Related Posts Plugin for WordPress, Blogger...

१५ एप्रिल, २००८

दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारामराठी कवितेत गझल या काव्यप्रकारावर स्वत:ची ठसठशीत नाममुद्रा उमटवली ती सुरेश भटांनी.या अर्थाने मराठी कवितेत त्यांचा ‘रंग’ वेगळा उठून दिसतो. आज गझलच्या रंगात मराठी कविता चांगलीच रंगली असली तरी एक काळ असा होता की गझल ह्या काव्यप्रकाराला मराठीत मान्यता नव्हती.अजूनही अधूनमधून ह्या काव्यप्रकाराला कृत्रिम,कृतक,तंत्रशरण अशी विशेषणे लावल्या जातात.पण त्याची तमा न बाळगता अत्यंत निष्ठेने सुरेश भटांनी गझला लिहिल्या. मराठीत नव्याने लिहू लागलेल्या पिढीच्या हवाली एक सशक्त आकृतीबंध केला.सुरेश भटांचे संग्रहित गझललेखन कालानुक्रमे पुढीलप्रमाणे-

१) १९६१साली प्रसिद्ध झालेल्या रूपगंधा ह्या संग्रहात एकूण ७२ कविता आहेत.त्यापैकी केवळ गझला आहेत.

२)१९७४ साली प्रसिद्ध झालेल्या रंग माझा वेगळा ह्या संग्रहात एकूण ९२ कविता आहेत.त्यापैकी ३३ गझला आहेत

३)१९८३ साली प्रसिद्ध झालेल्या एल्गार ह्या संग्रहात एकूण ९६ कविता आहेत.त्यापैकी ९१ गझला आहेत.

४)१९९४ साली प्रसिद्ध झालेल्या झंझावात ह्या संग्रहात एकूण ८८ कविता आहेत.त्यापैकी ७६ गझला आहेत.

५)२००२साली प्रसिद्ध झालेल्या सप्तरंग ह्या संग्रहात एकूण ८० कविता आहेत.त्यापैकी ४८ गझला आहेत.

६)२००७ साली प्रसिद्ध झालेल्या रसवंतीचा मुजरा ह्या संग्रहात एकूण ८३ कविता आहेत.त्यापैकी केवळ गझला आहेत.

सहा संग्रहातील एकूण कवितांची संख्या ५११

सहा संग्रहातील एकूण गझलांची संख्या २६१


‘सप्तरंग’ ह्या संग्रहात समाविष्ट ‘ह्म्द’(पृ.३९) ‘न आत शरीफ’(पृ.४०) आणि ‘पाच वर्षांनी!’(पृ.६६)आणि ‘खुलासा’(पृ.७६)दोन हझला अशा चार रचनांचा आकृतिबंध गझलांचाच आहे.
त्यांना धरून गझलांची संख्या २६५ होईल.

‘न आत शरीफ’ ही रचना ‘झंझावात’ ह्या संग्रहातही पृ.५० वर समाविष्ट आहे.

वरील आकडेवारीत मुसलसल गझलांचाही समावेश आहे.ज्यांना ‘रंग माझा वेगळा’नंतरच्या कालखंडात सुरेश भट गझलांच्या फॉर्म मधल्या कविता म्हणत असत.

सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ चा. वयाच्या १४ व्या वर्षापासून म्हणजे १९४६ पासून त्यांनी कवितालेखनास सुरूवात केली. आणि २१ व्या वर्षापासून म्हणजे साधारणत: १९५५ पासून गझललेखनास प्रारंभ केला. १९५० ते ६० या दशकात(रूपगंधा) कोवळी असलेली सुरेश भटांची गझल १९६० ते ७० या दशकात(रंग माझा वेगळा) तरुण झाली.१९७० ते २००० या तीन दशकात(एल्गार/झंझावात/सप्तरंग) तर तिच्या परिपक्व विभ्रमांनी मराठी रसिकतेला चांगलेच झपाटले.

१४ मार्च २००३ ला सुरेश भटांनी ह्या जगाचा निरोप घेतला.फेब्रुवारी २००७ मधे नागपूरला ८० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले.त्यात आयोजकांनी विशेषत्वाने ‘सुरेश भट गझल वाचन सत्र’ ठेवले होते.ह्या गझल वाचन सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत ह्यांचे प्रमुख उपस्थितीत ‘रसवंतीचा मुजरा’ ह्या सुरेश भटांच्या संग्रहाचे प्रकाशन झाले. एका अर्थाने मराठी रसवंतीने सुरेश भट ह्या थोर गझलकाराला मुजरा केला.

आठशेहून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या मराठी कवितेत नव्या आकृतिबंधाचा विचार हा आधुनिक समजला जातो तर प्रतिमांचे नावीन्य हीच कवितेतल्या नाविन्याची (originality) कसोटी मानली जाते.ह्या संदर्भात सुरेश भटांच्या पुढील शेराचा नेमका अन्वयार्थ कठोर समीक्षक असलेला काळच सांगू शकेल :

माझ्याच सवे माझे संपेल घराणेही...
माझे न गुरू कोणी! माझे न कुठे चेले!


तूर्तास आपण सुरेश भटांना पाहूया-ऐकूया:
त्यांच्या गझला तोरण आणि साफसाफ त्यांच्याच स्वरात:

तोरण

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे...
मी मात्र थांबुन पाहतो- मागे किती जण राहिले?

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले!

अवघ्या विजा मी झेलल्या,सगळी उन्हे मी सोसली...
रे बोल आकाशा,तुझे आता किती पण राहिले?

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले!

या मद्यशाळेला अता देईन माझा कैफ मी
येथे खणाणत हे रिते पेले अकारण राहिले.

(एल्गार पृ.३३)

साफसाफ

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही

दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!

(एल्गार पृ.८७)

3 comments:

चित्तरंजन भट,  १५.४.०८  

लेख अगदी नेटका, नेमका, उत्तम झाला आहे. तसेच गझलकार हा ब्लॉग आवडला. संकेतस्थळांचे आणि लेखांचे फार चांगले दुवे दिले आहेत. गझलकारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

चित्तरंजन भट,  १५.४.०८  

लेख नेटका, नेमका आणि उत्तम झाला आहे. ह्या संकेतस्थळावर लेखांचे, इतर संकेतस्थळांचे फार चांगले दुवे दिले आहेत. धन्यवाद, अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

गझलकार १६.४.०८  

आभारी आहे.

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP