भक्तिरचना ओवी आणि अभंगात केल्या म्हणून ओवी आणि अभंग केवळ भक्तिरचनांचीच मक्तेदारी असलेले काव्यप्रकार आहेत. असा आपण आग्रह धरला तर मर्ढेकरांच्या ओव्या या ओव्याच्या फार्ममधील कविता आणि फ. मु.शिंदे यांचे अभंग हे अभंगाच्या फॉर्ममधील कविता असे आपण म्हणणार आहोत काय? तर कोणताही काव्यप्रकार म्हणजेच कवितेचा आकृतीबंध हा एकमेकांचा पर्याय होऊ शकत नाही. आकृतीबंध हा त्यातील चरण संख्या, चरणातील अक्षरसंख्या, यमक-स्थान इत्यादी घटकांवरून ठरत असतो.
शेवटी कविता महत्त्वाची
डॉ. इकबाल यांची ‘सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ता हमारा’ ही प्रसिध्द रचना किंवा हसरत मोहानी यांची ’चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है’ ही प्रख्यात रचना, किंवा मोमिन ह्यांची ‘वो जो हम मे तुम मे करार था’हया रचनात गझलच्या आकृतीबंधाचे सर्व घटक पूर्ण असूनही केवळ एकाच विषयावरच्या त्या असल्याने आपण त्यांना गझल न म्हणता ‘नज्म’ (कविता) म्हटले काय! काय फरक पडणार? रसिकांच्या हृदयात या रचनांनी केलेले घर पाडणे आपल्याला शक्य आहे काय? आणि आपण अट्टाहासाने आपला अनुभव नसतांनाही बळेबळेच विविध विषयावरचे शेर लिहून ’तथाकथित’ गझल लिहिली तरी रसिकांच्या हृदयात आपल्याला भाडयानं तरी घर मिळेल काय? अर्थातच नाही. कारण रसिकांना पुन: प्रत्ययाचा आनंद देईल ती रचना त्याच्या हृदयात कायम घर करेल मग तो अभंग असो की लावणी, ओवी असो की भारूड, गीत असो की सुनीत, गझल असो की,मुक्तछंद, पोवाडा असो की हायकू याच्याशी रसिकाला काही देणंघेणं नाही. रसिक सौंदर्याचा चाहता आहे, मग ते नऊवारीत असो की पाचवारीत, पंजाबीत असो की मिडीत, त्याच्या काळजाचा ठोका जिथे चुकतो तिथे तो उत्स्फूर्त दाद देईल. वा! क्या बात है! एरवी मेकअपची पुटांवर पुटं चढवलेले फॅशनेबल चेहरे त्याला दाखवून त्याच्याकडून दाद हिसकावून घेणे म्हणजे कवीने रसिकतेवर केलेला बलात्कारच होय.
शेरांचा एकमेकांशी संबंध का नसतो?
गझल हा यमकप्रधान काव्यप्रकार आहे. त्यातला काफिया म्हणजे यमकांनी सर्व शेर एकमेकांशी स्वरानुकारी अंगाने बांधलेले असतात. काही यमकांची प्रकृती, अर्थछटा अशा असतात की त्या अगोदरच्या शेरामध्ये वर्णन केलेल्या विषयाशी सुतराम संबंध ठेवत नाहीत. उदा. ‘गो-या तुझ्या रुपाने भलती कमाल केली; बघण्यास आरला दृष्टी बहाल केली’ अशा ‘प्रिये’ संबंधीचा मतल्याने गझलचा आरंभ झाला. पुढे ‘कमाल’, ‘बहाल’ या यमकांच्या स्वरानुकारी यादीतील ‘मशाल’ हा काफिया घेउन मला शेर लिहावयाचा आहे. पण ‘मशाल’ या शब्दाची प्रकृतीच अशी आहे की, ती प्रेयसी सारख्या ‘नाजुक’ विषयाच्या दूरच राहील. प्रेयसीच्या कोणत्या विभ्रमाचं वर्णन मी मशाल या शब्दानं करू? शक्यच नाही. क्रांतिदर्शी, अंधार दूर करणारी अशी मशाल या शब्दाची अर्थछटा आहे. ‘जीवनाच्या अंधार वाटेवर तूच एक मशाली सारखी भेटलीस’ अशा आशयाचा शेर प्रेयसीला ‘चढवून’ देण्यासाठी लिहिल्या जाऊ शकेल; पण त्यासाठी प्रेयसीला मशालीच्या रूपात जाळावं लागेल. स्वत:साठी आपल्या प्रेयसीला जळायला लावण्याचा तो एक जळतुकडा हिंस्र विचार होईल. प्रेयसीला ‘शमा’ वगैरे म्हणण्या पर्यंत ठीक पण ‘शमा’ ला एकदम सेव्हंटी एम. एम. मध्ये एनलार्ज करून मशाल करणं म्हणजे त्या ठिकाणी बादरायण संबंधही जरासा अनैतिकच वाटावा. जराशा वेगळया पध्दतीनं ’‘मशाल’ या काफियाचा शेर सुचला -
‘अंधार जीवनाचा तेव्हा प्रसन्न झाला
जाळून जीव माझा जेव्हा मशाल केली’
असा शेर लिहून झाल्यावर त्याला गझलच्या बाहेर काढवत नव्हते आणि ठेवला तर तो ’प्रेयसी’ या विषयाशी फटकून वागत होता. मी त्याला गझलमध्ये ठेवला. आणि मग त्या शेरचा मागच्या-पुढच्या कोणत्याच शेराशी अर्थाअर्थी संबंध राहिला नाही. नेमके असेच उर्दू गझलांमध्ये देखील झाले. व अशा अनेक गझला लिहिल्या गेल्यानंतर‘प्रत्येक शेरचा दुस-या शेरशी संबंध असलाच पाहिजे असे नाही’.अशी व्याख्या कालांतराने करावी लागली. तेव्हा एकाच विषयावरची देखील गझल आणि विविध विषय हाताळणारीही गझलच अशी सर्वसमावेशक व्याख्या स्वीकारली नाही तर सहजतेचा बळी तर जाईलच आणि बळेबळेच एका शेरचा दुस-या शेरशी संबंध तोडला तर आपल्या गझला अधिक कृत्रिम झाल्याशिवाय राहणार नाहीत.
शेर कहना
सुरेश भट म्हणतात,‘गझलचे शेर अगदी सहज बोलण्यासारखे आले पाहिजेत’ ’रंग माझा वेगळा’ च्या प्रस्तावनेत पु. ल. ही म्हणतात, ‘गझलमध्ये नाट्याचा अंश असतो. तसे हया गीत प्रकारचे नाकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे.’ही दोन्ही विधाने गझलच्या संदर्भात फार महत्वाची आहेत. परंतु ती नीट समजून घेतली पाहिजेत. सुरेश भट जेव्हा, शेर आपण नेहमी जसे बोलतो तसे आले पाहिजेत असं म्हणतात, तेव्हा गझलची अभिव्यक्ती ही इतकी सहज असावी जसं आपण एकमेकांशी बोलतो आहोत. हया ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गझलची अभिव्यक्ती रोजच्या दैनंदिन बोलण्यासारखी असावी. यात‘सारखी’ हा शब्द फार महत्वाचा आहे. अभिव्यक्ती ‘बोलण्यासारखी’ असावी. पण आपण रोजच्या दैनंदिन बोलण्यालाच जर गझलमध्ये मांडू लागलो तर त्यातील काव्य हरवून जाईल आणि ते वृत्तात लिहिलेले केवळ संवाद म्हणूनच शिल्लक राहतील. त्यासाठी ह्याचं मूळच समजून घेतलं पाहिजे. उर्दूमध्ये ‘शेर लिखना’ असं म्हणत नाहीत ‘शेर कहना’ असं म्हणतात. हे जे ‘शेर कहना’ आहे. यात ती अभिव्यक्तीची सहजता व तिची संवाद-शैली दडलेली आहे. कवीने आपल्या अभ्यासिकेत बसून गझल लिहित (की पाडत?) बसण्यापेक्षा दैनंदिन कामं करतांना जिथे कुठे असेल तिथे त्याची अभिव्यक्ती अत्कटतेनं, उत्स्फूर्तपणे शेरांचं रूप घेऊन त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते म्हणजे ‘शेर कहना’ त्यासाठी वृत्तांवर विलक्षण प्रभुत्व असावं लागतं. नाहीतर आपल्या गझलकारांच्या लेखनप्रपंचात लघू-गुरू क्रम सांभाळता सांभाळता त्याच्या कागदावर नझूलचं तीस वर्षाचं खाडाखोडीचं रेकॉर्ड तयार होऊन जातं. आणि या चकमकीत त्याच्या अभिव्यक्तीची सहजता केव्हा धारातिर्थी पडली याची त्यालाही कल्पना येत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अभ्यासिकेत बसून लघू-गुरू क्रम सांभाळत सांभाळत ‘सहज बोलण्यासारखी’ अभिव्यक्ती येणं अशक्य. त्यासाठी वृत्तांवर विलक्षण प्रभुत्व तर लागेलच पण तुम्हाला उत्कटतेनं काही सांगावसं वाटलंही पाहिजे. ते मनात खदखदत असलं पाहिजे. सलत असलं पाहिजे. झोंबत असलं पाहिजे. सांगितल्याशिवाय आपल्याला हलकं वाटणार नाही. ही अपरिहार्यता त्यात असली पाहिजे आणि या सांगण्यातील काव्य आपल्या म्हणीसारखं, वाक्प्रचारासारखं, लोकगीतांसारखं साधसुधं पण मर्मभेदी असलं पाहिजे. त्यासाठी जीवन समजून घ्यावं लागेल. माणसामाणसांचे बदलणारे नातेसंबध लक्षात घ्यावे लागतील. शृंगारापासून तर अध्यात्मापर्यंतचे विविध अनुभव पचवावे लागतील. भाषेचे सजग भान आपल्याला लागेल आणि सगळयात महत्वाचं म्हणजे झटपट प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता गझलसाधना करण्यासाठी संयमाने थांबण्याची तयारी लागेल.
अंदाजे बयॉं आणि गझलेतील नावीन्य
उर्दूतील नव्वद टक्के गझला हया तेच तेच विषय, त्याच त्याच कल्पना, तीच तीच यमके घेऊन आलेल्या असल्यानेत्यात नावीन्य आढळत नाही. प्रत्येक शायरचा ‘बयान’ करण्याचा ‘अंदाज’ तेवढा लक्षात घ्या असं म्हटलं जातं. ‘कहते है के ग़ालिब का है अंदाजे बयॉं और’ असे ’ग़ालिब’ देखील आपल्या अभिव्यक्ती शैलीबद्दल म्हणतो. मराठी गझलातही तोच तोपणा येताना दिसतो आहे. गझलकार स्वत:लाच पुनरावृत्त करीत आहेत. कधी इतर गझलकारांनी मांडलेल्या कल्पना चोरून आपल्या नावावर थोडासा बदल करून ठोकत आहेत. नवीन यमक शोधणंही उमेदवारी करणा-या गझलकारांच्या जीवावर येऊ लागलं आहे. उघडलं सुरेश भटांचं पुस्तक की काढली त्यातली यमकं आणि यमकांना ओळींची शेपटं फुटवली की झाली गझल तयार! मराठी भाषेतील यमकं काही कोणाच्या बापाची नाहीत, हे जरी खरे असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, गझलेत आधी यमकं निश्चित होतात आणि त्या यमकांचा धागा पकडून कल्पनेने शेर तयार होतो.