माझ्या पुढे भविष्या जाण्या तुला मनाई;
जर मीच संपलो तर कसली तुझी कमाई ?
येईल अमृताची तेव्हा जरूर गोडी,
गाळून घाम जेव्हा आम्ही करू मिठाई.
जीवन कलंदरीच्या इतक्या उनाड वाटा,
माझीच हाक मजला परतून येत जाई.
आता विरंगुळ्याला नुसता रवंथ उरला-
"आम्ही भल्याभल्यांची केली कशी धुलाई!"
येतील ध्येय लाखो पायात घुटमळाया;
वाटेत पापण्यांना जर अंथरेल बाई.
मोहा तुझ्या फुलांवर तेजाब शिंपडू का?
हा बाप बेवडा मज मागे नवीन आई.
हे राहिले असे तर होणार काय नाही?
मागेल आंधळ्यांना मग सूर्य रोशणाई.
- रविप्रकाश
९९२१२९७२९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा