१.
माझ्यातले गाणे
मला माझ्यातले गाणे सुखाने वाचता येते;
व्यथांची का करू पर्वा मला तर हासता येते.
जपावी का कशासाठी कथा उध्वस्त रानाची;
तिथेही रोप प्रेमाचे नव्याने लावता येते.
कुणाचा आसरा मागू कशाला सावली शोधू?
निवार्याला उन्हाच्याही मला जर राहता येते.
कहाणी ऐकली आहे कुणा रेशीम विळख्याची
म्हणे चटक्यास ज्वालांच्या मखमली मानता येते.
तुझा दे हात हाती अन हवे मज चांदणे थोडे;
नशा चढते मला माझी मला फेसाळता येते.
दिलेली लाट स्पर्शाची कुणा बेभान दर्याने;
खुबीने टाळता येते;हवी तर माळता येते.
निखारे आठवांचे अन तुझी नाठाळशी स्वप्ने
मला बस एवढे लेणे तुझ्याशी मागता येते.
‘असे सर्वस्व माझे तू’ मला सांगायचे होते;
मनी दाटून येते ते कुठे उच्चारता येते?
२
चांदणे
रात्र का मलूल ही असून चांदणे;
ठेवले असे कुणी मिटून चांदणे.
तारकापल्याड दूर दूर जायचे;
वाट पाहते तिथे अजून चांदणे.
हासतेस तू टिपूर चांदण्यापरी;
सांगते मला असे हसून चांदणे.
गोवलेस नेमके गुन्ह्यात त्या मला
चांदण्यात घेतले लुटून चांदणे.
बोलला चकोर का तुझीच हाक ही?
चालले मनातले उठून चांदणे.
शिंपलेस,सांडलेस,पाजलेस तू;
आणलेस एवढे कुठून चांदणे.
"प्रेम आग,प्रेम वीज,प्रेम वादळे",
काल बोलले मला थकून चांदणे.
राहिला न आसमंत;ना नद्या,झरे;
टाकतील ते अता विकून चांदणे.
टाळले सुगंध पर्व,टाळले ऋतू
ओंजळीत घेतले भरून चांदणे.
आसवे पुसायला दिला रुमाल तू;
ठेवले घडीत मी जपून चांदणे.
रेखाचित्र : सदानंद बोरकर
तमाच्या किनारी
जिथे दु:ख,चिंता तिथे धावते मी;
तमाच्या किनारी दिवे लावते मी.
विजा झेलते,खेळते वादळाशी;
फुलांच्या गराड्यात भांबावते मी.
मला रेखण्याची नको हौस ठेऊ;
कुठे रंग-रेषेत सामावते मी.
उगा आरशाला विचारू कशाला?
तुझे हास्य सांगे तुला भावते मी.
तुझी गोष्ट मी अन तुझे मीच गाणे;
तुझ्या श्वास-भासात नादावते मी.
हवा वाटतो चंद्र जेव्हा उशाशी;
तुझे नाव सांगून बोलावते मी.
४.
मनात ठेवले तुला
मनात ठेवले तुला कुणास ना कळू दिले;
जळू दिले स्वता:स अन तुलाच मोहरू दिले.
विखार वेदनेतला तुला मुळी नये छळू;
म्हणून पापणीतल्या जळास गोठवू दिले
क्षणोक्षणी मला जरी तुझ्यासवेच पाहिले;
तरी तुझे न मोह मी मनास या चढू दिले.
मला विचारल्याविनाच मांडलेस डाव तू;
तुला हवे तसेच दान रोज मी पडू दिले.
तुझ्या मनी खळाळत्या नदीतलाच डोह मी;
म्हणून भोवर्यात मी मला तुझ्या फसू दिले.
कळ्या-फुलांत चाललेत वाद आणि वादळे;
विखार वाढला नि तूच रान पेटवू दिले.
विसावलाय अंतरी अशांत पारवा मुका;
भयाण खिन्नतेस मी कुणा न जाणवू दिले.
तुझ्या मनात पाहिले उजाड भाग पोरके;
तरी न मी तिथे कुणास दु:ख पाखडू दिले.
५..
वसंत लाडका
भोवती जरी उन्हे करून घोळका;
खेळतो मनात रोज चंद्र बोलका.
ओठ तू असे जरी शिवून ठेवले;
दाटतो फुलांत ना तुझाच हुंदका.
ओवलास प्राण तू जिवात या असा;
कोणता कळे तुझा न श्वास नेमका.
घेतले कवेत तू मला व्यथांसवे;
घाव कोणताच राहिला न पोरका.
श्रावणात पावसात रात्र नाहली;
सारखा सभोवती तुझाच भास का?
चांदणे तुझ्यासवे सुखात नांदते;
सोबतीस माझिया उदास तारका.
टाळतेच आजकाल मी नवे ऋतू;
पाहते तुझ्यात मी वसंत लाडका.
.
1 टिप्पणी:
तमाच्या किनारी.............अतिशय सुंदर!
टिपूर चांदणे, चंद्र बोलका, खासच प्रतिमा! सगळ्याच गझलांमधले खयाल आवडले.
टिप्पणी पोस्ट करा