सुरेश भटांसारख्या सिद्धहस्त कवीचं वृत्तांवरचं प्रभुत्व,व्यासंग,सराव आणि अभिव्यक्ती-शैली एखाद्या यमकाचा धागा पकडून शेराचा ताजमहल उभारू शकते. तर त्याच यमकाचा धागा पकडून नव्याने लिहिणा-या गझलकाराला तेवढया उंचीला पोहोचणे शक्य नसते. आणि मग त्याच्या शेरची चंद्रमौळी झोपडी तयार झालेली आपल्याला बरेचदा दिसते.अपवादात्मक एखादा प्रति ताजही बांधू शकेल.पण सर्वसाधारणपणे हे टाळण्यासाठी नवी यमके शोधली पाहिजेत. मराठी भाषा काही वांझ नाही. पण त्यासाठी मेहनत पाहिजे. भाषेचा अभ्यास पाहिजे. शब्दांच्या अर्थछटेबद्दल जागरूकता पाहिजे आणि हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मराठी गझलेतील शेरच्या चंद्रमौळी झोपडयांची झोपडपट्टीच मराठी कवितेच्या बाजुने वाढत असलेली आपल्याला दिसेल.
वृत्तांची विविधता
नव्याने लिहिणा-या गझलकाराने एकाचवेळी अनेक प्रकारच्या वृत्तात लिहिण्याच्या भानगडीत पडू नये. सुरूवातीला कोणत्याही एकाच वृत्तात लिहिण्याचा सराव करावा. तेच वृत्त पूर्णपणे शब्दवळणी पडल्याशिवाय दुस-या वृत्ताच्या वाटेला जाउ नये. ‘आनंदकंद’ हे त्यासाठी अगदी सहज व गझलकारांचे आवडते वृत्त आहे. कारण ते लवकर शब्दवळणी पडते. सुरेश भटांच्या ‘एल्गार’मधील १७ गझला ‘आनंदकंद’ तर १९ गझला ‘तुंगभद्रा’ या वृत्तात आढळतात. एकाच वृत्तात लिहिलेल्या गझला मोठयाने वाचतांना कानाला एकसुरीपणा जाणवतो.पण तो दोष पत्करूनही सहजता येण्यासाठी मात्र ते आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण वेगवेगळी वृत्ते वापरण्यासाठी गझल लिहित नसतो. तर आपल्या अभिव्यक्तीसाठी विविध वृत्ते वापरीत असतो. संगीतासाठी जसा रोज रियाज आवश्यक असतो. तसेच वृत्तांसाठी रियाज आवश्यक आहे. रियाज करता- करता जेव्हा एकेका वृत्तांवर प्रभुत्व येत जाईल. तेव्हा या वृत्तात सहज आणि ‘बोलल्यासारखी’ अभिव्यक्ती येईल. आणि तेव्हाच ‘शेर कहना’ ही गोष्ट गझलकारांसाठी सहज साध्य होईल. मुक्तछंदात अधिक मोकळीचाकळी आणि ऐसपैस होताना गद्यावतरण झालेल्या मराठी कवितेच्या पार्श्वभूमिवर मग अभ्यासपूर्ण, सराईत,गोळीबंद गझलेची अभिव्यक्ती उठून दिसल्याशिवाय राहणार नाही; एवढे मात्र नक्की. तोपर्यंत मराठी गझलची लाट पूर्णपणे ओसरली तर मराठी रसिक मराठी गझलच्या काव्यानंदाला पारखा झालेला असेल की कृत्रिम मराठी गझलातून मुक्त झाल्याच्या आनंदात असेल हे काळच सांगू शकेल.
तोवर -
तुका म्हणे उगे रहा।
जे जे होईल ते ते पहा॥

सूक्ष्म आणि सुंदर निवृत्ती

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)