२२ मार्च, २००८

सोडून चाललेले

सोडून चाललेले माझे मलाच गाणे;
मी मैफिलीत उरलो 'वर्ज्य' स्वराप्रमाणे.

ओठात आततायी केदार कैद माझा ;
स्वर-सागरातली ती विरली निळी उधाणे..

नयनात आज माझ्या चंदास नीज आली;
पदरात तारकांचे झाकून घे तराणे.

देऊ नकोस आता आमंत्रणे उद्याची;
घालू नको वृथा तू राखेस ह्या उखाणे.

1 टिप्पणी:

Kamini Phadnis Kembhavi म्हणाले...

४ च शेरांची गज़ल होते का?